अध्याय ८
श्रीगणेशाय नमः । श्रीदत्तात्रेयाय नमः ।
जयजयाजी गजवदना । पुढे कथा पद्यरचना । जैसी येईल तुझिये मना । तैसी करी का निजछंदे ॥१॥
श्रोते व्हावे सावधान । पूर्वाध्यायी कथानुसंधान । विश्वामित्रे केले कथन । दक्षापासून भीमावरी ॥२॥
मग सदयमने भीमासी । उपदेशी एकाक्षर मंत्रासी । मस्तकी अर्पोनि वरदकरासी । म्हणे पुत्रासी पावसील ॥३॥
ऐकोनि ऋषीची वरदवाणी । राये मस्तक ठेविला चरणी । मग आज्ञा घेऊनि ते क्षणी । परतला रमणीसहित पै ॥४॥
आला ऐकून नगरनाथ । अमात्य दोघे सेनेसहित । सामोरे येऊनिया नेत । महोत्साहे नृपवरा ॥५॥
चारुहासिनी धरूनि करी । प्रवेशला निजनगरी । जाता झाला राजमंदिरी । घरोघरी आनंद तेणे ॥६॥
मग पाहूनिया सुमुहूर्त । भीम गणेशालय निर्मित । तेथे जाऊनिया नरनाथ । मग करीत अनुष्ठान पै ॥७॥
भावे अर्ची एकदंत । निराहार अनुष्ठान करीत । भूतमात्री भगवंत । भीम देखत समदृष्टी ॥८॥
सूकरमार्जारखरश्वान । त्यांसि देऊन आलिंगन । पदी करी त्यांच्या नमन । देहाभिमान टाकोनिया ॥९॥
पाषाणतरु ते आलिंगित । रासभाते नमस्कारित । जन म्हणती पिशाच अद्भुत । राजाजीत जाहला असे ॥१०॥
सर्वभूती भगवद्भाव । होता प्रसन्न झाला देव । रूप प्रगटोनिया अपूर्व । करी राव धरियेला ॥११॥
तयासि म्हणे गजवक्त्र । तुज होईल आता पुत्र । तो मज होईल प्रियपात्र । सेवी कलत्र आनंदे ॥१२॥
ऐसी वदोनि वरदवाणी । गुप्त जाहला मोदकपाणी । राजा येऊनि गृहालागुनी । आनंद जनी उभवी ॥१३॥
लक्षानुलक्ष विप्रभोजन । वस्त्रालंकारे धेनुदान । करिता जाहला प्रमोदेकरून । तेणे गजवदन तुष्टला ॥१४॥
चारुहासिनी ऋतुमती । भीमे करिता सशास्त्र रती । दोहदाते जाहली धरती । परमप्रीती रायाते ॥१५॥
नवमासपूर्ण होता । मग प्रसवली दिव्यसुता । राजगृही मंगलता । विस्तारली बहुसाल ॥१६॥
राये फोडोनि भांडार । सुखी केले द्विजवर । पुत्रोत्साह केला थोर । दाने अपार देतसे ॥१७॥
रुक्मांगद ऐसे नाम । ठेविता जाहला भीमकोत्तम । राजा जाहला पूर्णकाम । देवसत्तम प्रसादे ॥१८॥
ज्याचे स्वरूप अवलोकन । करिता लाजती चंद्रमदन । कनककांती सुलक्षण । भीमनंदन विराजे ॥१९॥
भीमे एकाक्षरे उपदेशिला । शास्त्रकळा प्रवीण जाहला । मग पित्याने राज्यी स्थापिला । आपण गेला तपोवना ॥२०॥
पावता राज्यसंभार । नीतीने पाळि प्रजा समग्र । शांत दांत गुणगंभीर । उदार शूर विवेकी ॥२१॥
विनायकोपासक सदा । मृगयेलागी एकदा । फिरत असता श्रांत तदा । तृषाविव्हळ जाहला तो ॥२२॥
रुक्मांगद राजा उदककामी । जाता जाहला ऋष्याश्रमी । उष्णे जाहला अत्यंत श्रमी । ऋषी धामी अवलोकिला ॥२३॥
वाचन्कवीनामे ऋषिसत्तम । त्याची भार्या अतिउत्तम । कनकलतिका रतिसम । स्वरूपधाम कमलावती ॥२४॥
उभयतास अवलोकुन । रुक्मांगदे केले नमन । ऋषि म्हणे तयालागुन । विश्रांती करी क्षणभरी ॥२५॥
मज माध्यान्हसंध्यालागी । जाणे आहे याप्रसंगी । ऐसे सांगोनिया वेगी । स्नानालागी तो गेला ॥२६॥
राजा म्हणे वो माय । शीतळ पाजी शुद्ध तोय । तृषाव्याकुल माझा काय । प्राणसोय टाकीतसे ॥२७॥
ऐसे ऐकोनि त्याचे वचन । करूनिया सुहास्यवदन । नेत्रकोणे अवलोकुन । पुढे जीवन ठेविले ॥२८॥
मग म्हणे पुरुषसुंदरा । शीतल जीवन प्राशन करा । श्रमोनि आलेति माझे घरा । श्रमपरिहार करीन मी ॥२९॥
तुझी पाहूनि रूपरेखा । ह्रदयी पावले अत्यंतसुखा । किमपि विचार नाही पारखा । सप्रेम देखा मजलागी ॥३०॥
माझे करिता अधरपान । तेणे हरेल श्रमतहान । ह्रदयी माते आलिंगोन । दाहशशमन करा वेगी ॥३१॥
तू माझे ह्रदयपलंगी । शयन करी का याप्रसंगी । आता माझे सुरतसंगी । संतोष अष्टांगी पावशील ॥३२॥
ऐसी ऐकता तिची वाणी । राजा बोटे घाली कर्णी । म्हणे माझी ऐसी कर्णी । नाही तरुणी जाण गे ॥३३॥
करिता परांगना अभिलाष । होईल रौरवी गे वास । नलगे तुझिया उदकास । भलती आस धरू नको ॥३४॥
गणेशोपासक मी जितेंद्रिय । मज नाही मन्मथाचे भय । तुझे वंदितो मी पाय । माझी माय सत्य तू ॥३५॥
ऐकोनि बोले मदविव्हला । तू न जाणशी या धर्माला । कामार्त जरी याचिता बाला । तरी नराला दोष नाही ॥३६॥
हट्टे परवधू करिता ग्रहण । त्यासि निरयभाग जाण । रत्यार्तेस रतिदान । धर्मपरायण करिताती ॥३७॥
अरे तू न देशील जरी भोग । तरी प्राण करितील देहत्याग । तुझे स्वरूपावलोकने अनंग । पीडा सांग मज करी ॥३८॥
स्वर्गमृत्युपाताळ शोधिता । तुझे स्वरूपास नाही साम्यता । तुज न प्रार्थी कोण वनिता । आग्रह आता करू नको ॥३९॥
राजा म्हणे वो मदविव्हले । त्रास पावलो तुझिया बोले । न वाटे हे मज लाभले । मन आपुले आवरी का ॥४०॥
ऐसे बोलोनि उठाउठी । जाता देखिला तिणे दृष्टी । मग धावोनिया गोरटी । करसंपुटी धरी तया ॥४१॥
मदविव्हरक्तलोचना । देऊनि त्याते आलिंगना । बळे करी अधरचुंबना । शिथिल व्यसना करूनिया ॥४२॥
राजा तीते परती लोटी । तिणे कंठी घातली मिठी । झिडकारोनिया गोरटी । उठाउठी निष्टला ॥४३॥
मदविव्हल पडली मूर्छित । मूर्छा सावरोनि उठत । क्रोधे थरथरा कापत । दात खात करकरा ॥४४॥
रायास म्हणे अगा दुष्टा । मज दीधले तुवा कष्टा । दुःख भोगशील पापिष्टा । शरीरी कुष्टा पावसील ॥४५॥
ऐसी वदोनि शापोक्ती । मग जाहली लज्जावती । तेथोनि निष्टला भूपती । चित्ती म्हणे अहाहा ॥४६॥
तिचा शाप तात्काळ फळला । सर्व शरीरी कुष्टी जाहला । वेदना लागल्या शरीराला । देह नासला ठाईठाई ॥४७॥
राजा म्हणे गा गजानना । काय आले हे तुझे मना । मी पावलो दुःखकलना ॥ अन्यायाविना या देही ॥४८॥
तुजवाचोनि अन्य जाण । न जाणे गा गजकर्ण । तुझीच भक्ती परिपूर्ण । सदाचरण म्या केले ॥४९॥
तथापि संकटी निर्दया तुवा । मज उपेक्षिले देवाधिदेवा । विघ्नहरण या नावा । तुझे तुवा बुडविले ॥५०॥
ऐसा पडोनि दुःखावर्ती । वटाखाली करी वस्ती । मुख न दाखवी जनाप्रती । तळमळ चित्ती लागली ॥५१॥
तव तुष्टला गजानन । झाले नारदाचे दर्शन । राये करोनि पदी नमन । समाधान पावला ॥५२॥
तुमचे परोपकारालागी भ्रमण आहे सदा जगी । मी जाहलो गा महारोगी । भार्या वियोगी जाहली तेणे ॥५३॥
नेत्री आणोनिया जीवन । केले पूर्ववृत्तांत कथन । तेणे द्रवले साधूचे मन । अभयवचन देत तया ॥५४॥
नारद म्हणे गा नृपनाथ । विदर्भ नगरी कंदव तीर्थ । चिंतामणी एकदंत । भक्तानुकंपी तेथे असे ॥५५॥
मार्गी येता आश्चर्य पाहिले । तेथे एकाचे कुष्ट गेले । कोणे शूद्रे स्नान केले । दिव्य झाले शरीर त्याचे ॥५६॥
तेथे जाऊनि करी स्नान । होईल रोगाचे भंजन । ऐकोनि तोषला भीमनंदन । समाधान पावला ॥५७॥
राजा म्हणे गा धातृनंदना । कोणी स्थापिले गजानना । त्या तीर्थी करिता स्नाना । कोण पुर्वी उद्धरला ॥५८॥
परोपकारी तुमची मती । जैसे मेघवर्षाव करिती । तैसी तुमची उपस्थिती । त्रिजगती प्रतिष्ठित ॥५९॥
ऐकोनि त्याची ऐसी वाणी । ऋषि तोषला अंतःकरणी । म्हणे प्रश्ने उपकारकरणी । जगावरी तुवा केली ॥६०॥
ऐके आता तीर्थमहिमा । पूर्वील कथा उत्तमोत्तमा । तीर्थी स्नान करिता सीमा । सुकृताची न वर्णवे ॥६१॥
पूर्वी फिरत सहज स्थिती । गमन केले स्वर्गाप्रती । मज पाहूनिया शचीपती । आनंदोनि चित्ती नमन करी ॥६२॥
बैसवोनिया सिंहासनी । राजोपचारे पूजा करुनी । पुढे उभा कर जोडोनी । नम्रवचनी पूसत ॥६३॥
इंद्र म्हणे गा विरंचिसुता । तुम्ही जगी नित्य फिरता । काय पाहिली आश्चर्यता । मज तत्वता कथन करी ॥६४॥
नारद म्हणे गा पाकशासना । फिरत पावलो गौतमवना । तेथे पाहिली त्याची ललना । जी का मना अगम्य ॥६५॥
लावण्यसमुद्राची लहरी । हेलावली उर्वीवरी । ब्रह्मांडीचे सौंदर्य शरीरी । विश्रांती करी वाटतसे ॥६६॥
जीचे अवलोकिताच वदन । चंद्र जाहला कलाहीन । रती होते लज्जायमान । तिचे मन उदास पै ॥६७॥
जीचे स्वरूप अवलोकिता । माझे ह्रदयी मन्मथव्यथा । पावोनि आली विकळता । ऐसी कांता दुजी नाही ॥६८॥
रंभा उर्वशी तिलोत्तमा । मेनिका शची आणि उमा । छाया संज्ञा रोहिणी रमा । तिची उपमा न पावती ॥६९॥
तिचे अवलोकिता प्रसन्न मुख । धिक्धिक् वाटे स्वर्गसुख । त्रिभुवनीचा गळोनि हरिख । वदन देख वोतले तिचे ॥७०॥
कोटिजन्म सुकृतयोग । तरीच तिचा घडेल संग । ऐसे ऐकता शचीरंग । म्हणे संभोग करीन तिचा ॥७१॥
मन्मथे भेदिले ह्रदय त्याचे । वैभव नावडे विष्ठपाचे । निर्लज्ज चित्त कामातुराचे । धावे मनाचे पाठीमागे ॥७२॥
टाकोनि सकल उद्यम । इंद्र पावला गौतमाश्रम । स्नानासि गेला ऋषिसत्तम । मागे कृत्रिम आचरला ॥७३॥
तेणे गौतमाचा वेष धरिला । मग स्वाश्रमी परतला । पाहोनि त्याते विधिबाला । विस्मयाला पावली ॥७४॥
कर्म संपूर्ण न करिता पती । का येणे जाहले आश्रमाप्रती । दिसते तुमची चंचलवृत्ती । नेत्राप्रति आरक्तत ॥७५॥
गौतम म्हणे वो कमललोचने । सुरत इच्छा धरिली मने । शय्या करी रुचिरानने । प्रसन्नमने करोनिया ॥७६॥
येरू म्हणे प्राणेश्वरा । हा विचार नाही बरा । दिवसवरी धीर धरा । रात्रौ करा सुखे रती ॥७७॥
टाकोनिया संध्यास्नान । नित्यकर्म देवतार्चन । कैसे चळले तुमचे मन । टाकोनि ध्यान स्वकर्माचे ॥७८॥
गौतम म्हणे गे सुंदरी । स्नान करिता गंगातीरी । म्या अवलोकिली अप्सरा नारी । जी सुंदरी तुज ऐसी ॥७९॥
तिणे करिता जळी स्नान । सर्वांग पाहिले तिचे नग्न । चित्त झाले माझे भग्न । जप ध्यान विसरलो ॥८०॥
ह्रदयी भेदले खडतर । पंचशराचे पाच शर । तेणे होऊनिया आतुर । तुझे मंदिरी प्रवेशलो ॥८१॥
आग्रह न धरावा सुंदरी । तल्पकावरी शेज करी । म्हणोनि धरिले तीते करी । भोगमंदिरी चाल म्हणे ॥८२॥
जन्मवरी दिवसासी । कधीच भोगिले नाही मजसी । आता काय म्हणावे तुम्हासी । काही मनासी लाज धरा ॥८३॥
येरू म्हणे रती न देसील । तरी माझे प्राण जातील । ऐकोनि त्याचे ऐसे बोल । म्हणे विव्हल होऊ नका ॥८४॥
पतिव्रतांचे हेचि लक्ष । पतिआज्ञा वचनरक्षण । तुमची आज्ञा वेदप्रमाण । मजकारण जिवलगा ॥८५॥
निःसंग त्याते धरून हाती । घेऊन गेली शय्येवर्ती । कपट न जाणे भोळी सती । मग एकांती मिसळली ॥८६॥
तीते देऊन आलिंगन । आवडी करी मुखचुंबन । मुक्त केले नीवीबंधन । सुखशयनप्रसंगी ॥८७॥
अष्टप्रकारे अंतरंगरती । करिता इंद्र तोषला चित्ती । परी दिव्य वास येता सती । मग युवती तरकली ॥८८॥
नव्हे कदापि हा मानव । आहे कपटी कोणी देव । म्हणे नष्टा आपुले नाव । प्रकट करी पापिष्टा ॥८९॥
माझ्या पतीचा धरूनि वेष । कपटे केला माझा स्पर्श । आता पावसी की रे नाश । आपला वेष प्रगट करी ॥९०॥
क्रोधे झाले आरक्त नेत्र । थरथरा कापे गौतम कलत्र । शापभये म्लानवक्त्र । सहस्त्रनेत्र प्रगटला ॥९१॥
किरीटकुंडले मंडित वदन । अंग तेजे भरले सदन । तीते म्हणे सहस्त्रनयन । कश्यपनंदन इंद्र मी ॥९२॥
आता करूनि प्रसन्नचित्त । माझे ठाई असावे रत । क्रोध नेत्रा इंगळ वमित । तैसी बोलत तयाते ॥९३॥
अहिल्या म्हणे काय केले । पातिव्रत्य माझे तुवा भंगिले । उभय नावा बुडविले । संसारी मुकले तुझेनि मी ॥९४॥
जरी माझे पतीस कळता । काय होईल तुझी अवस्था । कोण माझी दशा आता । होईल तत्वता प्रारब्धे ॥९५॥
निघे पापिष्टा आता येथून । तिचे ऐकूनिया सक्रोधवचन । गुप्त जाहला पाकशासन । शापभये गौतमाचे ॥९६॥
करोनिया नित्यकर्म । आश्रमासि आला ऋषिगौतम । कांतेस म्हणे ॠषिसत्तम । उदक द्यावे मजलागी ॥९७॥
आज का न येसी बाहेरी । काय करिसी अभ्यंतरी । न बोलसी का प्रत्युत्तरी । नवल परी मज वाटे ॥९८॥
दोन घटिका लोटल्यावरी । अधोमुखे येऊनि बाहेरी । दंडवत पडली भूमीवरी । भये सुंदरी विव्हल मनी ॥९९॥
येरू म्हणे काय जाहले । तिणे सर्व वर्तमान कथिले । न कळता पाप घडले । ते निवेदिले तव चरणी ॥१००॥
ऐसे ऐकोन तिचे वचन । क्रोधे संतप्त ऋषीचे मन । आरक्त जाहले नयन । शापवचन बोलतसे ॥१॥
दुष्टे तू शिला होशिल । श्रीराम चरणी उद्धरसील । असत्य नव्हे माझा बोल । केले कर्म भोगी आता ॥२॥
मुनीचा शाप होता । शिला जाहली गौतमवनिता । नारद म्हणे भीमसुता । पुढे चरिता अवधारी ॥३॥
वज्रपाणी गुप्तरूप । ऐकता जाहला अहिल्येचा शाप । मग पावोनिया अनुताप । म्हणे पाप घडले मज ॥४॥
आता म्या काय करावे । ब्रह्मांडा माजी कोठे दडावे । प्रस्तुत मार्जार रूप धरावे । येथेच असावे लपोनिया ॥५॥
इंद्रे धरिला मार्जारवेष । ऋषीते न साहे इंद्रदोष । कोठे आहे अधमपुरुष । पत्नी सदोष केली जेणे ॥६॥
त्रैलोक्यपति तू वृत्रारी । म्हणोनि तूते भस्म न करी । पर भगलंपट तू दुराचारी । पडोत शरीरी सहस्त्रभगे ॥७॥
ऐसा ऋषीचा शाप होता । सर्वांगी नासला जयंतपिता । अंगी सुटली दुर्गंधता । जाता जाहला तेथुनी ॥८॥
स्वबुद्धी होय हितासी । परबुद्धी विनाशासी । गुरुबुद्धी अक्षयसुखासी । महाप्रळयासी स्त्रीबुद्धी ॥९॥
जनासि दाखवणे नाही मुख । आता अंतरले स्वर्गसुख । मरावे जरी खावोनि विख । मरण देख नये मला ॥११०॥
मग प्रवेशला कमलनाळी । नारद म्हणे तयेवेळी । करोनि ऐसी म्यां कळी । मग स्वर्गाप्रति मी गेलो ॥११॥
सुरासहित इंद्रायणीसी । सांगितले या वृत्तांतासी । शची पिटोन कपाळासी । परमदुःखासी पावली ॥१२॥
देव करिती सकळ शोक । उदास दिसू लागला नाक । सुविचारी आचार्यादिक । पडले देख ते काळी ॥१३॥
मग धरूनि माझे पाय । म्हणता यासि उपाय । करोनिया आरोग्य काय । देवराया सुखी करी ॥१४॥
म्या उपदेशिले सुरवर । शरण गौतमासि जा सत्वर । त्या वाचोनिया अन्यतर । कोण पार पाडील पै ॥१५॥
वाचस्पती आदि करोनी । संगे घेऊनि सुधापानी । गौतमाश्रमी मग जाउनी । स्तवने मुनी तोषविला ॥१६॥
शांत होउनी गौतम वदे । का पातली अमरवृंदे । देवी नमोनि त्याची पदे । करारविंदे जोडती ॥१७॥
अमर म्हणती ऋषिसत्तमा । इंद्रापराध करी क्षमा । तुझे शांतीस नाही सीमा । कोण महिमा जाणेल तुझा ॥१८॥
केल्या कर्माचा महादंड । इंद्रे भोगिला की उदंड । त्याचे उजळ करी का तुंड । कृपा अखंड करोनिया ॥१९॥
ऋषि म्हणे क्रोधायमान । त्यचे न पाहे मी वदन । कृपा करील गजवदन । तो पावन करील तया ॥१२०॥
सहस्त्रभगांचे दिव्यनेत्र । होता होईल शुद्धगात्र । जपता षडक्षरी मंत्र । गजवक्त्र करील कृपा ॥२१॥
ऐसे ऐकोन त्याचे वचन । तत्पदारविंदी नमन । करोनिया दानवभंजन । पाकशासन धुंडिती ते ॥२२॥
आखंडल होता जेथे । सकल देव जाऊनि तेथे । हाका मारिती तयाते । म्हणती रोगाते परिहरू ॥२३॥
आता येई का बाहेर । मुनी तुष्टला तुजवर । ऐसे ऐकता पुरंदर । मग बाहेर निघाला ॥२४॥
भगे पडोनि नासले शरीर । दुर्गंधी सुटली अपार । नाकी लाऊनिया अंबर । तेव्हा सुरवर त्रासले ॥२५॥
सुराचार्ये मंत्र षडक्षर । उपदेशिता दिव्य शरीर । पावोनिया पुरंदर । प्रमोदे निर्भर जाहला ॥२६॥
भगे मावळोनि जाहले लोचन । धन्य मानी सहस्त्रनयन । सकल सुरवर आनंदोन । जयजयकार करिती तदा ॥२७॥
देव म्हणती सनाथ जाहलो । तुजवाचोनि दुःख पावलो । परी आता आनंदलो । दुःख विसरलो वियोगाचे ॥२८॥
परस्परे देव भेटती । आनंदे अप्सरा नृत्य करिती । सुंदर दुंदुभी वाजविती । वर्षाव करिती पुष्पांचा ॥२९॥
मग पुरुहूत वृक्षातळी । ध्यान धरोनि तयेवेळी । सुमने मन आकळी । जप करी षडक्षराचा ॥१३०॥
तप सहस्त्र वर्षे करिता । शिरी वाढली वारुळलता । तेणे सांकडे एकदंता । प्रसन्नता केली तेणे ॥३१॥
मग प्रगटला गजानन । कोटिसूर्य दैदीप्यमान । पुष्करे पुष्कर आकळुन । तपोनिधान इंद्राचे ॥३२॥
पाहोनि त्याते सहस्त्रनयन । भये जाहला कंपायमान । म्हणे काय प्रगटले विघ्न । विघ्ननाशन अनुष्ठानी ॥३३॥
घर्मे डवडवले शरीर । भये विव्हल तो पुरंदर । पाहोनि त्याते लंबोदर । उभारोनि कर बोलतसे ॥३४॥
नाभी नाभी सहस्त्रलोचना । भय न करावे तुवा मना । तुज द्यावया मी दर्शना । पातलो असे कौतुके ॥३५॥
जो निर्गुणनिराकार । तो जाण मी लंबोदर । ज्याते ध्याशी निरंतर । श्रम थोर करोनिया ॥३६॥
मनेप्सित वर मागे । तो मी पुरवीन निजांगे । ऐसे ऐकून शचीरंगे । नमस्कारुनी वर मागतसे ॥३७॥
जरी तू तुष्टलासि मजवरी । तुझी निश्चल भक्ती दे तरी । दुराचारे परनारी । गौतमसुंदरी भोगिली म्या ॥३८॥
तो अपराध करी क्षमा । दयाळू तू पुरुषोत्तमा । मज उद्धरी अधमाधमा । पूर्णकाम परेशा तू ॥३९॥
आणीक आहे एक मागणे । येथे चिंतामणी नाम धरणे । उद्धारावया जगाकारणे । हेचि मागणे जिवेभावे ॥१४०॥
या तीर्थी करिता स्नान । सिद्धी पावोत भाविकजन । तथास्तु म्हणोनि गजानन । अंतर्धान पावला ॥४१॥
वैनायकी मूर्ती करून । इंद्रे केले तेथे स्थापन । मग पावला स्वर्गभुवन । सहस्त्रनयन प्रमोदे ॥४२॥
जयजयाजी मंगलमूर्ती । देई तुझी परमभक्ती । हेचि मागणे पुढतपुढती । महागणपती तुजपासी ॥४३॥
स्वस्तिश्रीगणेशप्रतापग्रंथ । गणेशपुराणसंमत । उपासनाखंड रसभरित । अष्टमोध्याय गोड हा ॥४४॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥ श्रीजगदीश्वरार्पणमस्तु ॥ अध्याय ॥८॥ ओव्या ॥१४४॥