अध्याय १४
श्रीगणेशाय नमः । श्रीदत्तात्रेयाय नमः ।
जयजयाजी विश्वपालका । सुमुखा रे गणनायका । स्मरजन्य अघहारका । सिंदूरांतका गणपते ॥१॥
तुझी नव्हती कृपा गोमटी । संसारी होतो तेव्हा कष्टी । आता त्वत्पदसरोजसंपुटी । घालोन मिठी सुखी जाहलो ॥२॥
आता तुजशी हेच मागणे । उदारे तुवा द्यावे देणे । इहलोकी सद्भोग भोगणे । अंती स्मरणे त्वन्नामे ॥३॥
श्रोते आता सावध व्हावे । पूर्वानुसंधान आठवावे । पुढील चरित्र अवधारावे । मग भोगावे भक्तिवैभव ॥४॥
व्यास म्हणे गा कमलासना । ऐकिले त्रिपुरव्याख्याना । आनंद वाटे माझा मना । गणेशकथा श्रवणार्थी ॥५॥
कोणे दिवसी वधिला असुर । कोठे राहिली अंबा सुंदर । कोण्या व्रते महेश्वर । मनोहर पावली ॥६॥
ब्रह्मा म्हणे ऐक आता । पुण्यपरायण गणेशकथा । निशिदिनी कथन करिता । आल्हादता ह्रदयासी ॥७॥
कार्तीकमासी पौर्णमेसी । जाता तरणी अस्तमानाशी । त्रिभुवन कंटक दुःखराशी । त्रिपुरासी वधिले शिवे ॥८॥
त्रिपुरीचा त्रिपुरोत्सव । करिता पावे सकल वैभव । म्हणोनि त्या पौर्णिमेसी शिव । धरोनि भाव अर्चावा ॥९॥
त्रिकाल करिता शिवपूजन । तेणे तुष्टे गजानन । शतजन्मकृतपापशमन । गौरीमनरंजन करीतसे ॥१०॥
प्रदोषकाळी देवमंदिरी । दीपशोभा करावी साजिरी । तेणे तोषे कंदर्पारी । त्यासि तारी जगदात्मा ॥११॥
त्रिपुरनाशविजयध्वनी । गव्हरे ऐकोनि भवानी । अंतःकरणी संतोषोनी । गव्हराबाहेरी निघाली ॥१२॥
एकट वनी ग्रावतनया । घोरविपिन पाहोनिया । मग पावली भीरु भया । कापे काया थरथरा ॥१३॥
कंटकलता गुल्माकीर्ण । निबिड अंधार पडला जाण । व्याघ्ररी समत्त वारण । गेंडेहरिणेंसांबरेगवे ॥१४॥
पंचानन पादोदर । वनी पाहूनिया अपार । रुदन करी तेव्हा सुंदर । हाका मारी जनकासी ॥१५॥
हे तात हे तात मज एकली । तुवा कारे उपेक्षिली । तू मजसुखाची साउली । ये माउली भेट वत्सा ॥१६॥
क्षणे म्हणे प्राणनाथा । पंचवदना जगन्नाथा । तू न जाणसी माझी व्यथा । सर्वज्ञता व्यर्थ तुझी ॥१७॥
तुझा वियोगानल दग्ध करी । शून्य वाटे चराचरी । धाव पाव त्रिपुरारी । आपली सुंदरी शांतवी का ॥१८॥
पुन्हा म्हणे हिमालया । श्वापदे खातील तुझी तनया । का त्यागिली माझी माया । आता अपाया करीन मी ॥१९॥
पूर्वी करिता प्राणत्याग । तुवा करविला शिवयोग । पुन्हा करवी मजला सांग । शिवसंग दयाळा ॥२०॥
ऐसी विलपता ती दुःखवचनी । निषादे ऐकोनिया कानी । जाऊनि कथिले नगालागुनी । रडते वनी त्वत्तनया ॥२१॥
ऐकोनिया धरणीधर । धाऊनि आला तेथे सत्वर । भयशोके व्याकुळ सुंदर । समजावी भूधर तियेसी ॥२२॥
हिमनग म्हणे रूपराशी । व्यर्थ वो शोक करिसी । जगन्नायका तूच होसी । प्राकृता ऐसी विलपसी का ॥२३॥
कर्तुमकर्तु अन्यथा कर्तु । यास समर्थ ईश्वरी तू । सकळ ब्रह्मांडासि पूर्ण हेतू । जगदंबे तु मी जाणे ॥२४॥
तथापि चलावे माहेरी । म्हणोनि आणिली घरी गौरी । भय टाकोनिया सुंदरी । पितृमंदिरी राहिली ॥२५॥
परी स्वस्थता न वाटे जिवाला । शिववियोगानल धडकला । तेणे तळमळे हिमनगबाळा । वियोग तिला न साहवे ॥२६॥
उदास झाली चित्तवृत्ती । दाही दिशा शून्य भासती । निद्रा न ये अहोराती । करी खंती निशिदिनी ॥२७॥
गळाली अवस्थाभूषणे । चित्त हरिले भोगिभूषणे । मग ती म्हणे व्यर्थ जिणे । प्राणेश्वरा वाचोनिया ॥२८॥
घडता त्यासि तडातोडी । जाहली शरीराची अनावडी । दीर्घ श्वासोच्छ्वास सोडी । घडीघडी उसंबत ॥२९॥
सखयासि म्हणे सुंदर । नका वारू विंझणवारा । प्राण रिघू पाहे पुरा । पिनाकधरा वाचोनिया ॥३०॥
काय तपतो रोहिणीपती । तेणे जळे अंगकांती । सुमनहार सर्प भासती । आता गती नाही बरी ॥३१॥
नका दाऊ मला दर्पण । त्यागोनि द्यावे सकलभूषण । दावा कोणी भोगीभूषण । तरीच वाचती प्राण माझे ॥३२॥
सुगंधस्नेहहरिचंदन । मज जाळी जैसा दहन । होऊनिया उदास मन । पित्यालागून पुसतसे ॥३३॥
करोनिया शोध पुरा । आणोनि भेटवी पिनाकधरा । ऐकोनिया तिच्या उत्तरा । हिमालय कथीतसे ॥३४॥
पर्वत म्हणे ऐक कन्यके । प्रसाद करिता विनायके । तुज भेटेल शिवकौतुके । उपाय ऐके सांगतो तुला ॥३५॥
गुह्याचे जे गुह्यवृत्त । ते तुज सांगतो निश्चित । विनायकी चतुर्थीव्रत । करिता एकदंत संतोषे ॥३६॥
हिमालये सविस्तर । आत्मजेस कथिला व्रतप्रकार । ऐकता म्हणे नगजासुंदर । संशय थोर मज वाटे ॥३७॥
कोणी करिता पूर्वी व्रत । प्रसन्न जाहला गणनाथ । हे सर्व कथन करी तात । संशय तेणे निरसेल पै ॥३८॥
महीधर म्हणे ऐक सुते । पूर्वी षण्मुखे शंकराते । तुज ऐसे पुसता त्याते । तुझे कांते कथियेले ॥३९॥
तोच इतिहास तुज लागुन । सांगतो ऐक चित्त देऊन । कर्दमाचे जे आख्यान । पुण्यपावन भूलोकी ॥४०॥
कर्दमाभीद राजा जनी । तेणे आकळली सर्व अवनी । इंद्रासमान भाग्य अवनी । आनंदमय क्रीडतसे ॥४१॥
भृगुनामा ऋषिसत्तम । पावला भूपतीचे धाम । राये आसन देउन उत्तम । पूजाकर्म संपादिले ॥४२॥
मग जोडोनिया उभयपाणी । राजा पुसे विनयवचनी । हे ऐश्वर्य मजलागुनी । कोण्या पुण्ये लाधले ॥४३॥
ऋषि म्हणे नृपनाथा । ऐक तुझी पूर्वील कथा । तेणे पावसील समाधानता । पुण्यवंता राया तू ॥४४॥
पूर्वी दुर्बलनामे क्षत्रियशुची । असता बाधा दरिद्राची । जाचणी तुला स्त्रीपुत्राची । संसाराची दशा तेणे ॥४५॥
न पुसता कुटुंबासी । तू गेलास महावनासी । तेथे अवलोकून सौभाग्याशी । तपोधनेसी वेष्टित ॥४६॥
दंडवत्करिता नमन । कृपेने द्रवले ऋषीचे मन । मग पुसिले वर्तमान । तुवा कथन केले त्यासी ॥४७॥
तुझे दारिद्रदुःखश्रवणे । कळवळिला ऋषि अंतःकरणे । मग म्हणे रे व्रत करणे । तुजकारणे सांगतो जे ॥४८॥
अगाध गणेशव्रतमहिमा । प्रसन्न होईल जगदात्मा । नासेल तुझी दारिद्रगरिमा । राजोपमा पावसील ॥४९॥
दुर्बल म्हणे ऋषिनायका । गणेश कोण देव निका । व्रत कैसे ते मज कथी का । तेणे हरिखा पावेन मी ॥५०॥
ऋषि म्हणे क्षत्रियवरा । जो व्यापक असे चराचरा । नित्य ज्ञानमयरूपी बरा । वेद पारा ज्याचे न पावती ॥५१॥
तोच जाणे गजानन । आता ऐके व्रतमहिमान । श्रावण शुक्लचतुर्थीपासून । व्रतारंभ करावा ॥५२॥
यावद्भाद्रपदमास । तावत्करावे व्रतास । मग करावे सांगतेस । शास्त्रविधीस जाणोनिया ॥५३॥
ऐसा ऐकता व्रतविधी । करिता झाला मग तो सुधी । संपूर्ण होता व्रतावविधी । सिद्धिबुद्धीश प्रसन्न जाहला ॥५४॥
गृहातील गेली आपदा । अनुकूल झाल्या सर्व संपदा । आपत्ती नाहीच झाली कदा । कुटुंबी मर्यादा राहटली ॥५५॥
वस्त्रालंकारयुक्तवनिता । होता आठवी स्वकीयभर्ता । मग पाठऊनिया दूता । कळवी वृत्तांता तयासी ॥५६॥
व्रत करोनि संपूर्ण । गृही पातला आनंदेकरून । मग पावला समाधान । दारिद्रशमन जाहले त्याचे ॥५७॥
पंचानन म्हणे महासेन । व्रते तोषला गजानन । क्षत्रियाचे दारिद्रशमन । करिता झाला जगदात्मा ॥५८॥
भृगू म्हणे गा कर्दमा । ऐसा आहे गणेशमहिमा । त्याचे प्रसादे भाग्यगरिमा । नृपोत्तमा पावलासी ॥५९॥
ऐकोनिया भूपती । भक्तीने अर्ची गणपती । तेणे पावला तो सद्गती । सकलभोग भोगोनिया ॥६०॥
हिमालय म्हने गे शंभुप्रिये । ऐसेच व्रत नलराये । करिता त्याची गणराये । स्वपदी सोय लावली ॥६१॥
आता चंद्रांगदाख्यान । कन्यके तुज करितो कथन । श्रवणे तुष्टतील तुझे कान । चित्त देऊन ऐके का ॥६२॥
मालवदेशी कर्णनाम । नगर होते अत्युत्तम । राजा चंद्रांगदनाम । शक्रोपम उर्वीवरी ॥६३॥
अणिमादि गुणोपेत । स्वरूपी लाजे रतिकांत । यज्वामानी विख्यात । राज्य करीत नीतीने ॥६४॥
इंदुमतीनामे त्याची वनिता । महासाध्वी पतिव्रता । ईश्वर मानोनि निजभर्ता । निशिदिनी सेवा करीतसे ॥६५॥
चंद्रास लाजवी वदनकांती । म्हणोनि नामे इंदुमती । तिचि पाहूनि सुंदरगती । हंस चित्ती विस्मित सदा ॥६६॥
तारुण्य वय असता तिचे । न कळे चरित्र कर्माचे । व्यसन लागले मृगयेचे । चित्त रायाचे व्यग्र जाहले ॥६७॥
सिद्ध करोनिया सेना । राजा निघाला महावना । इंदुमती होऊनिया विमना । जल नयना आणिले तिणे ॥६८॥
ती म्हणे गा प्राणेशकांता । अपूर्णकाम तरुणीकांता । भोगमंदिरी टाकोनि आता । तू सर्वथा जाऊ नको ॥६९॥
तिचे करोनि समाधान । राजा प्रवेशला घोर विपिन । नानाविध श्वापदे वधून । स्वनगरी पाठविली ॥७०॥
वनी फिरे आसमास । तव धावले महाराक्षस । सेना पाहाता तयास । कापू लागली थरथरा ॥७१॥
शब्द ऐकता राक्षसांचा । कितीकांची बसली वाचा । धाक धरोनि प्राणाचा । कितेक तेव्हा पळाले ॥७२॥
मूर्च्छित पडल्या वीरश्रेणी । कितीक भक्षिले राक्षसांनी । त्यात एक राक्षसी तरुणी । भूप तिणे अवलोकिला ॥७३॥
मन्मथाहुनि रूपागळा । पाहोनि झाली कामविव्हळा । येऊन पडली त्याचे गळा । सुखसोहळा भोगावया ॥७४॥
राजा करोनि आलिंगन । करू लागली मुखचुंबन । नीवीबंध मुक्त करून । मिळू पाहे सुरतासी ॥७५॥
निःशंक तेव्हा गतत्रपा । बळे झोंबिली चंद्रांगदनृपा । राजा म्हणे गे या पापा । करू नको निशाचरी ॥७६॥
मदविव्हल शिथिलांगा । करू पाहे सुरतसंगा । राजा तीते देऊन दगा । उडी टाकी तडागी ॥७७॥
रायाचे अमात्य निशाचरी । भक्षिले तेव्हा एकसरी । राजा पडला कासारनीरी । तळाभीतरी तो गेला ॥७८॥
तेथे पातल्या नागकन्यका । त्याणी धरले नरनायका । स्वमंदिरी नेऊनि निका । वस्त्राभरणे गौरविला ॥७९॥
पाहून त्याचा रूप ठसा । चित्ती संतोषल्या डोळसा । म्हणती अपर मन्मथसा । आम्हा असा लाभेल जरी ॥८०॥
तरीच सार्थक या जीवाचे । मग वंदून पाय त्याचे । म्हणती श्रवण करवोनि नामाचे । या श्रोत्रांचे सार्थक करी ॥८१॥
राजा म्हणे वो गजगामिनी । सादर ऐक कथा कानी । चंद्रांगद मी राजा मानी । निशिदिनी स्वधर्माचा ॥८२॥
पावोनि निशाचराची भीती । मी उडी टाकिली तडागाप्रती । घडली तुमची मज संगती । तेणे चित्ती संतोषलो ॥८३॥
आता कृपा करोनि मजवरी । घालावे उदकाबाहेरी । ऐकता हसती त्या सुंदरी । प्रत्युत्तरी बोलती त्या ॥८४॥
दैवे सापडता चिंतामणी । त्यासि दवडील काय कोणी । कल्पतरू उगवता अंगणी । त्यास कोणी छेदीना ॥८५॥
व्याधिपीडितांसि दिव्यौषधी । सापडता हरपे व्याधी । तैसा तू आम्हासि सुबुद्धी । सकल सिद्धिदायक ॥८६॥
आम्ही युवतीललामललना । कंदर्पबाधा करी मना । याच्या करोनि उपशमना । आल्हाद मना त्वा द्यावा ॥८७॥
तृषार्तासि द्यावे शीतळ जीवन । क्षुधितासि द्यावे सड्रसान्न । मन्मथार्तासि भोगदान । शास्त्रसंपन्न बोलती ॥८८॥
पूर्वजन्मीचे सुकृतयोगे । तू पातलासि याप्रसंगे । आता रतिसुख आम्हा संगे । करोनि रंगे संसारी ॥८९॥
ऐकोनि ऐसी त्यांची वाणी । राजा बोटे घाली कर्णी । तुमचे सुबोल तरुणी । विषतुल्य मज वाटती ॥९०॥
माझे एकपत्नीव्रत थोर । भंग न पावे साचार । घरी इंदुमती सुंदर । मनोहर ती माझी ॥९१॥
तिच्या वाचोनिया नितंबिनी । मातृवत् मी पाहे नयनी । ऐसे वचन ऐकता कामिनी । अत्यंत मनी खिन्न जाहल्या ॥९२॥
येरीकडे काय झाले । काही सैन्य जे पळाले । त्याणी वर्तमान कथिले । राजगृही जाऊनिया ॥९३॥
राजा भक्षिला निशाचरे । ऐकता इंदुमती सुंदरी । हाणोनिया उरीशिरी । शोक करी बहुसाल ॥९४॥
हा नाथ हा नाथ कोठे तूते । पाहू आता प्रियकराते । दुःखावर्ती ढकलोनि माते । कोण्या पंथे गेलासी ॥९५॥
माझा सौभाग्य दिनमणी । टाकोनि गेला ही कमळणी । काय केली पापकरणी । जन्मातरी न कळे मी ॥९६॥
त्यायोगे माझे मज । पाप फळले गे सहज । टाकोनि गेला महाराज । निजभाज दुःखसागरी ॥९७॥
दीर्घस्वरे रडे सुंदरी । तोडोनि टाकी गळसरी । अंगप्रत्यंगे भूषणे सारी । सौभाग्यचिन्हे उतरली ॥९८॥
अट्टहास्ये शोक करित । गडबडा भूमीवरी लोळत । तिचा शोक पाहून बहुत । अश्रू गळत जननेत्री ॥९९॥
मिळालिया नगरनारी । त्याणी सावरोनिया सुंदरी । म्हणती आता शोक न करी । जगाभितरी काय पाहे ॥१००॥
वडील वृद्ध पुरोहित । म्हणती विचार करी निश्चित । जाहले ते कोण आहेत । ऋषीमहंततपस्वी ॥१॥
जे जे झाले ते ते गेले । कोणी शाश्वत नाही उरले । आता शोक न करी वो बाले । कार्य पुढिले संपादी ॥२॥
त्याचा पुत्र राज्यी स्थापिला । मग त्याचा संस्कार केला । आला दिवस संपादिला । स्वगृही गेला जनमेळा ॥३॥
जयजयाजी विश्वंभरा । विकटा रे सुंदरा । भक्तवत्सला वेदकरा । लंबोदरा गणपती ॥४॥
स्वकीयलीला निजच्छंदे । पुढे बोलवी का आनंदे । अंती दाखवी पदारविंदे । गणराया आपली ॥५॥
स्वस्तिश्रीगणेशप्रतापग्रंथ । गणेशपुराणसंमत । उपासनाखंड रसभरित । चतुर्दशोध्याय गोड हा ॥६॥
श्रीगजाजनार्पणमस्तु ॥ अध्याय १४ ॥ ओव्या ॥१०६॥