क्रीडाखंड अध्याय ३०
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।
जयजयाजी अंबानंदना । एकदंता रे गजानना ।
अघहारका असुरभंजना । निरंजना कृपानिधे ॥१॥
श्रोते ऐका पूर्वील चरित । पुष्पिकागृहीं अंबासुत ।
गेला जैसा देव यादवनाथ । कंसभयें करोनियां ॥२॥
तैसा सिंदुरासुर भयमिषे । केलें जाणे जगन्निवासें ।
मग जाहलें चरित्र कैसें । तें वाग्विलासें वर्णिजेतों ॥३॥
एके दिवसी सिंदुरासुर । बैसोनियां सिंहासनावर ।
मुखें गर्जना करी थोर । प्रधान चतुर श्रवण करिती ॥४॥
मी काय अद्यापि केलें । अमर न जिंकिता तसे राहिले ।
सामर्थ्य माझें व्यर्थ गेलें । हें लागलें जिवासी ॥५॥
पतिव्रतेचें नवयौवन । व्यर्थ जैसें पतिवांचुन ।
तैसें अमर जिंकिल्यावीण । सामर्थ्य माझें व्यर्थ ॥६॥
ऐसें जंव गर्जताहे । तंव आकाशवाणी लवलाहें ।
म्हणे दुष्टा आतां घडेल कैसें हें । आयुष्य तुझें शेष किती ॥७॥
अरे पार्वतीचा नंदन । तुझें करील कीं रे हनन ।
व्यर्थ कां पुरुषार्थ बोलसी वचन । पाहे विचारुन मानसीं ॥८॥
ऐसी ऐकोन आकाशवाणी । दैत्य खोंचला अंतःकरणीं ।
नेत्रा वाटे वाहे पाणी । सेवक जनीं संताप करी ॥९॥
रागें जाहले आरक्तनयन । दैत्य कांपे थरथरोन ।
म्हणे वैरी जिवें मारीन । गेला धाऊन कैलासीं ॥१०॥
आला ऐकोन दैत्यपती । शिवगण तेव्हां सारे कांपती ।
तेथें पाहे जंव पार्वती । गिरिजासती न दिसे तयां ॥११॥
मग तेथून निघाला ते अवसरीं । पार्वती सांपडलीं वनांतरीं ।
म्हणे तीतें माझा वैरी । दाव झडकरी गिरिसुते ॥१२॥
ती म्हणे तुझा वैरी कवण । हें न कळे मजलागुन ।
तो म्हणे तुझा नंदन । तो मारीन क्षणमात्रें ॥१३॥
तिचेपासीं न देखे सुत । दैत्य मनीं विचार करित ।
हिचा वध करिता निश्चित । समूळ वैरी सांपडला ॥१४॥
नग्नशस्त्र घेऊनि करीं । दैत्य धांवे तेव्हां सुंदरी ।
धांव म्हणे गा भक्तकैवारी । असुर करी नाश माझा ॥१५॥
थरथरां कांपे नगजासती । पाहोन प्रगटला गणपती ।
तिचेपुढें भक्तपती । दिसे मूर्ती सुकुमार ॥१६॥
चतुर्भुज गजानन । बाळ करित आहे रुदन ।
ऐसें दैत्य अवलोकुन । हात घालोनि उचली तया ॥१७॥
आपटावया उगारी वर । तव वाढला सर्वेश्वर ।
जैसा हिमालय अपर । कांपे सिंदुर तेधवां ॥१८॥
तयासि टांकोन उदकांत । म्लान जाहला विधीसुत ।
श्वासोच्छ्वास तेव्हां टांकित । म्हणे विपरीत हें दिसतें ॥१९॥
उदकिं पडलें जेव्हां बाळ । तेव्हां करी शब्द विक्राळ ।
तेणें कांपे ब्रह्मांडगोळ । कांपती अचळ तेधवां ॥२०॥
क्षोभ पावले सप्तोदधी । सिंदुरासुरास जाहली आधी ।
बाळ पडलें जळांमधीं । तीर्थ विधी जाहला तेथें ॥२१॥
बाळकाचे अंग शोणित । पडलें ते पाषाणसमस्त ।
नार्मदेय जाहले अद्भुत । पूजनार्थ युक्त सदां ॥२२॥
नार्मदेय गणपतीचें पूजन । जे करिती भक्तजन ।
ते मुक्तिभुक्ती पाऊन । करिती उद्धार इतरांचा ॥२३॥
गणेशतीर्थीं करिती स्नान । त्यांचे तुटे भवबंधन ।
पुढें ऐका चरित्र गहन । काय जाहलें तेधवां ॥२४॥
दैत्यें बाळ उदकीं टांकिलें । तें पडतां गुप्त जाहलें ।
दैत्यमानस संतुष्टले । म्हणें टळले अरिष्ट आतां ॥२५॥
गणेशकुंडापासून भीषण । पुरुष उत्पन्न जाहला दारुण ।
दंष्ट्रा कराल कृष्णवर्ण । जटापूर्ण मस्त्क पैं ॥२६॥
तयासि पाहतां सिंदुरासुर । खड्गे वसविला तेणें कर ।
म्हणे काय करील पामर । उडवीन शिर क्षणमात्रें ॥२७॥
असुरास तेव्हां पुरुष बोले । तूं व्तर्थ मातें उदकीं टांकिलें ।
अरिष्ट नाहीं तुझें ढळलें । पुरें सरलें आयुष्य तुझें ॥२८॥
वैरी वाढतो भूमंडळी । संहारील तूतें तो महाबळी ।
ऐसें वदोन तयेवेळीं । गुप्त जाहला पुरुष तो ॥२९॥
ऐसी गहन भगवल्लीला । ती न कळे पार्वतीला ।
शंभूसि म्हणे हिमनगबाळा । कैलासीं मला न्यावें आतां ॥३०॥
येथें असतां विघ्नें दारुण । मजवरी येती भोगिभूषण ।
ऐकोन आनंदला तिचा रमण । गेला घेऊन कैलासी ॥३१॥
श्रोते अवधारा गणेशचरिता । नंदीनें नेऊनि अंबिकासुता ।
पुष्पिकागारी ठेविला असतां । जाहली जागृत ती सती ॥३२॥
तंव प्रसूतवेदना स्पष्ट दिसती । पुढें बाळक गणपती ।
करी शुंडायुक्तमूर्ती । पाहतां चित्ती घाबरली ॥३३॥
म्हणे हें काय अत्यद्भुत । माझें उदरीं जन्मलें भूत ।
दीन स्वरे आक्रंदत । कपाट पिटी निजकरें ॥३४॥
तिचें ऐकोन दीर्घ रुदन । भोंवतीं मिळाले सखीजन ।
राजा पातला धांऊन । सेवकजन समवेत पैं ॥३५॥
रायास म्हणती सकळ लोक । हा जन्मला वंशच्छेदक ।
ऐसें मानवासि बाळक । जाहलें नाहीं कोठेंही ॥३६॥
राजा म्हणे सेवकांशी । वनी टांका नेऊन याशी ।
सेवकें उचलोन बाळकांशीं । नेऊनि वनी ठेवियेलें ॥३७॥
त्या वनीं पराशरमुनी । बसला होत अनुष्ठानीं ।
तेणें बाळा पाहिलें नयनीं । गेला मोहोनि तेधवां ॥३८॥
चतुर्भुज कमनीय बाळ । कटितटीं विराजे व्याळ ।
कोटिसूर्य कांती तेजाळ । दिसे भाळ चंद्रयुक्त ॥३९॥
मुनी म्हणे माझे तपाशी । इंद्रें धाडिलें या विघ्नाशी।
मग तो आठवी नीलकंठाशी । म्हणे मजसीं रक्षिता तूं ॥४०॥
करितां शंकराचें स्मरण । मुनीचें सरलें मायावरण ।
तेणें वोळखिला गजकर्ण । घेत उचलोन तयातें ॥४१॥
त्याची पत्नी वत्सलासती । नेऊन देत तिचे हातीं ।
मुनी म्हणे हा गणपती । भक्तपति दयार्णव ॥४२॥
ज्याचें करितां नामस्मरण । तुटे निश्चयें जन्ममरण ।
तो हातीं आला गजकर्ण । करी पाळण तयाचें ॥४३॥
तिनें हृदयीं आलिंगिला । तंव स्तनीं पान्हा फुटला ।
हर्षें त्याचे मुखी कुच घातला । बाळ पाहिला कौतुकाने ॥४४॥
धन्य धन्य ती वत्सलासती । अंकीं खेळे जगत्पती ।
तिचें भाग्य वर्णावें किती । नाहीं गणती पुण्यासी ॥४५॥
कौतुकें तयासि न्हाणित । पालखींत घालोनि हालवित ।
वारंवार मुख चुंबित । हर्षेंभरित ऋषिपत्नी ॥४६॥
व्यास म्हणे ब्रह्मयाशी । मूषकवाहन किमर्थ त्याशी ।
हें सांगावें स्पष्ट मजशी । कृपाराशी येधवां ॥४७॥
विधाता म्हणे पराशरसुता । ऐकें मूषकाची कथा ।
जेणें वाहिलें जगन्नाथा । ऐक वार्ता तयाची ॥४८॥
पुरंदर सभेंत वामदेव । ऋषि जातां क्रौंचगंधर्व ।
तेणें पदघातें तो भूदेव । ताडियेला उन्मत्तपणें ॥४९॥
तेणें ऋषीसि क्रोध आला । मुनी शाप देत तयाला ।
तूं मूषक होय रे भला । गणपतीला पृष्टीस घे ॥५०॥
गणेश तुझ्यावरि आरुढेल । तेणें तुझा उद्धार होईल ।
ऐसा ऐकतां तयाचा बोल । जाहला खळ उंदीर तो ॥५१॥
स्वस्ति श्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराण संमत ।
क्रीडाखंड रसभरित । त्रिंशतितमोध्याय गोड हा ॥५२॥अध्याय ३०॥ओव्या ५२॥
अध्याय तिसावा समाप्त