अध्याय १८
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वतै नमः । श्रीगुरुभ्यो नमः ।
श्रीक्षेत्रपालाय नमः । जयजयाजी गजवदना । पूर्णब्रह्मा मनमोहना । भवभयगजारीपंचानना । निरंजना सुखाब्धे ॥१॥
तुझे स्मरलो चरणासी । तेणे संतोषलो मानसी । टाकोनिया भवभयासी । सदा सेवेसी सादर ॥२॥
टाकोनिया सकल आधी । आरंभिला हा ग्रंथोदधी । तूचि कर्ता याची सिद्धी । इतर बुद्धिमान कोण पै ॥३॥
श्रोते ऐका सावध आता । कौंडिण्य सांगे गणेशकथा । सादर ऐके त्याची वनिता । दूर्वामाहात्म्य कौतुके ॥४॥
मुनि म्हणे नितंबिनी । एके दिवसी नारदमुनी । गेला गणेशदर्शनालागुनी । आनंद मनी तयाच्या ॥५॥
गणेशे धरोनि नारदकर । आसनी बैसविला सादर । गणपतीस म्हणे ऋषीश्वर । कौतुक थोर सांगू आलो ॥६॥
भूलोकी जगविख्यात । मिथिलानगरी पुण्यवंत । जनकराजा राज्य करीत । शांतदांतउदार पै ॥७॥
यथेष्ट पुरवी याचककाम । अन्नदान करी उत्तम । महाधार्मिक तो परम । त्यासि उपमा नाही नाही ॥८॥
धर्मार्थ तो असंख्य धन । वेची परी नोहे न्यून । त्याचे पाहोनि महिमान । मी वचन बोलिलो तया ॥९॥
तुजला प्रसन्न गजवदन । तेणे तूते भाग्यधन । सदैव पुरवी भगवान । गजानन कृपाळू ॥१०॥
ऐसी ऐकता माझी भारती । ब्रह्मज्ञानवेत्ता भूपती । काय बोलला मजप्रती । ते गणपती ऐकावे ॥११॥
माझेच स्वरूपावाचोन । जगत्रयी नसे दुजे आन । कर्ता कारण मीच जाण । गर्वै करोन बोले असे ॥१२॥
मग मी बोललो तयासी । अरे कर्ता भगवान या जगासी । असोन गर्वै तू भुललासी । आता प्रत्ययासि पावशील ॥१३॥
ऐसे बोलोनि तयासी । सांगो पातलो तुजपाशी । मग पुसोनि हेरंबाशी । वैकुंठाशी मुनि गेला ॥१४॥
त्याचे सत्व अवलोकन । करावयासि निघे गजवदन । होवोनि वृद्ध ब्राह्मण दीन । कुश्चित काय तेधवा ॥१५॥
हातपाय गेले झडोन । रक्त गळे अंगातून । दुर्गंधी सुटली दारुण । मक्षिका वरी घोंगावती ॥१६॥
ऐसा येऊनि राजद्वारी । द्वाररक्षकांस म्हणे ते अवसरी । अतिथि पातलो तुमचे घरी । भूपतीसि वेगे सांगारे ॥१७॥
धावोनि जाती सेवकजन । अतिथि आला ब्राह्मण दीन । ऐसे सांगती जनका लागोन । ऐकोन राजा धावत ये ॥१८॥
करोनिया नमन तेवेळी । घेनि गेला पूजास्थळी । पूजन करोनि करतळी । तया जवळी बैसला ॥१९॥
काय इच्छा आहे स्वामी । येरू म्हणे मी अन्नकामी । मग नेवोनि पाकधामी । पात्र पुढे विस्तारिले ॥२०॥
वाढिली षड्रस अन्ने । जेविता कदा पुरे न म्हणे । सर्व खावोनि पक्वान्ने । मग हिर्वी धान्ये भक्षिली ॥२१॥
नाहीसे केले किंचित धान्य । मग वाढिली फळे वन्य । लोक म्हणती धन्यधन्य । राक्षस हा होय की ॥२२॥
अतृप्त बोले ब्राह्मण । नाही उदर भरले पुर्ण । राजा पाहे दीनवदन । सत्व याणे घेतले ॥२३॥
तेथून तसाच निघाला । एके द्विजाचे घरी पातला । तेथे दूर्वांकुरे तृप्त जाहला । मग उद्धरिला ब्राह्मण तो ॥२४॥
कौंडिण्य म्हणे सीमंतिनी । दूर्वामहात्म्य तुजलागुनी । सांगीतले प्राणप्रिया म्हणोनी । सत्य मानी राजसे ॥२५॥
दूर्वामहात्म्य ऐकता कानी । संशय न जोडी मानिनी । मग तिजलागी कौंडिण्यमुनी । एक दूर्वांकुर देतसे ॥२६॥
हा दूर्वांकुर घेवुनी । तुवा जावे इंद्रभुवनी । याचे भारंभार तयापासुने । सुवर्ण तुवा आणावे ॥२७॥
मग ती वंदोनि पतिचरण । प्रवेशली इंद्राचे भुवन । त्यासि देवोनि आशिर्वचन । पतिवचन निवेदी ॥२८॥
इंद्रे देवोनिया दूत सवे । म्हणे तुवा कुबेरमंदिरे जावे । तेथे दूर्वाभार सुवर्ण घ्यावे । मग जावे निजगृही ॥२९॥
तेथून निघाली आश्रया । आली वैश्रवणालया । धनाधीशे तुला आणोनिया । दुर्वांकुर ठेविला वरी ॥३०॥
आत घातले नवनिधी । परी पारडे न हाले कधी । मग मानोनिया अपूर्वविधी । म्हणे कधी न पाहिले असे ॥३१॥
मग आपले स्त्रियेची भूषणे । पारड्यात घातली वैश्रवणे । परी न ये दूर्वांकुर तुळणे । मनी म्हणे नवल जाहले ॥३२॥
इंद्रादि देवांची संपत्ती । मग आणोन पारड्यात घालिती । तव धावला कमलापती । तोही घाली निजभूषणे ॥३३॥
परी पारडे किंचित न हाले । मग सर्व देव ऋषीस शरण आले । म्हणती नेऊ दूर्वामहात्म्य भले । तूच जाणिले ऋषिवर्या ॥३४॥
मग तेणे पाचारिली प्रिया । आश्चर्य करी तेव्हा आश्रया । मनी म्हणे पतिवचनी अविश्वासोनिया । मी तो वाया श्रमी जाहले ॥३५॥
मी आहे महापापिणी । मग मस्तक ठेऊनिया पतिचरणी । म्हणे आता उद्धरावी आपली रमणी । क्षमा करोनि अपराध ॥३६॥
ऋषीने तिशी उचलोन । प्रेमे दीधले आलिंगन । म्हणे नित्य दूर्वा आणोन । गजवदन अर्चन करी ॥३७॥
गणेशदूत म्हणती ऋषीशी । दूर्वामहात्म्य कथिले तुम्हाशी । दूर्वायोगे खरवृषभांशी । चांडालिशी उद्धार तेणे ॥३८॥
करिता दूर्वांचे स्मरण । पातक दग्ध होय दारुण । चिंतामणी क्षेत्रमहिमा वर्णन । स्फुट केले यथामती ॥३९॥
गणेशोपासके दूर्वांकुर । आणोनि पूजावा लंबोदर । प्रमादे न करी जो नर । नरक घोर तयासी ॥४०॥
जो दूर्वांकुरे करी अर्चन । इतर त्याचे दर्शनेकरून । उद्धरताति पातकी जन । काय महिमान वर्णू आता ॥४१॥
ब्रह्मा म्हणे कृतवीर्य पित्याशी । चतुर्थीव्रत करिता त्वत्सुताशी । संतती होईल गा त्याशी । निश्चयेसी जाण पा ॥४२॥
शूरसेन राजा इंद्रासि पुसे । मग कृतवीर्ये केले कैसे । ते आता प्रसन्न मानसे । मज उल्हासे कथी का ॥४३॥
शक्र म्हणे नरवीरा । कृतवीर्य जनके निजकुमरा । स्वप्नी उपदेशिल या चरित्रा । दूर्वामाहात्म्यसमवेत ॥४४॥
संकष्टीव्रत महिमान । एक पुस्तकी करून लेखन । स्वप्नी दीधले पुत्रालागोन । म्हणे संतान होईल तुजसी ॥४५॥
जागृत होवोनि राजा वनी । शोकहर्ष करी मनी । सन्निध पाहे पुस्तकालागुनी । मग मनी आश्चर्य करी ॥४६॥
येऊनिया स्वनगरासी । पाचारोनि पंडितांसी । मग सोडोनिया पुस्तकासी । त्यातील अर्थासी श्रवण करी ॥४७॥
मग बोलाऊनि अत्रीशी । विध्युक्त करी व्रतग्रहणाशी । तेणे संतोष जाहला गणरायाशी । मग रायासी तुष्टला ॥४८॥
संकष्टचतुर्थी व्रतमहिमान । भृगू सांगे सोमकांतालागोन । ब्रह्मदेव करी कथन । पराशरनंदन श्रवण करी ॥४९॥
श्रोते श्रवण करा निश्चित । पुढे कार्तवीर्य जन्मेल सुत । जो विष्णुअंश वियात । पुण्यवंत सहस्त्रकर ॥५०॥
जयजयपुराणपुरुषा जगदीशा । परात्परा परेशा । माझी पूर्ण करी तू आशा । जन्मपाशा छेदोनिया ॥५१॥
स्वस्ति श्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराणसंमत । उपासनाखंडरसभरित । अष्टादशोध्याय गोड हा ॥५२॥
श्रीगजाननार्पणमस्तु । अध्याय ॥१८॥ ओव्या ॥५२॥