क्रीडाखंड अध्याय १९
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।
जयनिगमतरुरुचिरफला । गिरिजातपोदय सूर्यमंडला ।
अंबानंदना रे विमला । स्फुरत्कुंडला गुणेशा ॥१॥
समुद्राचे मोजवेल कमल । तारकांची गणना होइल ।
नभमंडलाची घडी वळेल । परी न गणतील गुण तुझे ॥२॥
उदधीचें करुनि मषिपात्र । अवनीचें विस्तीर्णपत्र ।
लोमेशायू सहस्त्रकर पवित्र । लिहील विचित्र गुण तुझे ॥३॥
तरीं न सरती त्वद्गुण । तेथें कलियुगीं मनुष्याचा पाड कोण ।
परी तूंचि हा ग्रंथ गजकर्ण । करविता जाण सत्य हें ॥४॥
श्रोते टांकोनि आळस । गणेशकथा ऐका सुरस ।
जी कथा भववारणास । सिंहापरी होतसे ॥५॥
गिरिजासदनीं जगज्जीवन । होवोनियां तिचा नंदन ।
करुन दानवांचें कंदन । करी अवन साधूंचें ॥६॥
तयासि लागला दशममास । तीन मुहूर्त लोटतां दिवस ।
उभा राहे जगन्निवास । धरोनि करास मातेच्या ॥७॥
बोबडे फुटले तयासि बोल । ऐकोन अंबेस सुखाचे डोल ।
येवोनि पाहे मुखकमल । शंकराचें तेधवां ॥८॥
शिव धरोनि तयाचा हात । हळुहळू अंग्णीं चालवित ।
जो ब्रह्मांडासि आधारभूत । धरोनि हात तो चाले ॥९॥
आश्रयावांचोनि कांपत । चालतां अडखळोनि पडत ।
पाहोनि माय ये धांवत । कडिये घेत प्रेमभरें ॥१०॥
करोनिया मुखचुंबन । म्हणे श्रमलें हो माझें तान्ह ।
बोलतां बोबडें मातेलागून । नुमजे कांहीं वर्णभेद ॥११॥
चिमणी मेळऊनि गणाचीं बाळें । मध्यें विचित्र खेळ खेळे ।
जाऊनियां धुळींत लोळे । केश कुरळ माथ्यावरी ॥१२॥
माता येऊनि लागवेगीं । धुळींतुन उचली तयालागीं ।
न्हाणोनिया कोमळांगी । तीट लावी भाळी त्याच्या ॥१३॥
डोळ्यांवरिलें कुरळ जावळ । सर्सावोनिया मुखकमळ ।
पाहोन म्हणे भाग्यसबळ । या जगीं माझें सखे ॥१४॥
उतरोनि मातेचे कडेखालीं । मुलामाजी हुतुतू घाली ।
उचलावया येतां माऊली । पळे तेथूनि दुडदुडां ॥१५॥
माय लागतां पाठिमागें । परतोनि अंबर धरीं वेगें ।
तिचेपासीं स्तनपान मागे । करी रुदन क्षणांत पै ॥१६॥
देऊन स्तनपान त्याशी । बाळ गुंतवोनि खेळाशी ।
गौरी निघे शिवसेवेसी । रडत पाठिशी लागे तिच्या ॥१७॥
पुन्हा परतोन मोहजाळे । म्हणे बाळा क्षणभरी खेळे ।
तो नायकतां लोळे । मग उचलोन घेत तया ॥१८॥
शंकरासि म्हणे काय करुं । क्षणभरी दूर नोहे लेंकरुं ।
ऐकोनि म्हणे तीतें हरुं । नको रडवूं बाळकाते ॥१९॥
न लगे मातें तुझी सेवा । माझा प्रियपुत्र तूं खेळवावा ।
कदां इतरांपासी न द्यावा । अवनीवरी न ठेवावा कदां ॥२०॥
सिंधू देऊनि वस्त्रभूषणें । अजगरासि विनवून म्हणे ।
तुवां आतां दाखवणे । पराक्रम तरी मजलागीं ॥२१॥
प्रतिज्ञा करोनि जे जे गेले । ते ते मागुति नाहीं परतले ।
येरु म्हणे गिळीन सगळें । बाळकासि क्षणमात्रें ॥२२॥
नमोनि निघे तो रायाशी । जाणो काळे आसुडिला तयाशी ।
अजगर होवोनि वेगेंशीं । गणरायाशी गिळूं पाहे ॥२३॥
मुख पसरोनिया विशाळ । जपत अंगणीं दुष्टव्याल ।
हें समजोन गौरीबाळ । दुडदुडां धांवत पातला ॥२४॥
तेणें डोळस बाळ देखिला । सक्रोधें तेव्हां धुधुःकारला ।
झेंप घालूनि तयास गिळिला । आनंद मानिला तयानें ॥२५॥
उदरीं जातां भुवनेश्वर । वाढता जाहला गौरीकुमर ।
उभाच चिरोनियां अजगर । आपण बाहेर निघाला ॥२६॥
गिरिजा पाहे सभोंवती । बाळ न देखतां रडे पार्वती ।
मुलें येऊनि तीस सांगती । गिळिला गणपती अजगरानें ॥२७॥
माय पिटी कपाळ करें । भोंवतीं रडती चिमणी लेंकुरें ।
तंव धावत पातला त्वरें । अंग रुधिरें माखलें असे ॥२८॥
पाहोनि येतां कुमराशी । माता धांवली वेगेशीं ।
करीं धरोनि तयाशी । वेगें करोनि न्हाणीतसे ॥२९॥
दैवें अरिष्टापासोन । बाळ पातलें गे वांचून ।
तिणें ब्राम्हण मेळऊन । अरिष्टनाशन शांतीसी करविलें ॥३०॥
एकादशमास बाळकाशी । लागतां करी उत्साहाशी ।
आनंद न माये मायेशी । बाळकासि अवलोकितां ॥३१॥
गौरीभोंवती गणऋषिललना । मिळोनी पाहती गौरीनंदना ।
बाळकांमाजी खेळ नाना । खेळतसे भक्तसखा ॥३२॥
कोणी ललना निजबाळक । पाजितां धावे विनायक ।
दुसरा तिचा स्तन देख । लावोनि मुख चुंबीतसे ॥३३॥
तिणें झिडकावितां तयास । वेडावोनि दाखवी तीस ।
कोण्या कांतेचे मुखास । जावोनियां चुंबीतसे ॥३४॥
कोणी घेऊनि निर सुंदर । येतां वाटेस लंबोदर ।
मुखावरी घालोनि अंबर । भेडसावीत तयेसी ॥३५॥
ती येऊनियां वेगेंशीं । गार्हाणें सांगे अंबेपाशीं ।
म्हणे येणे पीडिले गे मजशीं । येऊनि वाटेसि भेडसाविलें ॥३६॥
कोणी तोतरें बोलतां । तयासि वेडावी जगत्पिता ।
कोणी तयासि घेतां वनिता । कुरळ तत्वता आकर्षी तिचे ॥३७॥
लीला विग्रही जगन्निवास । लीला दावी निजभक्तांस ।
सत्पुत्र पाहोनि नगजेस । रात्रदिवस आठवेना ॥३८॥
सिंधूनें पाठविला शरभासुर । कज्जलवर्ण महाक्रूर ।
शिर भेदीत गेले अंबर । बाळ सुंदर देखिला तेणें ॥३९॥
पसरोनियां विशाळ मुखा । गिळूं पाहे तो सुमुखा ।
असुर पाहतां भक्तसखा । पाहोनि हरिखा सरसाविला ॥४०॥
दानव चरणीं धरोनियां । गरगरां निराळीं फिरवोनियां ।
आपटावा तंव बोले माया । सोड गणराया ययाशी ॥४१॥
बाळकें दिधला टांकोन । देह जाहला छिन्नभिन्न ।
परी धांवला सरसाऊन । पुन्हा भिरकाऊन देतसे ॥४२॥
ऐसा तो शतवार । फिरवोनि टांकिला असुर ।
दैत्य येवोनि वारंवार । कर्षी लंबोदर लागवेगीं ॥४३॥
मग गुणेशें शिळापृष्ठीवरी । आपटतां जाहला चूर्णशरीरीं ।
प्राण सोडी सुरवैरी । भक्त कैवारी प्रतापें ॥४४॥
विजयी झाला गौरीसुत । सुरगण सुमनवर्षाव करित ।
पार्वतीचें भाग्य अपरिमित । पुत्र अनंत जाहला ॥४५॥
एके दिवसीं सख्यांसहित । पार्वती घेऊनियां स्वसुत ।
शिवसन्निध जाऊनि बैसत । कौतुक दावित पुत्राचें ॥४६॥
जाणोनि मातापित्याचा भाव । नृत्य करी देवाधिदेव ।
गणगिरिजेसहित पाहे शर्व। हावभाव तयाचे ॥४७॥
नृत्य पाहोनि संतोषला । शंकर नृत्य करुं लागला ।
त्याचें नृत्य पाहूं आला । नाचूं लागला इंदिरावर ॥४८॥
शक्र आणि वरुण कुबेर । तेही नृत्य करिती सुंदर ।
गणगंधर्व यक्ष किन्नर । संपूर्ण सुर नृत्य करिती ॥४९॥
मुनिपन्त्यागणांगना । गौरीसख्या चंद्रानना ।
नाचती करिती भाव नाना । गजवदना तोषविती ॥५०॥
स्वर्गमृत्युपाताळपर्वत । नद्यासमुद्रवनें समस्त ।
सकळ पदार्थ तेव्हां नाचत । चराचरसहीत पैं ॥५१॥
जो सकल जगतां आधारभूत । तो जेव्हां नृत्य करित ।
तेव्हां सकल ब्रह्मांड नाचत । कौतुक पाहत पार्वती ॥५२॥
म्हणे हें काय अपूर्व जाहले । सकल चराचर नाचूं लागलें ।
तिणें बाळकास उचलिलें । हृदयीं धरिलें प्रेमभरें ॥५३॥
करुंनियां मुखचुंबन । करवीतसे स्तनपान ।
कानामागील मळी काढून । दे सर्साऊन कुरळ वरी ॥५४॥
तंव येतां नूपुरासुर । देखोनि तो सर्वेश्वर ।
नूपुरीं बांधी तयासि सत्वर । तेणें लंबोदर जड जाहला ॥५५॥
पार्वती म्हणे विश्वनाथा । किती जड जाहलासि आतां ।
तुझा भार न सोसवे सर्वथा । खालीं आतां बैसे तूं ॥५६॥
ऐकतां मातेची भारती । पाय झिडकावी गणपती ।
नूपुरांतून त्वरितगती । दैत्य उडला तेधवां ॥५७॥
भोंवतसे नभमंडळीं । तेणें अंधार पडला तळीं ।
दैत्य पडोन तये वेळीं । शतचूर्ण जाहला ॥५८॥
असुराचा गेला प्राण । पुष्पें वर्षती सुरगण ।
ऐसें ऐकतां जाण । अंबा मनीं विस्मय करी ॥५९॥
एके दिवसी गणनायकें । घेऊनि चिमणी ऋषिबाळकें ।
खेळ मांडिला हो कौतुकें । बाळ हरिखें नाचती ॥६०॥
हमामा हुतुतू चेंडू चक्रें । खेळतां खेळ गजवक्रें ।
अजासुर चक्रपाणी पुत्रें । पाठविला तयेवेळीं ॥६१॥
तो होवोनि बोकड । धांवत पातला धडधड ।
तयासि पाहून वक्रतुंड । काय करिता जाहला ॥६२॥
धांवोनियां लागवेगीं । अज धरिला दोहीं शृंगीं ।
वरी बैसला वीतरागी । परमात्मा सनातन ॥६३॥
बाळकें धरिती पुच्छ कान । तयासि टांकी आसुडोन ।
त्याचें अद्भुत बळ पाहुन । जगज्जीवन काय करी ॥६४॥
खालीं उतरोनि जगन्निवास । शिळेवरी आपटी तयास ।
चूर्ण होवोनि आसमास । मुकला प्राणास दानव तो ॥६५॥
भडभडां आहे रुधिर । विजयी जाहला अंबाकुमर ।
बाळकें येऊनियां सत्वर । सांगती समाचार गौरीप्रती ॥६६॥
माता येऊनि लवलाहीं । निज पुत्राची धरोनि बाहीं ।
दध्योदन ते समयीं । उतरोनि टांकी ग्रावतनया ॥६७॥
मुनि आणी त्याच्या ललना । स्तवित्या जाहल्या गजानना ।
ब्रह्मा म्हणे सत्यवतीनंदना । कथा ऐके सावधान ॥६८॥
एक वर्षाची गुणेशमूर्ती । ब्रह्मांडीं भरिली तिणें कीर्ती ।
श्रवणमात्रें निरसती । पातके बा मानवांचीं ॥६९॥
द्वितीय वर्षी तयाचा । पराक्रम ऐके बा साचा ।
पुष्पवाटिकेंत पार्वतीचा । पुत्र खेळे बाळकेंशी ॥७०॥
पुष्पें तोडोन हार गुंफिले । परस्परानी गळ्यांत घातले ।
विनायाकानें जैसें कथिलें । तैसीं मुलें खेळती हो ॥७१॥
फळें पक्कापक्क तोडिलीं । बाळकानी तेव्हां भक्षिलीं ।
अम्रजंबु अंजीर केळीं । फणस वोलीं पोफळें पै ॥७२॥
द्राक्षें अंजिरकर्क टीका । खिरण्यापेरुबदरिका ।
बदामपिस्तेखारका । वांटी अर्भकां गुणेश पैं ॥७३॥
तव तेथें कूटनामा । दुष्ट दानव क्रुरकर्मा ।
पुष्करिणी जाहला दुष्टात्मा । विषरुपे तेधवां ॥७४॥
खेळ खेळतां विचित्र । बाळ शिणले कोमळगात्र ।
सेऊं पातले उदकपवित्र । सकळ पुत्र ऋषीचे ॥७५॥
अंजळी भरोनियां नीर । प्राशन करिती सकल कुमर ।
जाहला त्यांचा संव्हार । विष दुर्धर तयाचें ॥७६॥
पुष्करिणी भोंवतीं बाळक प्रेत । पडलीं पाहोनि अपरिमित ।
वनरक्षक धावोनि सांगत । ती मात गावांत पैं ॥७७॥
मिळाले तेथें नारीनर । मेले पाहोनि निजकुमर ।
करिते जाहले हाहाःकार । हृदयीं कर हाणोनियां ॥७८॥
आक्रोशें रडती सुंदर ललना । त्यांचें स्तनी फुटला पान्हा ।
कृपा उपजली जगज्जीवना । कौतुक दाविलें तयानें ॥७९॥
लावोनि पाहे अमृतदृष्टी । करें थापटी तयाची पाठी ।
मुलें रडूनि घालिती मिठी । जननी कंठीं तेधवां ॥८०॥
क्रुर दृष्टीनें अवलोकितां । कुटासुर मेला अवचितां ।
पंच योजनें विस्तीर्णता । प्रेत पडलें तयाचें ॥८१॥
ऐसा लक्षोनियां असुर । पळते जाहले नारीनर ।
अंबा घेऊनि आपला कुमर । ये सत्वर निजालयीं ॥८२॥
कोणी प्रशंसा करिती । नास्तिक ते तयास निंदिती ।
ह्मणती याची होतां संगती । विघ्नें येती नानापरी ॥८३॥
असो जैसा ज्याचा गुण । तैसें त्याचें अंतःकरण ।
पार्वती गृहीं गजकर्ण । लीला दावी निजभक्तां ॥८४॥
तिसरें वर्ष प्राप्त जाशी । तो गणेश एके दिवशीं ।
वंचोनियां मातेशी । चिमण्या बाळकेशीं निघाला ॥८५॥
जावोनियां उपवनीं । खेळ खेळे मोक्षदानी ।
चेंडू चक्रें आनंदोनी । बाळकानी आणिले ॥८६॥
त्यांचा खेळ विचित्रपणे । खेळोन दाविजे गजकर्णे ।
आणखी खेळ बाळकगुणे । सांगतां खेळे कोतुकें ॥८७॥
खेळती अवतारचरित्रें । सत्पक्ष धरिजे गौरीपुत्रें ।
जयपराजयास होती पात्रें । सुखदुःख टांकूनियां ॥८८॥
लेंकुरांसहित गौरीकुमर । खेळतां श्रम पावला थोर ।
विस्तीर्ण पाहूनि सरोवर । त्याचें तीर वेष्ठिलें ॥८९॥
वोढिले गणेशें निजगडी । उभे राहिले दोहीं थडीं ।
पाण्यांत मारोनियां बुडी । उपटिती कमळें सकंद ॥९०॥
त्यांच्या गुंफोनियां माळा । घालती गणेशाच्या गळा ।
प्रेमें पाहती मुखकमळा । लावोनि डोळा प्रेमाचा ॥९१॥
मग शिरोनियां जीवनीं । जलक्रीडा करितां आनंदुनी ।
पुन्हां तटाकीं येउनी । मोक्षदानी बैललासे ॥९२॥
तेथें येऊनि विक्राळ असुर । जळीं जाहला मीन थोर ।
तेणे येऊनि नगजाकुमर । मुखीं धरोनि जळीं नेला ॥९३॥
जळीं मत्स्यें नेतां बाळ । मुलें रडती फोडिती कपाळ ।
कोणी गांवांत करी कोल्हाळ । गेले सांगत नगजेशी ॥९४॥
ऐकोन जळीं पुत्रमज्जन । पार्वती रडे आक्रंदोन ।
भोंवती मिळाले ललनाजन । कपाळ पिटोन रुदन करित ॥९५॥
कोणी दावा गे माझा तान्हा । स्तनी फुटला वाहे पान्हा ।
कोणी आणोन राजसवदना । स्तनपाना करवा गे ॥९६॥
फळास आले तपसायास । तोच हा गे माझा राजस ।
आतां दैत्यें बुडविलें त्यास । दुःख कोणास निवेदूं ॥९७॥
क्षणोक्षणी धरणीवरी । अंग टांकी जेव्हां गौरी ।
तेव्हां रुदन करीत सुंदरी । सांवरिती तयेतें ॥९८॥
माझे जातात गे प्राण । कोणी दावा बाळ तान्ह ।
कपाळ पिटोनियां करान । विलाप करी नगजा सती ॥९९॥
तिची परिसोन शोकवार्ता । कृपा उपजली एकदंता ।
अंडज होवोनियां तत्वता । तळपे तेव्हां सतेजें ॥१००॥
मुखीं त्याचे धरुन वदन । पुच्छे करी तयास ताडण ।
अनंतशक्ती गजकर्ण । घेत प्राण असुराचा ॥१॥
त्यातें धरोनियां निकुरें । जळाबाहेर पातला त्वरें ।
त्यास पाहतां ऋषींचीं पोरें । जयजयकारें गर्जती ॥२॥
उठोनि तेव्हां ती पार्वती । त्यातें जाहली हृदयीं धरती ।
देव सुमने वर्षती । आल्हादती बहुसाल ॥३॥
कृष्ण कालिंदी जळीं बुडाला । तो येऊनि मातेसि भेटला ।
तीतें जैसा प्रमोद जाहला । तैस जाहला पार्वतीसि ॥४॥
बाळाचें कुर्वाळोनि वदन । करवीतसे स्तनपान ।
बाळकांसि भेटतां गौरीनंदन। त्यांचें मन संतोषलें ॥५॥
सख्या म्हणती मृडानीशी । दैवें रक्षिलें तुझे सुताशी ।
अंबा घेऊनि गुणेशासी । तेव्हां घरासि पातली ॥६॥
पुत्रासि म्हणे जननी । तूं नको जाउं मज टांकुनी ।
अरिष्टें येती तुज लागुनी । माझे मनीं चिंता तुझी ॥७॥
जयजयाजी जगत्कारणा भक्तरक्षका संकटहरणा ।
सदा स्मरणें तुझे चरणा । जन्ममरणा टाळावया ॥८॥
इति श्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराण संमत ।
क्रीडाखंड रसभरित । एकोनविंशतितमोध्याय गोड हा ॥१०९॥अध्याय ॥१९॥
अध्याय एकोणिसावा समाप्त