क्रीडाखंड अध्याय २४
श्रीगणेशाय नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।
ॐ नमोजी सनातना । अप्रेमया गौरीनंदना ।
भक्तसंसारदुरितभंजना । निरंजना जगत्पते ॥१॥
द्वादशवर्षीं विश्वव्यापकें । दाविला पराक्रम विनायकें ।
त्रयोदश वर्षीं अंबाबालकें । काय कौतुकें केली लीला ॥२॥
एके दिवसीं पार्वतीपती । अंगास चर्चोन दिव्य विभुती ।
शंकर तेव्हां ध्यान करिती । एकाग्र मती करोनियां ॥३॥
खेळ खेळे बाळकांसहित । तेथें पातला गौरीसुत ।
शिवमुगुटीं चंद्र झळकत । गणेश घेत तयास पैं ॥४॥
चंद्र घेऊनि बाळकमेळीं । खेळावया वनीं तयेवेळीं ।
जाता जाहला वनमाळी । खेळ खेळे यथारुची ॥५॥
तंव पातला मंगलासुर । विक्राळवदन महाक्रूर ।
कपटें जाहला तो सूकर । वज्रसम दाढा ज्याच्या ॥६॥
जैसा अंजनाचा पर्वत । पदन्यासें मही कांपवित ।
तेणें लक्षोन गौरीसुत । आला धांवत तयावरी ॥७॥
बाळें दशदिशा पळती । गुणेशें धावोन चपळगती ।
त्याची दाढी धरिली हातीं । तोंड धरिलें वाम करें ॥८॥
चिरोन टांकिला जैसा कळंक । दश योजने असुर देख ।
पडले तेव्हां वृक्ष अनेक । चूर्ण जाहले तेधवां ॥९॥
पाहतां असुराचें प्रेत । पुन्हा बाळें पातलीं धांवत ।
त्यांचें संगें क्रीडा करित । अंबासुत तेधवां ॥१०॥
ध्यान विसर्जोन मदनांतक । पाहे तव न दिसे सशांक ।
गणास म्हणे गौरीनायक । माझा संशाक काय जाहला ॥११॥
क्रोधें जाहले आरक्तनयन । शंकरगणांस रागें भरुन ।
म्हणे कसें करिता रे अवन । द्या भरोन चंद्र माझा ॥१२॥
जेणें नेला माझा शशी । भस्म करीन रे तयाशी ।
ते भयें बोलती शंकराशी । नेलें चंद्रासी विनायकें ॥१३॥
शिव म्हणे आतांच जावें । त्या दुष्टासी धरुन आणावें ।
प्रथम म्हणोनियां बरवें । धांवत आले तयापाशीं ॥१४॥
गण दर्डावोनि बोलती । चोरा चल शिव पाचारिती ।
तुजला लागली दुष्ट संगती । म्हणे गणपती तयातें ॥१५॥
जगन्माता माझी जननी । मी काय मोजितों तुम्हालागुनी ।
गुणेशें तेव्हां हुंकारुनी । गणालागुनी उडविलें ॥१६॥
महावातें शुष्कतृण । तैसें शिवापाशीं पडले गण ।
हें जाणोनि भोगिभूषण । नेमीं गण प्रमथादी ॥१७॥
तयांसि आज्ञा करी शंकर । जा बांधोन आणा तस्कर ।
ते धांवोनियां सत्वर । नगजाकुमर शोधिती ॥१८॥
त्यातें पाहतां जगज्जीवन । तेथें पावला अंतर्धान ।
गण धुंडिती रानोरान । गौरीनंदन सांपडेना ॥१९॥
स्वर्गमृत्यूपाताळ । शोधिलीं त्याहीं स्थानें सकळ ।
प्रयत्नें पाहोनियां विकळ । भयें विव्हळ जाहले ॥२०॥
ते म्हणती दीनदयाळा । मृत्यू पातला आमचे कपाळा ।
काय सांगावें जाश्वनीळा । तुझी कळा न कळे तया ॥२१॥
पाहोनि त्याचे प्राणसंकट । गुणेश जाहला तेव्हां प्रगट ।
त्यांही धरोनियां विकट । रज्जूनें बळकट बांधियेलें ॥२२॥
उचलोनियां नेऊ पाहती । परी न हाले जगत्पती ।
प्रयत्न करितां खुंटली मती । येउनी सांगती शिवासी ॥२३॥
प्रळयकाळीं क्षोभे जैसा । पार्वतीसी दिसे तैसा ।
अश्रू ढाळी तेव्हां डोळसा । म्हणे कसा उपाय करुं ॥२४॥
रागें क्षोभला करुं काये । मर्जीपुढें बोलतां नये ।
अपराध केला काय तनयें । त्याची सोय नाणी मना ॥२५॥
थरथरां समोर कांपे गौरी । क्रोधें न पाहे मदनारी ।
शिव नंदीतें हाका मारी । कां रे दूरी पळतोसी ॥२६॥
तो येउनी लागे पायां । आज्ञा द्यावी देवराया ।
उचलोन आणितों तुझ्या तनया । काय माया करील त्याची ॥२७॥
तुझें कृपेंकरुन शंकरा । ब्रह्मांडगोळ उचलीन सारा ।
शिव म्हणे करीं त्वरा । त्या तस्करा आण वेगी ॥२८॥
शिवासी करोनियां नमन । तेथें गेला गर्वित मन ।
कांखामाजी शिंगें घालुन । पाहे हालऊन तयातें ॥२९॥
अनंत ब्रह्मांडाचा स्वामी । न हाले म्हणुनी जाहला श्रमी ।
मग म्हणे रे माझ्या स्वामी । चला धामी शिव बाहतो ॥३०॥
गुणेशें हुंकार सोडिला । त्या वायूनें उडोनि गेला ।
शिवचरणापाशीं पडला । नंदी जाहला मूर्च्छित पैं ॥३१॥
क्रोध न साहे सर्वज्ञाशी । मीच जाऊनि आणीन त्याशीं ।
अंबा पाहे भाळीं शशी । ती प्रमथाशी दावी खुण ॥३२॥
ते म्हणती देवाधिदेवा । भाळीं आधीं चंद्र पहावा ।
मग तूं तयासी आणावा । हात लावावा भाळासी ॥३३॥
चंद्र आहे तुमचे भाळीं । पार्वती म्हणे तयेवेळीं ।
उगीच मांडली घरांत कळी । चंद्रमौली हास्य करी ॥३४॥
तव अंकीं देखे निजनंदन । वामांकीं बसवी अंबारत्न ।
पुत्रत्वाचें दाविलें चिन्ह । देवसमान दोघेही ॥३५॥
मोडली पितापुत्रत्वाची कळी । आनंदली गणमंडळी ।
आपले गृहीं तयेवेळीं । जाते जाहले कौतुकें ॥३६॥
त्रयोदशवर्षामाजी लीळा । ऐसी जाहली गा भूपाळा ।
चवदावें वर्ष गुणेशाला । लागतां जाहला वृत्तांत कसा ॥३७॥
गौतमादि महामुनी । येते जाहले गौरीभुवनीं ।
त्यास पाहोनियां भवानी । आनंदोनी आसन दे ॥३८॥
करोनि त्याचें पूजन ॥ अंबा बोले सुहास्यवदन ॥
त्रिसंध्याक्षेत्र दिल्हें सोडुन । येथें येऊन राहिलों ॥३९॥
तथापि नंदनास विघ्नें येती । येथें व्हावी विघ्नशांती ।
ऐसा उपाय तुह्मी सुमती । मजप्रती सांगा वेगीं ॥४०॥
ऋषि ह्मणती इंद्रयाग । करिता होयील विघ्नभंग ।
पार्वती जाऊनियां लगबग । आज्ञा मागे शंकराशीं ॥४१॥
केली यागाची तयारी । ऋषि गर्जती मंत्रोच्चारी ।
अग्नी भडकला कुंडाभीतरी । दुरोनी विघ्नारी पाहतसे ॥४२॥
तव कल आणि विकल । दोघे दैत्य क्रूरसबल ।
माहिषरुप धरोनि खल । आले तात्काळ झुंझत ॥४३॥
गौरीनंदनासी मारावयातें । ते पातले यज्ञवाट मुखातें ।
निकुरें जाहले दोघे भिडते । मार्गी वृक्षातें मोडिती ॥४४॥
खणखणा वाजती शृंगें विशाळ । तेणें कांपती ऋषि सकळ ।
पदघातें अवनीमंडळ । कांपे चळचळ तेधवां ॥४५॥
अक्राळविक्राळ आरडती । बाळें पाहोनि तेव्हां पळती ।
एकला उभा गणपती । पाहोन लोटले तयावरी ॥४६॥
महालाघवी जगत्पती । त्यांची पुच्छें धरोनि हाती ।
आपटिले अवनीवरती । चूर्ण होती शतघातें ॥४७॥
राक्षसानीं प्राण सोडिले । पूर्वरुपें पावोनि पडलें ।
ऐसें पाहोनियां धांवले । बाळ आले समीप पैं ॥४८॥
विजयी पावोनि सर्वेश्वर । देव वर्षती पुष्पभार ।
बाळकांशीं क्रीडे कुमर । यज्ञभार पाहतसे ॥४९॥
शक्रयाग पाहतां जगज्जीवन । होता जाहला क्रोधायमान ।
यज्ञमंडपीं देवें येऊन । टांकिली उचलोन इंद्रमूर्ती ॥५०॥
यज्ञसामुग्री भिर्काविली । अग्निज्वाला शांत केली ।
पाहतां पार्वती चकित जाहली । विघ्नेश बोले ऋषींप्रती ॥५१॥
धरितां अजापुत्राचे पाय । तो करील सिंव्ह कृत्य काय ।
नाहीं तुह्मां तार्किक ज्ञानसोय । ह्मणावें काय प्राज्ञाप्रती ॥५२॥
करितां यागाचें विदारण । स्वगृहीं गेले तेव्हां ब्राह्मण ।
परी क्षोभला शचीरमण । विघ्नदारुण तेणें केलें ॥५३॥
वन्हीस म्हणे पुरंदर । मयूरेशाचें वर्जपूर ।
काय करील अंबाकुमर । तें सत्वर पाहेंन मी ॥५४॥
वह्नीनें स्वरुप आच्छादिलें । तेव्हां प्राणी घडबडले ।
नगरामाजीं पाक राहिले । अग्नी न मिळे कुंडांतही ॥५५॥
ऋषि ह्मणती देवाधिदेवा । रुष्ट जाहला आतां मघवा ।
यज्ञालागीं अग्नी द्यावा । विचार करावा बरा तुवां ॥५६॥
हासोनियां अंबाकुमर । उत्पन्न करी वैश्वानर ।
आनंदले तेव्हां नर । पुरंदर खिन्न जाहला ॥५७॥
आपला उद्योग व्यर्थ गेला । शक्र म्हणे समीरणाला ।
तूं आटोपी प्राणकला । वायू तयाला होय ह्मणे ॥५८॥
मयूरेश नगरीचे प्राणी सर्व । पावते जाहले प्रेतभाव ।
हें पाहोनियां देवाधिदेव । करी अभिन्नव वायुस तो ॥५९॥
हडबडोनी सर्व उठले । पाहतां इंद्राचें चित्त क्षोभलें ।
ह्मणे याशी उपाय न चले । जाहले अपाय व्यर्थ कसे ॥६०॥
रवीस म्हणे पुरंदर । तापोनि जाळीं नगर ।
द्वादशकला दिनकर । तापे सत्वर तेधवां ॥६१॥
वापीकूपनदीसलिल । आटोन गेलें तापें तत्काळ ।
औषधीवृक्ष मेले सकळ । लोक विव्हल जाहले ॥६२॥
ऐसें पाहतां देवाधिदेव । करी मेघांचा वर्षाव ।
हें पाहोनियां वासव । म्हणे हांव सरली माझी ॥६३॥
हा आदिपुरुष सनातन । मी होवोनियां मायाधीन ।
क्षोभविलें तयालागुन । कैसें अवन होईल माझें ॥६४॥
पश्चात्तापें खिन्न अंतरीं । शरण पातला तेव्हां वृत्रारी ।
दंडवत पडे भूमीवरी । त्राहीं त्राहीं ह्मणतसे ॥६५॥
शरण्यसाधू सर्वोत्तमा । माझे अपराध करीं क्षमा ।
गुणेश ह्मणे देवोत्तमा । मनी गर्व न धरीं तूं ॥६६॥
शतावधीं इंद्रकोटी । माझे वसती कि रे पोटीं ।
तूं गर्व धरिशी कशासाठी । आत्मदृष्टी तुज नाहीं ॥६७॥
येथून वर्तावें सावधान । करावें साधूंचें अवन ।
मग त्याचे शिरीं कर ठेऊन । तयालागुन बोळविलें ॥६८॥
पंधरावें वर्ष मयुरेशाशी । लागतां जाहली क्रीडा कैशी ।
बाळकें घेऊनि एके दिवशीं । गेला वनाशी क्रीडावया ॥६९॥
स्नान करोनियां अंबासुत । मानसपूजा येकांतीं करित ।
महाबल नामे असुर अद्भुत । गर्जना करीत पातला ॥७०॥
त्याचा ऐकोन शब्दथोर । पळते जाहले ऋषिकिशोर ।
बाहेर आला गौरीकुमर । पाहे असुर व्याघ्ररुपी ॥७१॥
आपण होऊनियां शार्दूल । कुंजांत गेला तत्काळ ।
त्याशीं करुनी युद्ध तुमुल । केला विव्हळ तयासी ॥७२॥
मग व्याघ्र काढोन बाहेर । पुच्छकर्ण छेदी लंबोदर ।
निजरुप धरोनी असुर । केलें घर जवळ तेणें ॥७३॥
मुलें पळालीं व्याघ्रभयें । तीं शोधिलीं गौरीतनयें ।
वनी न सांपडतां महाकाये । केलें येणें ग्रामामधें ॥७४॥
एकला येतां विनायक । पुसती बाळकांचे माताजनक ।
कोठें आहेत आमचे बाळक । ते दावी लवलांहीं ॥७५॥
बाळें वनीं फिरतां श्रमलीं । सीतल वृक्षा तळीं निजलीं ।
तंव फेरी फिरत आली । अंतकाची तयास्थळीं ॥७६॥
दक्षण दिशेस पाय करुनी । निजलें ऐसें अवलोकुनी ।
यमें नेलीं सर्व उचलोनी । निजसदनीं ठेविलीं हो ॥७७॥
न देखोनी ग्रामी बाळकांशीं । गुणेश विचार करी मानशीं ।
यमे उचलोनी नेलें त्याशीं । हें देवासीं समजलें ॥७८॥
क्रोधे जाहले आरक्त नयन । यमलोकीं गेला गौरीनंदन ।
दूत सांगती यमालागुन । महद्भयें करोनियां ॥७९॥
ऐकोनि दूतांचें वचन विव्हल । रेडयावरी बैसला तत्काल ।
यम बाहेर येऊनी बोल । विचित्र बोले तयाशीं ॥८०॥
मी प्राणिमात्रांशीं दंड करितां । तूं काय करशील गौरीसुता ।
विनायक ऐसें वचन ऐकतां । काय करितां जाहला ॥८१॥
करोनियां उड्डाण । यम पाडिला आसुडोन ।
त्याचा पराक्रम अवलोकुन । सूर्यनंदन काय करी ॥८२॥
धरोनि गुणेशाचे चरण । म्हणे रक्षी शरण शरण ।
गणेश बोले हास्यवदन । राहें सावधान सूर्यजा ॥८३॥
सर्वांभूतीं ईश्वरसत्ता । हें तूं न जाणशी रविसुता ।
गर्व सांडोनियां आतां । सावधानता धरावी ॥८४॥
यमें केली त्याची स्तुती । ऐकोन संतोषला गणपती ।
बाळकें आणोनि दिलीं हातीं । तेथोन गृहापती गेला तो ॥८५॥
घेऊनियां बाळकांशी । ग्रामीं पातला हृषीकेशी ।
ऋषी स्तविती गुणेशाशी । तूं सर्वांशीं रक्षिता पैं ॥८६॥
स्वस्ति श्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराण संमत ।
क्रीडाखंड रसभरित । चतुर्विंशत्यध्याय गोड हा ॥८७॥
अध्याय॥२४॥ओव्या॥८७॥
अध्याय चोविसावा समाप्त