Get it on Google Play
Download on the App Store

क्रीडाखंड अध्याय ५

श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।

जयसंसार गजपंचानना । मायामोहपाशच्छेदना । कामादि षड्रिपु मर्दना । वारणानना गणपती ॥१॥

पूर्वाध्यायी अनुसंधान । करोनि इंद्राचे गर्वमोचन । सिंहारूढ जगज्जीवन । कश्यपनंदन जाहला ॥२॥

आता ऐकावे सावधान । काशिराजगृही ब्रह्मनंदन । जाता आदरे राजयान । पूजोपचारे तोषविले ॥३॥

राजा म्हणे कश्यपमुनी । धन्य आलो या निकेतनी । अनुग्रहावे आज्ञावचनी । ते अभिवंदनी करीन मी ॥४॥

ऋषि म्हणे गा राजसत्तमा । तुझे उपाद्धीक द्यावे आम्हा । राजा म्हणे गोष्ठी उत्तमा । ऋषिसत्तमा मान्य मज ॥५॥

माझे घरी आहे शोभन । ते कार्य करावे संपादन । ऋषि म्हणे माझा नंदन । त्यास आणोन कार्य करी ॥६॥

रथी बैसोनिया उभयता । ऋष्याश्रमी आले तत्वता । वंदोनिया अदितीसुता । राजा प्रार्थिता जाहला ॥७॥

राजा म्हणे तयासि भावे । माझे घरी तुवा यावे । येरू हर्षे बोले भावे । म्हणे पुसावे मातेसी ॥८॥

राजा प्रार्थी अदितीशी । यास पाठवावे माझे गृहाशी । येरू म्हणे तान्हयाशी । परदेशी धाडू कैसा ॥९॥

राजा म्हणे देवमाते । मी स्वांगे पाळीन याते । लग्न जाहलियावरी बालकाते । पुन्हा मागुते पोचवीन ॥१०॥

निघता जाहला विनायक । तेणे नमिले माताजनक । सिद्ध जाहला पाहोनि बालक । माता मनी खेद करी ॥११॥

नेत्री जीवन आणोनि दक्षबाळा । तीट लावी त्याचे भाळा । दृष्टी लागेल वेळोवेळा । म्हणोनि घाली गळा दृष्टिमणी ॥१२॥

अदिती म्हणे सुकुमारा । लवकर यावे परतोन घरा । तुजवीण न गमे कुमरा । गृही मजला निश्चये ॥१३॥

रथी वाहोनि विनायक । स्वनगरा चालला नरनायक । महारण्यी प्रवेशले देख । तेथे कौतुक वर्तले ॥१४॥

नरांतकाचा पितृव्य अतिक्रूर । रौद्रकेतूचा भ्राता दुर्धर । धूम्राक्षनामे असुर । तेणे दिनकर आराधिला ॥१५॥

दिव्य दशसहस्त्र वर्षे । तप पाहोनि तरणी तोशे । मग खङ्ग पाठविले संतोषे । तेज विशेषे फाकतसे ॥१६॥

जैसा उतरला प्रतिभास्कर । ऐसे पाहूनि दिव्यअस्त्र । रथाखाली सत्वर । अदितीकुमर उडी टाकी ॥१७॥

ते घेवोनिया अमोघ अस्त्र । तुळोनि पाहे कोमलगात्र । पुढे लताकीर्ण जाळी पवित्र । तोडोनि पाडे कौतुके ॥१८॥

त्या जाळीत तो असुर । तप करीत होता दुर्धर । त्याचे तुटोन गेले शीर । वाहे रुधिर भडभडा ॥१९॥

ज्याचे त्यास फळले तप । दुर्बुद्धीचा जाहला साक्षेप । अस्त्रयोगे करिता पाप । सज्जन अमुप पीडिताती ॥२०॥

म्हणोनिया निजभक्तपे । अस्त्र हरिले साक्षेपे । करुणा करे गणाधिपे । कौतुक दाविले राजयाते ॥२१॥

राजा पाहोनि चमत्कारला । म्हणे अनायासे लाभ जाहला । अस्रुर सहज नाश पावला । संतोष जाहला तयासी ॥२२॥

त्या निशाचराचे नंदन । नामे मनु आणि दुसरा जघन । पाहोनिया जनकाचे निधन । क्रोधे ज्वलन पेटले जेवी ॥२३॥

देऊनिया दंड हाका । विशाळ पसरोनिया मुखा । म्हणती दुष्ट रे नरनायका । यदर्थ बाळका आणिले तुवा ॥२४॥

नरांतके तुला रक्षियेले । त्याचे उपकार बरे फेडले । भयभीत होवोनि बोले । कर जोडले राजयाने ॥२५॥

नाही तुमची नाशकल्पना । मंगल कार्यार्थ कश्यपनंदना । नेतो हे तुमचे मना । सत्य वाटले पाहिजे ॥२६॥

मग करोनि वंदन । राजा म्हणे दैत्यालागुन । न मारावे मजलागुन । हा नंदन घेऊन जा ॥२७॥

मग म्हणे विनायक । धन्यधन्य तू नरनायक । आणोनि दुसर्‍याचा बाळक । केले सार्थक तयांचे ॥२८॥

दैत्यासि देशी मजलागुन । माझी माता सोडील प्राण । तुझे कीर्तीचे मुखदारुण । कृष्णवर्ण होईल की ॥२९॥

कश्यपमुनी जरी कोपेल । सकुल तूते भस्म करील । क्रोधाविष्ट दैत्य सबल । गिळावया धावती तेव्हा ॥३०॥

दैत्य आले हे पाहुनी । विनायके भीम हाक देउनी । धावला मुख पसरोनी । दैत्य पाहूनि घाबरले ॥३१॥

नासाश्वासे फुंकले । मेघमंडळी भ्रमू लागले । नरांतक नगरावरी पडले । मूर्च्छा पावले निचेष्टित ॥३२॥

पडता नगरीत असुर । शब्द गाजला महाथोर । घाबरे धावती निशाचर । भिन्न शरीर पाहिले ते ॥३३॥

शिंपोनिया शीतलोदके । सावध करोनि बैसविले निके । ते म्हणती श्वासे उडविले विनायके । आज कौतुके मेघमंडळे ॥३४॥

तेथोनि पडता जाण । शरीर जाहले शतचूर्ण । ऐसे ऐकता चारगण । नरांतकासि सांगती ॥३५॥

पितृव्य धूम्राक्षांचे मरण । नरांतके करोनिया श्रवण । पुढे उभे राक्षसगण । त्यास आज्ञा करीतसे ॥३६॥

तुम्ही जाऊनिया सत्वर । धरोनि आणा कश्यपकुमर । ऐसे ऐकता निशाचर । पंचशत वीर निघाले ॥३७॥

करित पातले गदारोळ । पाहोनि घाबरला भूपाळ । म्हणे बाळका कठिण वेळ । आला काळ तुजशी मजशी ॥३८॥

महोत्कट म्हणे गा पार्थिवा । क्षणभरी तुवा धीर धरावा । ऐसे बोलोनि भीमरवा । करिता जाहला बाळक ॥३९॥

त्याचा ऐकता सिंहनाद । मूर्च्छित पडले असुरवृंद । कितीकांचा प्राणभेद । शरीरासि जाहला ॥४०॥

कितेक सावध होवोनिया पळती । मार्गी अडखळोनि पडती । त्यांचे करचरण मोडती । कितीक चडफडती प्राणभये ॥४१॥

कितीक मार्गी जाहले पुरे । कितीकांचे पडले खटारे । कितीक पळोनि एकसरे । येवोनि घाबरे बोलती ॥४२॥

नरांतकासि म्हणती असुर । बुडाले बुडाले तुझे घर । त्याचा ऐकोनिया भीमस्वर । निशाचर निमाले ॥४३॥

ऐकोन बोले नरांतक । काय सांगता रे तुम्ही कौतुक । अहो मी जिंकिता तीन्ही लोक । कर्बुर नायक मी असे ॥४४॥

अंडज प्रभू पुढे दंदशूक । की बिडाला पुढे मूषक । सिंहापुढे जैसा जंबुक । कश्यपबालक मजशी तैसा ॥४५॥

मूषके कोरूनि काय कनकाचळ । उलथोन पाडिला सबळ । काय करील ब्राह्मणाचे बाळ । भलतेच बरळ वदतसा ॥४८॥

नवग्रहांचे बळ घटाशी । तरी तो काय तगेल वज्राशी । राक्षस म्हणती तयाशी । बरळशी किमर्थ व्यर्थ तू ॥४७॥

नरांतक पुसे कोठे गेला । येरू म्हणती नृपे नेला । ऐकोनि असुरनाथे दैत्याला । आदेश केला ते काळी ॥४८॥

तुम्ही जावोनि बलाढ्य असुर । लुटारे काशीराज नगर । वधोनिया रूपकुमर । यावे सत्वर मजपासी ॥४९॥

हे कार्य केल्यावाचुन । जरी याल अधोवदन । तरी तुम्हासि मी वधीन । सत्य वचन हे माना ॥५०॥

मग देवोनिया वस्त्राभरण । तेणे प्रेरिला सेनागण । इकडे नृपवीर नायकासि घेऊन । स्वनगरी प्रवेशला ॥५१॥

घाला ऐकोनिया विनायक । जन धावती एकाएक । सामोरी येती अमात्यलोक । अपार कटक घेऊनिया ॥५२॥

लागला वाद्यांचा गजर । गजस्कंधी मिरवे आदिकुमर । चामरे ढाळिती अनुचर । छत्रे अपार धरियेली ॥५३॥

गावात प्रवेशला भक्तपती । नगरींच्या स्त्रिया ऐकोन धावती । अवगणोनि प्रपंचस्थिती । सद्गदित होती अष्टभावे ॥५४॥

कित्येक जेवीत होत्या नारी । तैसाच करींचा कवळ करी । वेगे धावती सुंदरी । वीरजाती पाहावया ॥५५॥

एक नग्न न्हात होती तरुणी । केशरकस्तुरीयुक्त शिरी चोखणी । नग्न हाती घेऊन फणी । धावे मणी पाहावया ॥५६॥

एक ललना होती कांडित । ऊर्ध्व गुंतला मुसळी हात । सुंदरी ऐकोनि ऐसी मात । ये धावत पाहावया ॥५७॥

एक वस्त्र नेसता सुंदरी । आला ऐकोनि धूम्राक्षारी । धरिल्या निर्‍या तैशाच करी । धावे नारी लगबग ॥५८॥

एक घाली अर्ध कंचुकी । तैशीच धावे एकाएकी । बाळी खोवोनिया नाकी । धावे एक पाहावया ॥५९॥

वेणीस खोवोनिया बुगडी । कानी खोवोनि विडी । नेसता गळाली तिची साडी । धावे उघडी पाहावया ॥६०॥

पाक करिता एक बाळी । हाती घेऊनि लाटणे पळी । मस्तकी ठेवोनि पोळी । धावे उतावळी पाहावया ॥६१॥

बाळे ठेवोनिया शिंक्यावरी । कडे घेवोनिया घागरी । अनवट पैंजण बाधोन शिरी । धावे सुंदरी पाहवया ॥६२॥

कुंकुमे भरोनिया नयन । भाळी रेखिले कृष्णांजन । नाकी हरिद्रा चर्चुन । ये धावोनि पाहावया ॥६३॥

मनगटी घालोनि तोरड्या । पायी घालोनिया बांगड्या । नारी वलंघोनि माड्या । अनन्यभावे अवलोकिती ॥६४॥

भुवन सुंदर मनमोहन । पाहोनि विनायकाचे वदन । तन्मय जाहले त्यांचे मन । देहभान विसरल्या ॥६५॥

आर्ती घेवोनि रत्नताटी । एक वोवाळी तेव्हा गोरटी । नयनभ्रमरी घातली मिठी । मुखकमळी तयाचे ॥६६॥

लाह्या उधळिती कामिनी । उघड्या पाहती नितंबिनी । परस्पर म्हणती मानिनी । धन्य जननी तयाची ॥६७॥

मदनमोहन महाराजस । वेधक मूर्ती गे डोळस । जी वरील अंगना यास । तिचे पुण्यास पार नाही ॥६८॥

याचे पाहता गे वदन । देह गेह गेला विसरोन । मन्मथ सांडावा वोवाळून । पद नखावरून ययाच्या ॥६९॥

ऐसे परस्परे अनुवादुनी । पुष्पांजली वोपिती कामिनी । समारंभे प्रवेशला कैवल्यदानी । राजकामिनी धावल्या ॥७०॥

रत्नदीप घेऊनि करी । हर्षे वोवाळिती सुंदरी । भेटी घेता लाहानथोरी । नवल परी वर्तली ॥७१॥

कपटवेषी दोन असुर । नागरिक वेषे येऊनि सत्वर । महोत्कटाते करोनि नमस्कार । आलिंगनासि मिसळले ॥७२॥

आलिंगनमिषे तयाशी । रगडू पाहती पापराशी । कापट्य आणोनिया मानसी । असुरांसि भेटे विनायक ॥७३॥

सबळ देवोनि आलिंगन । शरीर केले त्यांचे चूर्ण । ते होवोनिया गतप्राण । राक्षस होवोनि पडियेले ॥७४॥

दशयोजने लंबायमान । असुर पडले अवलोकून । भयभीत होऊनिया जन । दशदिशी पळाले ॥७५॥

मृत पाहोनिया निशाचर । राजा करी जयजयकार । साधुसाधु म्हणती समग्र । बळ अपार बाळकाचे ॥७६॥

यासि न म्हणावे कदा मानव । हा परमपुरुष देवाधिदेव । कश्यपपुण्ये पुत्रभाव । पावोनि अभिन्नव लीला करी ॥७७॥

रथारूढ विश्वपती । घेवोनि चालला भूपती । तव पतंग विधूतनामे पापमती । असुर धावती सन्मुख ॥७८॥

त्यांच्या प्रभावांचा दरारा । अत्यद्‌भुत सुटला वारा । धुळी उडोनिया अंबरा । प्रकाश एकसरा लोपला ॥७९॥

घोर अंधकार दाटला । कोणासि कोणी न दिसे डोळा । काशीपती म्हणे रे बाळा । कठीण वेळा पातली ॥८०॥

घोर वायूचेनि बळे । प्रासाद पडती तयेवेळे । मोडोन गगनी वृक्षपाळे । पक्ष्यापरी भोवती ॥८१॥

हलकल्लोळ जाहला तयेवेळी । रथ उडो पाहे अंतराळी । स्वभारे दडपी महोत्कट बळी । असुरी फळी धरिली पुढे ॥८२॥

त्यांचे धरोनि कंठनाळ । सुकुमार अदितीचा बाळ । मस्तकी मुष्टिघात प्रबळ । मारोनि खळ मर्दीतसे ॥८३॥

योजनमान विस्तीर्ण । असुर पडले गतप्राण । पुष्पे वर्षती सुरगण । मग समीरण राहिला ॥८४॥

तेणे जन जाहले स्वस्थ । राजा जाहला हर्षभरित । म्हणे हा अवतरला अनंत । जाहला सुत कश्यपाचा ॥८५॥

राजा वंदी त्याचे चरण । जयजयकार करोनि पूर्ण । पुढे करी सुखे प्रयाण । आनंदघन होवोनिया ॥८६॥

आले राजमंदिरासमीप । तव तेथे राक्षस पाषाणरूप । पाहोनिया निजभक्त जनप । परशू वरी ताडण करी ॥८७॥

परशे पाषाण भग्न जाहले । त्यातून भ्यासुर राक्षस उठले । विनायकावरी धाविन्नले । मुख पसरिले विशाळ त्याही ॥८८॥

दीर्घकाय आणि स्मश्रुल । तिसरा नामे तो पिंगल । दाढा भ्यासुर मुख कराल । पाहोनि जन पळाले ॥८९॥

निर्भय अचल कश्यपात्मज । जो आनंदघन परमात्मा अज । मुष्टिघाते राक्षस सहज । मारिले तेणे क्षणार्धे ॥९०॥

जन पाहता ऐसी लीला । आनंदाश्रू वाहती त्यांचे डोळा । पद नमी वेळोवेळा । राजा तेव्हा भावार्थे ॥९१॥

मग रथाखाली उतरोनी । राजा आला सभास्थानी । बालक बैसवोनि भद्रासनी । मग पूजनी रत जाहला ॥९२॥

षोडशोपचारे पूजा करून । पाचारोनि अवघे सुह्रज्जन । षड्रस अन्ने ताटी वाढून । करी भोजन यथाविधी ॥९३॥

सन्निध बैसवोनि वोजा । महोत्कटासि भोजन करवी राजा । तांबूल देऊनि कश्यपात्मजा । अनर्घ्या भरणे शृंगारी ॥९४॥

करोनि अरळ सुमनशेज । वरी पहुडविला गणराज । कर जोडोनि उभा काशिराज । आदित्यात्मज मुख पाहे ॥९५॥

विनायक म्हणे राजयाशी । निद्रा करी तू श्रमलासी । दोन अमात्य ठेऊनि रक्षणाशी । भोगमंदिरासि प्रवेशला ॥९६॥

चारुललना समवेत । राजा आनंदे क्रीडा करित । मुखे गणेशलीला गात । होय विस्मित क्षणक्षणा ॥९७॥

प्रभात काळी करोनि स्नान । नित्य कर्म देवतार्चन । राजकांता स्वये येवोन । घाली भोजन बाळकासी ॥९८॥

संगे घेऊनि चिमणेबाळ । विनायक खेळे विचित्र खेळ । राजा येवोनि वेळोवेळ । करी सांभाळ प्रीतीने ॥९९॥

राजगृही धूम्राक्षारी । परोपरी क्रीडा करी । निजभक्तांची चिंता हरी । मनी मोह करी रायाचे ॥१००॥

भक्तानुकंपी भगवान । न कळे त्याचे चरित्र गहन । लीलावतारी आनंदघन । कश्यपनंदन जाहला ॥१॥

उतरावया भूभार । पूर्णावतारी जगदीश्वर । माझा कैवारी मजवर । कृपा अपार करीतसे ॥२॥

त्याचा पदारविंद आमोद । सेवी विनायक हा मिलिंद । तेणे पाहोनि ब्रह्मानंद । निश्चलपणे राहतसे ॥३॥

स्वस्ति श्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराणसंमत । क्रीडाखंड रसभरित । पंचमोध्याय गोड हा ॥४॥

अध्याय ॥५॥ ओव्या ॥१०४॥

श्री गणेश प्रताप

भगवान दादा
Chapters
प्रस्तावना अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ क्रीडाखंड अध्याय ४ क्रीडाखंड अध्याय ५ क्रीडाखंड अध्याय ६ क्रीडाखंड अध्याय ७ क्रीडाखंड अध्याय ८ क्रीडाखंड अध्याय ९ क्रीडाखंड अध्याय १० क्रीडाखंड अध्याय ११ क्रीडाखंड अध्याय १२ क्रीडाखंड अध्याय १३ क्रीडाखंड अध्याय १४ क्रीडाखंड अध्याय १५ क्रीडाखंड अध्याय १६ क्रीडाखंड अध्याय १७ क्रीडाखंड अध्याय १८ क्रीडाखंड अध्याय १९ क्रीडाखंड अध्याय २० क्रीडाखंड अध्याय २१ क्रीडाखंड अध्याय २२ क्रीडाखंड अध्याय २३ क्रीडाखंड अध्याय २४ क्रीडाखंड अध्याय २५ क्रीडाखंड अध्याय २६ क्रीडाखंड अध्याय २७ क्रीडाखंड अध्याय २८ क्रीडाखंड अध्याय २९ क्रीडाखंड अध्याय ३० क्रीडाखंड अध्याय ३१ क्रीडाखंड अध्याय ३२ क्रीडाखंड अध्याय ३३ क्रीडाखंड अध्याय ३४