क्रीडाखंड अध्याय ४
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।
जयजय अदितीप्रियनंदना । भक्ताभीष्टदायका कल्मषदहना । वालवेषा निरंजना । संसारमोचना सुखाब्धे ॥१॥
चार वर्षांची दिव्य मूर्ती । मुखी दावी विश्वस्थिती । मायालाघवि गणपती । न कळे स्थिती तयाची ॥२॥
श्रोते ऐका कथा सुरस । पंचम वर्ष लागले महोत्कटास । ऋषीने पाहोनि सुमुहूर्तास । व्रतबंधनास आरंभिले ॥३॥
शिष्यास पाठवोनिया वेगी । पाचारिले ब्राह्मणालागी । आप्तपुरोहित तयाप्रसंगी । धावती विरागीशोभना ॥४॥
उभविले कांचनमय मंडप । मुक्तघोष लाविले अमुप । मखरेतोरणे साक्षेप । करवी कश्यप आवडीने ॥५॥
वाद्ये वाजती घनदाट । वेदघोषे गर्जती भट्ट । बहुले कांचनमय सुभट । महोत्कट शृंगारिला ॥६॥
कनकमय रत्नजडिती । चरणी तोरड्या झणत्कारती । की त्या श्रुती गर्जती । मंगलमूर्ती नामघोषे ॥७॥
कटी मेखळा रत्नजडित । क्षुद्रघंटा शब्द करित । दंडी वाकी विराजित । मणकटी शोभत रत्नभूषा ॥८॥
नवरत्नखचित अलोलिके । ह्रदयी झळकती दिव्यपदके । दृष्टिमणी बजरबटू वागनखे । मंडित कनके ह्रदयावरी ॥९॥
मुक्ती समुद्रीची मुक्ताफळे । कंठी झळकती तेजाळे । कर्णी कुंडलाच्या झळाळे । शशिसूर्य झाकुळती ॥१०॥
भाळी शोभे पिंपळवण । मोत्ये झळकती नक्षत्रवर्ण । दशांगुळी मुद्रिकांचे गण । नवरत्ने दाटले हो ॥११॥
विध्युक्त करोनि पुण्याहवाचन । विधीने आरंभिले मातृभोजन । रत्नताटी षड्रस अन्न । पुढे नंदन बैसविला ॥१२॥
असंख्यात ऋषिनितंबिनी । समारंभे पंक्तीस घेउनी । अदिती बैसली कौतुके करुनी । लागली ध्वनी वाद्यांची ॥१३॥
धन्यधन्य ती देवजननी । परब्रह्ममूर्ती पुढे घेउनी । भोजन करिता आनंद मनी । सहस्त्रवदनी अगम्य तो ॥१४॥
काय तिणे तप केले । तेणे परब्रह्म साकारले । मातृभोजनी अंकी घेतले । पाहता धाले नेत्र तीचे ॥१५॥
मग यथायुक्त विधी केला । महामंत्रे उपदेशिला । मौजीबंधने कश्यपाला । सार्थक वाटे जन्माचे ॥१६॥
जाहला वाद्यांचा गजर । देव वर्षती सुमनभार । मंत्रघोषे ऋषिवर । मंडपी अपार गर्जती ॥१७॥
अक्षता टाकिती नगरनारी । त्यात पातले सुरवैरी । कृत्रिमवेषे ब्रह्मचारी । दुराचारी कापट्यरूपी ॥१८॥
पिंगाक्ष आणि विघात । विशालपिंगल अद्भुत । महापुंड्रनामे विख्यात । विप्रगणात बैसले ॥१९॥
भस्म सर्वांगी चर्चिले । कंठी रुद्राक्ष मिरविले । जैसे बाह्य वृंदावन शोभले । अंतरी भरले काळकूटे ॥२०॥
गुप्त करोनि शस्त्रभार । टाकिती बटूचे अंगावर । तेणे विदारण जाहले शरीर । बाळकाचे तेधवा ॥२१॥
अंगी वाहे त्याचे रुधिर । कळला त्यांचा कृत्रिमाचार । महोत्कटे मंत्रोनि अक्षताभार । अंगावर टाकिल्या त्यांचा ॥२२॥
पाचपाच एकेका वरी । टाकिता पडले दुराचारी । गतप्राण अवनीवरी । विशाळ भारी पसरले ॥२३॥
महाभयंकर असुर । जैसे वज्रहत पर्वत थोर । पडता जाहला हाहाकार । नारीनर पळती भये ॥२४॥
मग त्याची खंडे करुन । करिते जाहले त्याचे दहन । ऋषि म्हणती हा भगवान । कश्यपनंदन निश्चये ॥२५॥
करोनिया जयजयकार । पुष्पे वर्षती सुरवर । पुढे कार्य करिती वर । उपवीते दीधली तया ॥२६॥
मग होमकर्म संपविले । तेथे सुर सर्व पातले । कश्यप सावित्रीते बोले । प्रथम भिक्षा द्यावी तुवा ॥२७॥
मिळोनि देवऋषींच्या ललना । भिक्षा घालिती जगज्जीवना । वसिष्ठ ऋषी तो सुमना । कमंडलू अर्पी तया ॥२८॥
ब्रह्मणस्पती ऐसे नाम । ठेविता जाहला ऋषिसत्तम । बुद्धी समर्पोनिया उत्तम । भारभूती नाम ठेवी गुरू ॥२९॥
निज कंठातील माळा । कुबेरे घातली बटूचे गळा । सुरानंद नाम तयेवेळा । ठेविता जाहला कौतुके ॥३०॥
वरुणे देवोनिया पाश । सर्वप्रिय नामविशेष । ठेविआ जाहला उदकेश । मग ईश शूळ अर्पी ॥३१॥
विरूपाक्ष ऐसे नाम । शंकरे ठेविले अतिउत्तम । चंद्रे स्वकला अतिसत्तम । अर्पोनि भालचंद्र म्हणे तया ॥३२॥
उमा त्रैलोक्यजननी । परशू बटूते अर्पूनी । परशुहस्त नामाभिधानी । गर्जे भवानी तेधवा ॥३३॥
पुन्हा पूजा करोनि दुर्गा । सिंहवाहन देतसे वेगा । म्हणे सुखी करी आता जगा । दैत्य मर्दुनी गजानना ॥३४॥
धरोनिया ब्राह्मणवेष । मुक्तामाला अर्पी नंदीश । मालाधर नामविशेष । ठेविता जाहला कौतुके ॥३५॥
आसनार्थ अर्पी विशेष । निजांग तेव्हा सर्प शेष । फणिराजासन नाम तयास । ठेविता जाहला उरगपती ॥३६॥
अग्नीने देऊनी दाहकशक्ती। धनंजय म्हणे तयाप्रती । महाराज तो गणपती । अवताररीती दावीतसे ॥३७॥
वायू अर्पोनि अद्भुतबल । प्रभंजननाम तेणे ठेविले । पूजा करिती देव सकल । शक्र न पूजी तयाते ॥३८॥
मी त्रैलोक्येश्वर देवनाथ । कैसा पुजू हा कश्यपसुत । ऐसा गर्व धरी पुरुहूत । अज्ञानवेष्टित होवोनिया ॥३९॥
हे समजले कश्यपाशी । मग येवोनिया तयापाशी । ऋषि म्हणे शचीपतीशी । व्यर्थ गर्वासि धरू नको ॥४०॥
हा नव्हे माझा बाळ । परब्रह्मवस्तु ही केवळ । भूभार हरणार्थ निर्मळ । जाहला अवतार माझे घरी ॥४१॥
पराक्रम याचा न जाणशी । येणे वधिले वीरजेशी । जेवी कृष्णे पूतनेशी । उद्धतधुंधुरांशी वधिले येणे ॥४२॥
राक्षसी शुकरूप धरिले । बाल वधावयासि ते आले । येणे क्षणमात्रे वधिले । मुखी दाविले विश्वरूप ॥४३॥
हा परमात्मा आनंदघन । लीलावतारी माझा नंदन । याच महिमा सहस्त्रवदन । वर्णिताही पुरेना ॥४४॥
जरी तू याचा करिशील द्वेष । नाश पावशील रे विशेष । तू पूजी परमपुरुष । गर्व अशेष टाकोनिया ॥४५॥
इंद्र म्हणे गा ऋषिसत्तमा । प्रत्यया येईल याचा महिमा । तरीच करी पूजाकर्मा । मुनिसत्तमा निश्चयेसी ॥४६॥
मग शक समीकरणाशी । म्हणे उडऊनि न्यावे या बटूशी । वंदूनि त्याचे चरणाशी । वायु वेगेसी निघाला ॥४७॥
वायू सुटला प्रबळ । की वोढवला प्रळयकाळ । वातवेगे तेव्हा अचळ । कापती चळचळ तृण जेवी ॥४८॥
पक्ष्याऐसे विशाळ द्रुम । मोडोनि पडती मोडती धाम । नारीनरांचे नेत्र उत्तम । धुरोळ्याने पूर्ण जाहले ॥४९॥
जन न वोळखती कवणाते । ब्रह्मांड व्यापिले चंडवाते । महोत्कट निश्चळ आसनाते । कदा काळी सोडीना ॥५०॥
जो अनंत ब्रह्मांडे उत्पन्न करी । क्षणामाजी पुन्हा संहारी । जो निश्चल निष्प्रपंच निर्विकारी । वायू करी काय त्याचे ॥५१॥
जो परमपुरुष निरामय । त्यासि वायू करील काय । अचळ आसनी महाकाय । नाही भय तयासी ॥५२॥
इंद्रे उपाय जो केला । तो अवघा निष्फळ जाहला । आसनावरोनि नाही ढळला । वायू भंगला तेधवा ॥५३॥
मग इंद्र म्हणे वन्हीशी । तुवा जाळावे या बटूशी । तथास्तु म्हणोनि इंद्राशी । अग्नी दहनाशि सर्सावला ॥५४॥
प्रळयाग्नी तो धडकला । मंडपी उठल्या महाज्वाळा । एकसरे जाळू लागला । हाहाःकार उठला जनांत ॥५५॥
ऐसे पाहता अदितीनंदन । क्षणात गिळी मुख पसरोन । क्रोधे जाहले आरक्तनयन । इंद्र पाहोन घाबरला ॥५६॥
मनी समजला वासव । हा आहे देवाधिदेव । व्यर्थ त्या धरोनि हाव । बहुत गर्व यासि केला ॥५७॥
मग होऊनि सद्गद । दृढ धरी पदारविंद । अनुवादे करुणा शब्द । ह्रदयी खेद बहुत त्याचे ॥५८॥
इंद्र पाहे रूप सुंदर । तव तो दिसे सहस्त्रशिर । सहस्त्रपाद सहस्त्रकर । ब्रह्मांडभर व्यापक तो ॥५९॥
चंद्रसूर्याग्निनयन । शिखा राहिली नभ व्यापून । सप्तपाताले त्याचे चरण । विराटपूर्ण रूप ज्याचे ॥६०॥
प्रतिरोमी ब्रह्मांडरचना । पाहून भूल पडली शक्रमना । मग घालोनि लोटांगणा । त्राही त्राही म्हणतसे ॥६१॥
तू आदिपुरुष परमात्मा । कोण जाणेल तुझा महिमा । भूभार रक्षणार्थ निरुपमा । सर्वोत्तमा अवतरलासी ॥६२॥
तू एक नित्य निरामय । निरुपाधी अज अव्यय । सर्वातीत तू अक्षय । महाकाय परेश तू ॥६३॥
जयमहोत्कटा विरजांतका । अदितेय विनायका । मायातीता ज्ञानप्रकाशका । कश्यप कुळटिळका दयानिधे ॥६४॥
नमो नमो पुराणपुरुषा । जगद्वंद्या बटुवेषा । टाकोनिया महारोषा । द्यावे तोषा मजलागी ॥६५॥
आम्ही अविद्या वेष्टित अज्ञान । तू सकल ज्ञानगुणनिधान । दयाळू वा कृपा करून । मज पावन करावे ॥६६॥
अनुतापे तापलो विनायका । तू पूर्णब्रह्म जगन्नायका । माझे अपराध क्षमा करी का । भक्तपालका जगत्पते ॥६७॥
शक्र करोनि जयजयकार । वारंवार करी नमस्कार । मग प्रसन्न जाहला कश्यपकुमर । ठेवी कर इंद्रशिरी ॥६८॥
पुढे चालला कार्यसोहळा । नृत्य करी अप्सरामेळा । करी गायन गंधर्वपाळा । ब्रह्मकुळा आल्हाद पै ॥६९॥
कश्यप करी नित्य विप्रभोजन । दक्षणा दे प्रीती करून । सुखी केले सुह्रज्जन । वस्त्राभरणे अर्पोनिया ॥७०॥
प्रदक्षिणा करोनि विनायकाशी । सुरनर गेले स्वस्थानाशी । वेदशास्त्राध्ययन त्याशी । कलाभेदासि सांगे ऋषी ॥७१॥
चौदाविद्या चौसष्ट कळा । कश्यपे शिकविल्या बालकाला । अदितीचे आनंदाला । संख्या नाहीत काळी ॥७२॥
सकलकलाप्रवीण जाहला । पाहोनि आनंद कश्यपाला । बालक क्रीडे मेळऊनि मेळा । बालकांचा अनुदिन ॥७३॥
बाळ बैसे सिंहावरी । हाती शोभती आयुधे चारी । फणींद्र वेढे नाभीवरी । केशर कस्तुरी ललाटी ॥७४॥
किरीटकुंडले मुक्तमाळा । रत्नखचित पदके गळा । दिव्य पीतांबर कटी मेखळा । मुद्रामेळा दशांगुळी ॥७५॥
उदयाद्रीवरी बालभास्कर । तैसा शोभे केसरीवर । मेघा ऐसा त्याचा स्वर । ऐकता चातक आनंदती ॥७६॥
ऐकता शब्द मेघगंभीर । उचंबळे महानदी नीर । ऐसा अवलोकिता कुमर । ऋषिवर धन्य मानी ॥७७॥
म्हणे जन्मांतराचा सुकृत ठेवा । चिदानंद हा मत्पुत्र भावा । पावोनिया संतोष बरवा । वाढविला करुणाकरे ॥७८॥
श्रोते ऐका सावधान । काशिराज गृही कश्यपनंदन । आता क्रीडा करील भगवान । ऐका गहन चरित्र पुढे ॥७९॥
जयजयाजी आनंदमूर्ती । तुझे गुणवर्णनी दे मज स्फूर्ती । तू जगचालक भक्तपती । पदी स्थिती लाव माझी ॥८०॥
स्वस्ति श्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराण संमत । क्रीडाखंड रसभरित । चतुर्थोध्याय गोड हा ॥८१॥
श्रीगजाननार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥ अध्याय ४ ॥ ओव्या ८१ ॥