धडपडणारी मुले 9
“थोडे शेंगाचे दाणेहि आणले आहेत,” मुजावर म्हणाला.
“माझी भूक तुम्हांला कोणीं सांगितली?” स्वामींनी विचारलें.
“आमच्या मनाने”, कृष्णा म्हणाला.
“काढा तर फराळाचें. आपण तिघे फराळ करु यां,” स्वामी म्हणाले. स्वामींनी हातपाय धुतले. तेथे एक रुमाल पसरण्यांत आला. त्यावर शेंगादाणे ठेवण्यांत आले. स्वामीजी खाऊ लागले. ते त्या तरुणांनाहि देत होते.
“तुम्ही संकोत नका करुं. घ्या,” ते त्यांना म्हणाले.
“तुम्हीच भुकेले असाल. तुम्हीच खा. आम्ही जेवून आलों आहोंत, कृष्णा म्हाणाला.
“तुम्ही खा. आम्ही तुमच्याकडे बघत राहातों.” मुजावर म्हणाला.
“तुमचें नांव काय ?” स्वामीनीं प्रश्न विचारला.
“मुजावर.”
“आणि तुमचें?”
“कृष्णा”
“वा:! माझ्यासमोर माझा ध्येयभूत भारत मी पाहात आहे. खरेंच केवढा धन्यतेचा क्षण, केवढी पवित्र वेळ! या, मला भेटा. तुम्हा दोघांना मला हृदयाशीं धरु दे.” असें म्हणून स्वामींनी त्या दोघांना उराशी धरिलें.
तिघे दूर झाले. खाणेंपिणें केव्हांच संपलें. शेवटी स्वामीजी म्हणाले, “या तुमच्या अमळनेरांत आज मला कधीं न मिळालेला मेवा मिळाला. माझ्या आत्मारामाची कधीं न शांत झालेली भूक आज येथें थोडी फार शांत झाली. धन्य आहे हा गांव, धन्य ती संतभूमि. नवभारताचा, नवमहाराष्ट्राचा अभिनव जन्म येथे मी पाहात आहे. मला येथे अशा मिळाली, उत्साह मिळाला, नवचैतन्य मिळाले.”
“तुम्ही येथेंच राहाल?” मुजावरनें प्रश्न विचारलां.
“तुम्ही येथें राहाल तर किती सुरेख होईल!” कृष्णा म्हणाला.
“ मला कांहीच सांगता येत नाहीं. मी आज सुखावलो आहे खरा. आज मला थोडी शांत निद्रा येईल.” स्वामी म्हणाले.
“चला, आमच्याकडेच,” कृष्णा म्हणाला.
“नको. मी त्या टेंकडीवरच्या शिवालयांत जातों. तेथेंच देवाच्या पायाशी मला झोपूं दे. देवाच्या विशाल आकाशाखाली झोपू दें,” स्वामी म्हणाले.
त्या टेकडीवर येऊन स्वामीनीं घोंगडी घातली. त्या घोंगडीवर मृत्युंजय शिवशंकराच्याजवळ स्वामी झोंपी गेले. भारताच्या दिव्यभाग्यासाठी तळमंळणारा तो आत्मा येथें झोंपीं गेला.