Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय ११

श्रीगणेशाय नमः । श्रीजगदंबिकायै नमः ।

जयजयाजी आदिपुरुषा । कोण जाणे तुझिये वेषा । परि नामस्मरणे हर्षा । पावोन पावन जाहलो मी ॥१॥

तुझे करिताच स्मरण । त्याचे तुटे जन्ममरण । संसारी पावोनि कल्याण । पद निर्वाण पावती तुझे ॥२॥

यालागी हेचि मागणे । वाणी वदो सदा स्मरणे । ह्रदयकमळी भ्रमरपणे । सदा राहणे जगदीशा ॥३॥

व्यास म्हणे गा कमलासना । पुढे कथी गृत्समदाख्याना । श्रवणमात्रे आनंद मना । पावोनि अमना होतसे ॥४॥

व्यासास म्हणे सावित्रीपती । ऐक गृत्समदाची अद्भुतकीर्ती । तेणे आणोनि विप्रपंक्ती । यज्ञख्याती आरंभिली ॥५॥

गणेशवरदे यज्ञकर्म । करिता जाहला भक्तोत्तम । तेणे पावोनि सकलनाम । पुत्रोत्तम प्रगटला ॥६॥

करित मुखे शब्द घोर । तेणे दुमदुमिले दिगंतर । रक्तवर्ण कांती सुकुमार । तेज अपार शरीराचे ॥७॥

कंठी सुवर्णाची मेखळा । रुक्ममाळा शोभती गळा । अग्निहून तेजागळा । धाम डोळा न समाये ॥८॥

ऐसा बालक अवलोकुनी । गृत्समद भये विव्हल होउनी । मग म्हणे तयालागुनी । कोठूनि येणे बा जाहले ॥९॥

मातापिता तुझे कवण । बालक म्हणे करी श्रवण । तू त्रिकालज्ञानी असता जाण । मजकारणे पुससी का ॥१०॥

तूचि माझा जाणे जनक । मी तुझे जाण बालक । त्रैलोक्याकर्षणी निःशंक । समर्थ एक मी असे ॥११॥

बालकभावे करी पालन । ऐसे ऐकोन त्याचे वचन । गृत्सम हर्षभय पावून । मग नंदन त्याशी मानी ॥१२॥

गृत्समद म्हणे तेजोराशी । त्रैलोक्यविजयी म्हणविशी । परी शरण जाता गणरायासी । ही गती कसी पावशी पै ॥१३॥

आता करितो मंत्रोपदेश । तेणे प्रसन्न होवोनि विघ्नेश । त्रिलोकी पावशील यश । सुरेश होईल दास तुझा ॥१४॥

मग करूनि मंत्रग्रहण । वनी करितो पुरश्चरण । तेणे कापती देवगण । तप निर्वाण पाहूनि त्याचे ॥१५॥

मुखापासोनि निर्ज्वलन । करिता झाल्या दिशा दहन । पाहूनि त्याचे तपःसाधन । गजानन धावतसे ॥१६॥

फिरवोनिया शुंडाग्र । नादे गाजवी दिशा समग्र । ऐकता झाले ध्यान व्यग्र । तेज उग्र अवलोकिले ॥१७॥

चतुर्भुज सुहास्यवदन । भाळी रेखिला दिव्यचंदन । उदर शोभे लंबायमान । नागबंधन त्याजवरी ॥१८॥

कासे विराजे पीतांबर । मुगुटी शोभती दूर्वांकुर । वरी रुंजताति भ्रमर । मोदकीकर शोभतसे ॥१९॥

सृणी कमलमाला करी । ऐसा अवलोकून विघ्नारी । धैर्य धरोनि अंतरी । नमन करी दंडवत ॥२०॥

जोडोनिया दोन्ही कर । बालक बोले मंजूळ उत्तर । नको भय दाऊ सर्वेश्वर । मी तर दास तुझा ॥२१॥

करूनिया सौम्याकृती । पूर्ण करी वांछित गती । तू एक सुदयमूर्ती । त्रिजगती आधार तू ॥२२॥

ऐकोनि त्याची करुणावाणी । कृपेने द्रवला मोदकपाणी । आश्वासोनिया अंतःकरणी । स्वस्थ केला बालक ॥२३॥

मंदस्मित वदे गजानन । तू करोनिया एकाग्रमन । अहोरात्र करिसी ध्यान । भक्ति भावे करोनिया ॥२४॥

तोच मी हा सर्वेश्वर । वेदा न कळे माझा पार । ब्रह्माविष्णूशक्रशंकर । मदाधार तयांसी ॥२५॥

तो मी तव भक्ती पाहुनी । धावत आलो वरदानी । बालक बोले आनंदोनी । वांछित पुरवी म्हणे माझे ॥२६॥

त्रैलोक्याकर्षणी शक्ती । मज द्यावी गणपती । सुरासुर राक्षसपंक्ती । सेवेप्रति लावी माझे ॥२७॥

येथे संपूर्ण भोग भोगुन । अंती त्वत्पद पावेन । हा हेतू गजानन । पूर्ण करूनि सुख देयी ॥२८॥

येथे मी तप केले गहन । हे गणेशपूर नामाभिधान । जगी विख्यात येथून । वारणानना करी का ॥२९॥

त्याचे मस्तकी वरदहस्त ठेऊन । इभास्य बोले प्रसन्नवदन । तू त्रैलोक्यी विजयी होऊन । मत्पद पावन होशी की ॥३०॥

शंकरावाचोनि विजयी सदा । होवोनि भोगिशील अमितसंपदा । न पावशी कधी आपदा । या अनुवादा सत्य मानी ॥३१॥

सुवर्णरौप्यअयसपुर । तुज पावेल गा सुंदर । एके बाणे भेदील शंकर । कैवल्यपर होशील पै ॥३२॥

जे जे मनी तू इच्छिशील । ते तू मत्प्रसादे पावशील । ऐसा वदोनि वरद बोल । अंतर्धान पावला ॥३३॥

मग तो त्रिपुरासुर । पावोनिया दुर्धर वर । तेथे करी गणेशमंदिर । परमसुंदर रुक्ममय ॥३४॥

मूर्ती करोनि काश्मिरपाषाणाची । वेदोक्त मंत्रे प्रतिष्ठा तिची । करूनिया सदा शुची ॥ पूजा करी प्रीतीने ॥३५॥

बंगालदेशी त्रिपुरासुर । करूनिया गणेशपुर । चालवीतसे राज्यभार । राजे समग्र जिंकोनिया ॥३६॥

आक्रमोनिया सकल अवनी । मग प्रवेशला स्वर्गभुवनी । जावोनिया नंदनवनी । उतरता जाहला निर्भय ॥३७॥

चातुरंग सेनेसहित । क्रीडा करी नंदनवनात । रक्षक होऊनि भयभीत । म्हणती दुर्धर दैत्य हा ॥३८॥

नंदनवनाचा करोनि विध्वंस । मग पाचारोनि दूतास । मदोन्मत्त म्हणे त्यास । जाउनि शक्रास सांग वेगी ॥३९॥

जरी कल्याण इच्छिशील । तरी शरण आले पाहिजेल । नातरी तूते सहज घडेल । अतिदुःखाचे आयतन ॥४०॥

राहशील दासभाव धरून । तरी भूमंडळी करीन स्थापन । नातरी करी पलायन । की युद्धालागून येई का ॥४१॥

दूत निघाला तयेवेळी । जावोनिया शक्राजवळी । तयासि म्हणे वेळोवेळी । आता संभाळी निजलज्जा ॥४२॥

त्रैलोक्यकर्षणी जो समर्थ । त्रिपुरासुर दैत्यनाथ । तेणे सांगितले यथार्थ । करोनि अर्थ सांगतो तूते ॥४३॥

स्वहिती असशील शाहाणा । तरी शरण जा दैत्यचरणा । तुझी येऊनि त्यासि करुणा । बुद्धिचारणा उपदेशिली ॥४४॥

दासभावे जरी वर्तशी । तरीच संसारी सुख पावशी । वीरवाटाव असेल तुजशी । तरी समराशी सत्वर यावे ॥४५॥

ऐकोनि त्याचा ऐसा निरोप । ह्रदयाभीतरी शिरला कंप । धैर्य धरोनिया साटोप । आणोनि कोप बोलतसे ॥४६॥

त्रिपुराऐसे मशक किती । मी पाठविले अंतकपुरीप्रती । तुझा मूढा पाड किती । रणी ख्याती कळेल तूते ॥४७॥

इंद्रे केली अद्भुत गर्जना । सेनापतीसह सिद्ध सेना । करोनिया वाद्ये नाना । रणकर्कशे वाजविली ॥४८॥

ऐरावतारूढ सत्वर । घेऊनि त्रिदशांचे वीरभार । निघाला नगराबाहेर । शंखबळे त्राहटिले ॥४९॥

इंद्रे धरोनि वीरवृत्ती । येत आहे समराप्रती । हे जाणोनिया दैत्यपती । सेना निगुती सिद्ध करी ॥५०॥

सेनेचे करोनि भागत्रय । कालकूट वदज्रंष्ट्र दैत्यराय । पाचारोनि सांगे त्याशी सोय । म्हणे तुम्ही हे कार्य करा ॥५१॥

भूमंडल आणि पाताल । तेथील जिंकाजी स्थलपाल । मी जिंकोनिया आखंडल । लोकपाल वश करितो ॥५२॥

उभय सेनेची पडली गाठ । सिंहनादे वीर उद्भट । गर्जताति धरोनि हट । रोखोनि वाट परस्परे ॥५३॥

येरयेरावरी लोटले । अश्वांसी अश्व झगटले । गजांवरी गज भीडले । रथ लोटले रथांवरी ॥५४॥

माथा हाणती निष्ठुरघाय । हात खंडले तुटले पाय । कर्णकुंडले भंगले काय । जाहले विकल घायबळे ॥५५॥

शस्त्रे घालून फोडिली उदरे । अंत्रे लोंबती एकसरे । कित्येक प्राणे झाले पुरे । घाये घाबरे चरफडती ॥५६॥

अश्वांचे तोडिती चरण । वीरी वीरांचे घेतले प्राण । गंडस्थळी भेदिले वारण । रणी निर्वाण मांडले ॥५७॥

शर वर्षती घनदाट । वायूस न चले तेथे वाट । द्वंद्वयुद्धी मिनले भट । पाय मागे न ठेविती ते ॥५८॥

ध्वजस्तंभ पाडिले तोडिले अंक । सपिच्छ भेदले उरी सायक । मूर्च्छा पावले वीर अनेक । प्राणे कित्येक घाबरे ॥५९॥

रथ भंगोनि अश्व मारिले । महावीर रणी पहुडले । तेणे दैत्य पराभविले । पळू लागले दशदिशा ॥६०॥

अमरी केला अद्भुत मार । गदापट्टीशपाशतोमर । घनदाट वर्षले शर । तेणे असुर माघारले ॥६१॥

स्वसैन्यासी सुटला पळ । अवलोकून त्रिपुर प्रबळ । क्रोधे पेटला प्रलयानळ । वृंदारक कुळ अवलोकिले ॥६२॥

सज्ज करोनिया सायक । शर वर्षे अनेक । तेणे भेदिले वृंदारक । ह्रदयी कंप संचरला ॥६३॥

जैशा मेघाच्या धारा । सायक वर्षे एकसरा । देव माघारले न धरवे धीरा । इंद्र सामोरा मग धावे ॥६४॥

त्रिपुरासि म्हणे पुरंदर । राहे राहे क्षणभर स्थिर । तुझे छेदीन आता शिर । रणी धीर धरी आता ॥६५॥

मेघ गर्जे प्रळयकाळी । तैसा गर्जोनि त्रिपुरबळी । इंद्रासि म्हणे तयेवेळी । व्यर्थ कळी मांडली का ॥६६॥

कृमी कीट प्राणियांशी । प्राण प्रिय आहे त्यांशी । तू का व्यर्थ प्राण देशी । कुटुंबाशी मुकोनिया ॥६७॥

तुज दीधले धरणीतळ । आता सत्वर येथून पळ । ऐसे बोलोनिया सबळ । दैत्यराव खवळला ॥६८॥

खड्गघाय हाणोनि इंद्राशी । वज्र पाडिले भूमीसी । प्रहार हाणोनि ऐरावताशी । गज वेगेशी पळविला ॥६९॥

शक्रे कोपोनि मुष्टिघात । त्रिपुराचे ह्रदयी हाणित । दैत्य पडिला तेणे मूर्छित । मग क्षणात ऊठला ॥७०॥

कोपे खवळोनि दैत्यपती । मुष्टिघाते ताडिला शचीपती । मूर्च्छा दाटोनिया निगुती । भूमीवरी पडियेला ॥७१॥

सावध होवोनि तयेवेळी । मल्लयुद्धी शक्र मिसळे । करतळासि हाणिती करतळे । हाणिती भाळे भाळाशी ॥७२॥

पृष्ठीस पृष्ठी हाणिती । उल्लाळ देऊन उसळती । एकमेकांवरी आदळती । मग कवळती परस्परे ॥७३॥

त्रिपुरे धरोनि शक्रचरण । गरगरा करोनिया भ्रमण । दूर दीधला टाकून । देहभान त्यासि नाही ॥७४॥

भूमंडळी गिरिकंदरात । इंद्र पडला तेव्हा मूर्च्छित । त्रिपुर सिंहनादे गर्जत । मदगर्वित तेधवा ॥७५॥

दशदिशा देव पळती । दैत्य जयजयकारे गर्जती । आनंदे निर्भर नाचती । मग वाजविती जयवाद्ये ॥७६॥

ऐरावतारूढ त्रिपुरासुर । प्रवेशला इंद्रनगर । देव होवोनि भयातुर । पळते झाले दशदिशा ॥७७॥

सुधापानी शोध करिती । न सापडे शचीपती । गिरिकंदरे देव धुंडिती । दुःख करिती बहुसाल ॥७८॥

तव येता देखिला पुरंदर । अधोमुख म्लानवक्त्र । त्यासि पाहून देव समग्र । परस्पर भेटती ते ॥७९॥

इंद्रासि देता आलिंगन । म्हणती आज जाहला सुदिन । सर्व लोकपाळ एक होऊन । गिरिकंदरी राहिले ॥८०॥

त्रिपुरासुर इंद्रनगर । प्रवेशला हर्षे निर्भर । आरूढला इंद्रासनावर । आनंद थोर मांडिला ॥८१॥

दुंदुभी वाजवूनिया निगुती । अप्सरा दुःखे नृत्य करिती । ग्वाही फिरली स्वर्गावरती ॥ त्रिपुर इंद्र आज जाहला ॥८२॥

स्वस्तिश्रीगणेशप्रताप ग्रंथ । गणेशपुराणसंमत । उपासनाखंड रसभरित । एकादशोध्याय गोड हा ॥८३॥ अध्याय ॥११॥ ओव्या ॥८३॥

श्री गणेश प्रताप

भगवान दादा
Chapters
प्रस्तावना अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ क्रीडाखंड अध्याय ४ क्रीडाखंड अध्याय ५ क्रीडाखंड अध्याय ६ क्रीडाखंड अध्याय ७ क्रीडाखंड अध्याय ८ क्रीडाखंड अध्याय ९ क्रीडाखंड अध्याय १० क्रीडाखंड अध्याय ११ क्रीडाखंड अध्याय १२ क्रीडाखंड अध्याय १३ क्रीडाखंड अध्याय १४ क्रीडाखंड अध्याय १५ क्रीडाखंड अध्याय १६ क्रीडाखंड अध्याय १७ क्रीडाखंड अध्याय १८ क्रीडाखंड अध्याय १९ क्रीडाखंड अध्याय २० क्रीडाखंड अध्याय २१ क्रीडाखंड अध्याय २२ क्रीडाखंड अध्याय २३ क्रीडाखंड अध्याय २४ क्रीडाखंड अध्याय २५ क्रीडाखंड अध्याय २६ क्रीडाखंड अध्याय २७ क्रीडाखंड अध्याय २८ क्रीडाखंड अध्याय २९ क्रीडाखंड अध्याय ३० क्रीडाखंड अध्याय ३१ क्रीडाखंड अध्याय ३२ क्रीडाखंड अध्याय ३३ क्रीडाखंड अध्याय ३४