क्रीडाखंड अध्याय २९
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।
जयजय मूलाधारा । सच्चिदानंदा परात्परा ।
अप्रमेया लंबोदरा । वेदसारा जगत्पते ॥१॥
जरीं असेल तुझी कृपा । तरीं त्वद्भक्ती गणाधिपा ।
लाधोन नर तो जन्मतापा । जिंकील या मृत्यूलोकीं ॥२॥
तुझे कृपेनें सर्व देव । भोगिती निजपदीं राणीव ।
ज्याचे मुखीं तुझें नांव । सुखवैभव तयासी ॥३॥
मातापितागुरुआप्त । तूंच सर्व एकदंत ।
जगत्रयातें हेतुभूत । वेदां अंत न कळे तुझा ॥४॥
श्रोते ऐका सावधान । गजाननाचें चरित्र गहन ।
जें संसाररोगशमन । रसायण दुर्मिळ जें ॥५॥
व्यास ऐकोन मयूरेह कथा । ब्रह्मयासि जाहला पुसता ।
आतां सांगे गजाननचरिता । तेणें धन्यता पावेन मी ॥६॥
करिता भगवद्गुण श्रवण । तृप्ति न पावें अंतःकरण ।
अधिक वाढे आशा जाण । गुणश्रवण करावया ॥७॥
त्रेतायुगीं गुणेश जाहला । तेणें विस्तारिल्या निजलीला ।
द्वापारीं गजानन त्याला । कां म्हणती परमेष्टी ॥८॥
जगदात्मा गजानन । मूषक किमर्थ तयासि वहन ।
हें सकल त्याचें आख्यान । संतापशमन मज सांगे ॥९॥
ऐकोन तयाची प्रश्नोक्ती । धाता आनंदोनी चित्तीं ।
म्हणे धन्य धन्य तूं सुमती । तुज गणपती प्रसन्न असे ॥१०॥
जन्मोनियां हीच जोड । भगवल्लीला श्रवण गोड ।
श्रवण करोनियां सुधड । मोक्ष कवाड उघडणें ॥११॥
तुझे ऐकतां प्रश्न बोल । मातें येती सुखाचे डोल ।
जन्मकथनें होय सुफल । भक्त प्रेमळ जाणती हें ॥१२॥
कोणे एके अवसरीं । सत्यलोका जाऊन मदनारी ।
विधिलागीं जागृत करी । उठोन विधी बैसला ॥१३॥
निद्रा भ्रमिष्टमना विष्णुसुत । मुख पसरोन जृंभा देत ।
जांभयीपासोन अत्यद्भुत । जाहला सुत विधीप्रती ॥१४॥
रुपें उणा रतिपती । आरक्त शोभे अंगकांती ।
अंगसुवासें दिशा कोंदती । भ्रमर येती धांवोनियां ॥१५॥
ऐसा तो पुरुष पाहतां । मज वाटली आश्चर्यता ।
मग मी जाहलों पुसता । पराशर सुता तयासी ॥१६॥
तूं कवण आलास कोठून । ऐसें ऐकून माझें वचन ।
पुरुष बोलला हर्षें करुन । मज लागोन तेधवां ॥१७॥
पुरुष म्हणे विष्णुसुता । अनंत सृष्टीचा असोन कर्ता ।
तूं भ्रांतवत पुसासी मज आतां । तरीं तत्वतां श्रवण करीं ॥१८॥
तुझे जृंभेपासोन उत्पन्न । मी आहें तुझा नंदन ।
आवडेल तें नामाभिधान । ठेवोन स्थान मज देयीं ॥१९॥
मग मी पावलों परमतोष । गौरविला तेव्हां तो पुरुष ।
वर अर्पिले त्यास मी विशेष । पुत्रत्व स्नेहें करोनियां ॥२०॥
त्रैलोक्याकर्षणीक्षम । तुझें सामर्थ्य अतिउत्तम ।
तूतें मंगल असो परम । जगतांमाजी निर्धारीं ॥२१॥
पंचभूतांपासोनि निर्भय । तूं असावें सुंदरकाय ।
आणीक एक सांगतों उपाय । ऐक आतां मत्पुत्रा ॥२२॥
तूं क्रोधें आलिंगिसील ज्यास । तो शतचूर्ण होईल आसमास ।
ऐसें ऐकतां त्यास । प्रमोद जाहला तेधवां ॥२३॥
केली तयानें तेव्हां गर्जना । शक्र जाहला कंपित मना ।
देव पळती टाकोन स्थाना । स्वकीय अंगना समवेत ॥२४॥
मजपासोन पावतां वर अद्भुत । तेणें मज करोन दंडवत ।
मग निघाला तो माझा सुत । मार्ग चालत आनंदभरें ॥२५॥
सर्पास जैसें पयःपान । विषवृद्धीसि होय कारण ।
तैसें माझें वरदान। तयासि जाण जाहलें ॥२६॥
त्याचे मनीं उठला संशय । म्हणे माझें पुण्य काय ।
कैसेंनि सत्य वरचय । याची सोय पाहणें असे ॥२७॥
न करितां तपोदान । नाहीं केलें अध्ययन ।
चतुर्मुखाचें वरदान । सत्य कशानें हो होईल तें ॥२८॥
आतां आलिंगोन ब्रह्मयाशी । वेगें पाहावें प्रत्ययाशी ।
ऐसा विचार करोनि मानसीं । सत्यलोकांसि आला पुन्हां ॥२९॥
दोर्दंडें मजला उचलोन । तेणें पाहिलें तोलोन ।
माझें करावया आलिंगन । सर्साऊन आला पुढें ॥३०॥
मग मी सरोनियां मागें । तयासि भरलों बहुरागें ।
तेव्हां तो होवोनियां मागें । उभा राहिला सन्मुख ॥३१॥
मज येवोनि क्रोध अद्भुत । त्याचा धिःकार केला बहुत ।
तयासि बोललों क्रोधयुक्त । मूर्ख अत्यंत कैसा तूं रे ॥३२॥
पुत्रस्नेहें दिधले वर । तूं तर येथेंच पाहसी चमत्कार ।
तरीं दैत्य दुष्ट होशील सत्वर । सिंदुरासूर नाम तूझेम ॥३३॥
परमात्मा गजान । तो तूंतें वधील जाण ।
सुगंधासुररक्तमर्दन । स्वदेहासि करील तो ॥३४॥
ऐसी ऐकोन माझी वाणी । दैत्य धांवला आरडोनी ।
मग मी पळालों तेथुनी । वैकुंठभुवनीं प्रवेशलों ॥३५॥
तेथें परमात्मा सनातन । सिंव्हासनी मधुसूदन ।
करितां त्याचें दर्शन । आले रुदन मजलागीं ॥३६॥
मग त्यानें धरोनि मज पोटीं । म्हणे कां होतोस आत्मजा कष्टी ।
मग मी सांगितली सकल गोष्टी । तंव पाठोपाठीं पावला तो ॥३७॥
गर्जना करी भयंकर । त्यासि पाहोनियां श्रीधर ।
वचन बोले अतिमधुर । ऐके असुर निश्चलपणें ॥३८॥
हरी म्हणे गा ऐक सुमती । मी सात्विक न जाणे युद्धगती ।
ब्रह्मा ब्राह्मण हा निश्चिती । तुजप्रति न पुरेल हा ॥३९॥
जगताचा करणार संहार । तुजसी युद्ध करील हर ।
ऐसें ऐकोन वचनसार । वेगें असुर परतला ॥४०॥
मुखें करी शब्द थोर । तेणें कांपे चराचर ।
मार्गीं जातां तरुवर । करी चूर पादघातें ॥४१॥
वेगें गेला तो कैलासीं । तेथें अवलोकी शंकरासी ।
विभूती चर्चिली अंगासी । दिसे तापसी अतितर ॥४२॥
ध्यानीं निमग्न कैलासपती । अर्धांगीं विलसे गिरिजासती ।
वीरभद्रादि गण भोंवती । भयें कांपती थरथरां ॥४३॥
पाहतां तो ऐसा तापसी । दानव विचार करी मानसीं ।
युद्ध करणें अयोग्य यासी । याचे प्रियेसि न्यावें आतां ॥४४॥
दुष्टबुद्धी पाहोनि असुर । आर्या कांपे थरथर ।
दुष्टे तिचे कुरळ सुंदर । धरोन सत्वर उचलिली ॥४५॥
दशाननें जैसी सीता सती । तैसी वाहोन स्कंधावरती ।
निघता जाहला शीघ्रगती । गण पाहती चित्रवत ॥४६॥
गौरीस घेऊनि गेला दानव । आक्रोशें रडती गण सर्व ।
ध्यान विसर्जोन सदाशिव । म्हणे तयांसि तेधवां ॥४७॥
कोणी तुम्हास केलें पीडन । त्याचें आतां करीन कंदन ।
गण म्हणती गौरीनिधान । गेला घेऊन असुरबळी ॥४८॥
ऐसी ऐकतां त्याची वाणी । क्रोधें संतप्त शूलपाणी ।
नंदीवरी आरुढोनी । तेव्हां तेथूनि निघाला ॥४९॥
व्योममार्गे लागवेगीं । असुर गाठला तेणें मार्गीं ।
तंवा आक्रंदे कोमलांगी । म्हणे प्रसंगीं कोण त्राता ॥५०॥
सिंहनादें गर्जे शिव । तेणें दुमदुमिल्या दिशा सर्व ।
मागें फिरोन पाहे दानव । तंव शर्व तयास म्हणे ॥५१॥
मूर्खा सांडी माझी कांता । नाहीं तरीं मारीन आतां ।
गौरी स्मरे निजसुता । मयूरेशा धांव म्हणे ॥५२॥
तंव ब्राह्मणाचा धरोनि वेष । तेथें पातला मयूरेश ।
तेणें केला दानव वश । म्हणे गुणेश तयातें ॥५३॥
हिचा पती जिंकशील जेव्हां । त्रिपुरसुंदरी लाभेल तेव्हां ।
ऐक विचार माझा बरवा । मग दानवा युद्ध करी ॥५४॥
युद्धप्रसंगीं तूं गुंततां । निष्टून जाईल अद्रिसुता ।
मजपाशीं तीतें ठेव आतां । मी रक्षिता इजलागीं ॥५५॥
ब्राह्मणाचें ऐकोन वचन । त्यापाशीं ठेवोन गिरिजारत्न ।
दानव बोले गर्जोन । शिवास पाहोन तेधवां ॥५६॥
माझे नासामहद्वातें । कंप होतो कनकाद्रीतें ।
तो काय मत्स्यकाकातें । भिवोन ईतें सोडितों ॥५७॥
आंगीं असेल शौर्य जरीं । तरीं संग्राम मजसी करी ।
रणीं जिंकोन मज सुंदरी । घेऊनि मंदिरीं मग जावें ॥५८॥
जरी पौरुष नसेल तुला । तरीं दुजी वरी सुंदरबाला ।
ऐसें बोलोनियां बोला । सर्सावला युद्धासी ॥५९॥
रणमदें दोघे मस्त । युद्ध करिती तेव्हां अद्भुत ।
मयूरेश तेव्हां येऊनि गुप्त । परशुघात मारी तया ॥६०॥
परशुघातें दुखावला । तव शिवें शूल मारिला ।
तेणे दानव म्लान जाहला । द्विज बोलला तयाशी ॥६१॥
द्विज म्हणे गा हीनशक्ती । कांहीं विचार करी चित्तीं ।
त्रिभुवननायक हा पशुपती । त्यासि शक्ती न पुरे तुझी ॥६२॥
सोडोनियां त्याची सुंदरी । सुखें तूं गृहीं गमन करी ।
ऐसें ऐकतां ते अवसरीं । सुरवैरी परतला ॥६३॥
वेगीं गेला भूलोकाशी । सोडोनियां गिरिसुतेशी ।
अंबा पुसे त्या विप्राशी । बा आलासि कोठोन तूं ॥६४॥
तुंवा बहुत उपकार केले । दानवापासोन सोडविलें ।
ऐकतां तिशीं द्विज बोले । मुक्त केलें शिवें तुजला ॥६५॥
ऐसें बोलोन दीननाथें । प्रगटिलें रुप आपलें तेथें ।
वंदोनि तिचे चरणातें । म्हणे माते मी पुत्र तुझा ॥६६॥
त्रेतायुगीं तुज लागुन । सांगितलें आठवी वचन ।
आतां तुझे उदरीं येऊन । सिंदुर मारीन क्षणमात्रें ॥६७॥
ऐसें बोलतां ते क्षणीं । गुप्त जाहला परशुपाणी ।
शोकें मूर्च्छित पडे रमणी । शिव सांवरोनि धरी तिला ॥६८॥
शंभू म्हणे ऐक सुंदरी । मयूरेश येईल तुझे उदरीं ।
त्याचे वचनीं विश्वास धरी । सर्वांतरीं तोच असे ॥६९॥
तिचे करोनि समाधान । गेला कैलासी घेऊन ।
पाहतां गण आनंदोन । करिती वंदन तयाचें ॥७०॥
सिंदुरासुर येवोन भूतळीं । तेणें जिंकिली राजमंडळी ।
अधर्म करुं लागला बळी । गोब्राह्मणास मारी सदां ॥७१॥
कोठें न चाले अनुष्ठान । राहिलें वेदशास्त्रध्ययन ।
जपतपध्यानपूजन । कोणालागुन करुं नेदी ॥७२॥
पाडोन टांकिली देवालयें । ऋषि पळाले त्याचे भयें ।
मेरुगुहेंत करोनि सोये । राहते जाहले मुनिसुर ॥७३॥
स्वाहास्वधावषट्कार । कोठें होऊ नेदी असुर ।
अधर्म माजला अवनीवर । करिती विचार देव तेव्हां ॥७४॥
गीष्पती सांगे वृंदारकां । आतां आराधा विनायका ।
तो तुमचें संकट हरणार निका । एक आहे जगत्रयी ॥७५॥
ऐकोनियां गुरुचें वचन । देव करिती अनुष्ठान ।
त्यांचें उग्र तप दारुण । अवलोकुन गजानन प्रगटला ॥७६॥
कोटिसूर्य तेजागळा । गणेश पाहोनि तयेवेळां ।
देव नमिती पादकमळा । स्तविती त्याला सद्भावें ॥७७॥
गणेश बोले सुहास्यवदन । मी शिवालयीं अवतार धरुन ।
करीन सिंदुसुराचे कंदन । स्वस्थ मन तुम्ही करा ॥७८॥
ऐसी वदोन वरदवाणी । गुप्त जाहला मोदकपाणी ।
तंव गौरी जाहली गर्भिणी । तेणे रमणी सतेज दिसे ॥७९॥
डोहाळे होती पार्वतीशी । उत्साह वाटे शिवासी ।
अंकीं घेऊनियां तिशीं । म्हणे इच्छिसी काय मनीं ॥८०॥
नगजा जाहली लज्जायमान । बोले खालीं मान घालून ।
एक इच्छितें माझें मन । रम्य वन वसवावें ॥८१॥
ऐकतां डोहाळे तयेचे । प्रमोदित मन शंकराचें ।
संगे घेऊनि भार गणाचे । बैसे नंदीचे पाठीवरी ॥८२॥
अग्रीं गिरिजा दोहदवती । घेऊनि निघाला पशुपती ।
सप्त कोटी गण चालती । मागेंपुढें तेधवां ॥८३॥
येऊनियां अवनीवर । वन पाहिलें मनोहर ।
तेथें विश्रांती घेत हर । गिरिजा सुंदर आनंदली ॥८४॥
स्वच्छ शीतल मधुर नीर । कर्दली वनें भोंवतीं सुंदर ।
पुष्पवल्ली पुष्पभार । निरंतर विकसिती ॥८५॥
अशोक काजु फणस ताल । देवदारु सुरु सरल ।
रसाळ नारळीं तमाल । तरु विशाल उंचावले ॥८६॥
कोमलपल्लव सुफलेंशी । द्रुमयुक्त अहर्निशी ।
ऐसें पाहोनि मानसीं । गिरिजेसि आल्हाद पैं ॥८७॥
गौरी म्हणे प्राणेश्वरा । येथेंच आतां वास करा ।
शंकरें घालवोन मंडप बरा । तेथें दारा स्थापिली ॥८८॥
दुर्गेस सांगे दुर्गापती । तुवां येथें करावी वस्ती ।
मी जातों कैलासाप्रती । तुजभोंवतीं ठेवितों गण ॥८९॥
तूतें सकल संपदा । हें गण पुरवितील सदां ।
किमपी नाहीं येथें आपदा । खंती कदां करु नको ॥९०॥
ऐसें सांगोन पार्वतीस । कैलासीं गेला आशावास ।
त्रिदश तेथे करिती वास । धरुनि आस कल्याणाची ॥९१॥
भरितां नवमास परिपूर्ण । अवतरला गजकर्ण ।
अंबा पाहे हर्षें करुन । सनातन तेधवां ॥९२॥
किरिट कुंडलें मंडित वदन । करीं मोदक भाळीं चंदन ।
कटितटीं नागबंधन । मिरवे धयन कमनीय ॥९३॥
मुक्तादामें शोभती कंठीं । मृगनद शोभें ललाटीं ।
दंततेज बिंब ओठीं । वारंवार फांकतसे ॥९४॥
ऐसें पाहतां तें निधान । पार्वती गेली घाबरुन ।
तयासि बोले प्रेमें करुन । मधुर वचन तेधवां ॥९५॥
कवण गा तूं पुरुषोत्तम । मज सांगे आपलें नाम ।
ऐकतां बोले पूर्णकाम । देवसत्तम तेधवां ॥९६॥
त्रेतायुगीं मी तुझे उदरीं । अवतरलों भक्तकैवारी ।
तोच मी ये अवसरीं । तुझे मंदिरीं प्रगटलों ॥९७॥
करावया भूभारहरण । आतां होतों तुझा नंदन ।
पूर्वीं पावतां अंतर्धान । दिल्हें वचन हेंच तुला ॥९८॥
तें करावया मित । मी आलों गे अनंत ।
ऐकतां आनंद भरित । तयासि बोलत पार्वती ॥९९॥
पुत्रत्वाचा घडविशी योग । परीं पुन्हां न व्हावा वियोग ।
ऐसें ऐकोन भवभयभंग । म्हणे सांग सुख देईन ॥१००॥
ऐसें बोलोनियां भक्तवाली । मायावरी माया घाली ।
रुपांतर तयेवेळी । सिद्धिबुद्धीसहित धरी ॥१॥
चतुर्भुज रक्तकांती । आयुधें मोदक धरिला हातीं ।
रत्नखचित मुगुटदीप्तीं । भ्रमर रुंजती कटावर ॥२॥
सरळ शुंडादंड विलसे । कांसे पीतांबर शोभतसे ।
रुदन करी बाळ असे । अंबेस भासे प्रसूतविधी ॥३॥
वेदना सोसून पाहे सुत । तंव तीतें भासे विपरीत ।
म्हणे प्रालब्ध काय हें अद्भुत । जाहलें महद्भूत मजलागीं ॥४॥
गजशुंडायुक्त बाळ पाही । त्रिभुवनामाजी ऐकिला नाहीं ।
चतुर्मुखादी देव सर्व तेही । पाहतां हास्य करितील ॥५॥
म्हणोनि रडे करी आक्रोश । हें जाणोन तेथें पातला ईश ।
तो म्हणे निज प्रियेस । कां गे दुःखास करितेसी ॥६॥
अनादि निधन हा अनंत । शुंडादंडें विराजित ।
तोच हा जाहला तुझा सुत । पाहा निश्चित विचारुन ॥७॥
ऐकतां स्वामीचें वचन । गौरी घे बाळ उचलोन ।
स्फुट बोले बाळवचन । लावोनि कान ऐकती तें ॥८॥
माहिष्मती महापुरि । वरेण्यराजा राज्य करी ।
पुष्पिकानामें त्याची सुंदरी । प्रसूत तरीं जाहली आतां ॥९॥
तिणें बहुत तप केलें । पुत्रत्व माते मागीतलें ।
तें पाहिजे फळ दीधलें । तयेप्रति पितर हो ॥११०॥
ती जाहली आहे प्रसूत । रक्षित आहे तिचा सुत ।
ती आहे जंव निद्रिस्थ । घाला त्वरित नेऊनियां ॥११॥
पुन्हां तुमचे येईन दर्शना । उभयतांचे करीन सेवना ।
सिंदुराचें करीन मर्दना । धर्म स्थापीन अवनीवरी ॥१२॥
ऐसी ऐकतां त्याची वाणी । नंदीस पाचारोनि शूळपाणी ।
शंकर सांगे तयालागुनी । येव्हडें कार्य वेगीं कर ॥१३॥
माहिष्मतीचा राजा सतेज । प्रसूत जाहली त्याची भाज ।
तेथें नेऊन पार्वतीज । आतां तुवां ठेवावा ॥१४॥
नंदीनें वंदोन शिव पाय । तेणें उचलिला महाकाय ।
अंबा नेतां पाहे तनय । सखेद होय तेधवां ॥१५॥
पुष्पिकेचे अरिष्टांत । नंदी ठेऊनि अकस्मात ।
पुन्हां शिवापासीं येत । आकाश गती करोनियां ॥१६॥
करुनि शंभूस नमस्कार । मार्गांतील समाचार ।
घेऊन जातां तुझा कुमर । विघ्न दुस्तर वोढवलें ॥१७॥
एक राक्षसी भक्षित सुत । मजवरी धांवली अवचित ।
तीतें मारोन पुच्छघात । बोळविली मृत्युपंथें ॥१८॥
पुढें करीत असतां गमन । तंव दुष्ट गंधर्व आलें धाऊन ।
मी भ्यालों तयांसि पाहून । केलें स्मरण मग तुझें ॥१९॥
मग मी तेव्हां धरोन धैर्य । पुच्छें बांधला त्यांचा समुदाय ।
आपटोनि मारिले महाकाय । कितीक उडविले हुंकारें ॥१२०॥
कांहीं मारिले पदघातें । ऐसें निवारोन विघ्न निरुतें ।
मग राजगृहीं बाळकातें । ठेऊनियां पातलों ॥२१॥
ऐकोन त्याची ऐसी वाणी । शाबास म्हणे शूळपाणी ।
मग नंदीस आलिंगुनी । करी प्रशंसा तयाची ॥२२॥
स्वस्ति श्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराण संमत ।
क्रीडाखंड रसभरित । एकोनत्रिंशतितमोध्याय गोड हा ॥२३॥अध्याय॥२९॥ओव्या॥१२३॥
अध्याय एकोणतिसावा समाप्त