धडपडणारी मुले 10
संन्याशाचा संसार
हृदयांत सेवा
वदनांत सेवा
उतरे न हातांत करू काय देवा.
पहाटेची वेळ होत आली. थंडगार वारा सुटला होता. स्वामीजींना रात्री गाढ झोंप लागली होती. ते आज अजून कसें बरें उठले नाहीत? प्रार्थनेची वेळ तर होत आली. अमळनेरच्या मिलचा तो पाहा भोंगा झाला. स्वामी एकदम जागे झाले. ते उठले. क्षणभर अंथरुणांत ते बसले. नंतर ते नदीवर गेले. शौचमुखमार्जन त्यांनी केलें. स्नानहि त्यांनी उरकून घेतलें.
आतां चांगलेंच उजाडलें. प्रकाश सर्वत्र पसरला. मिलमध्ये जाणा-या लोकांची रांग लागली होती. मिलच्या चिमणींतून काळ्याकुट्ट धुराचे लोट व जात होते व सर्वत्र पसरत होते. तिकडून ईश्वराचा पवित्र प्रकाश पृथ्वीवर पसरत होता. आणि इकडून मानवाच्या यंत्रांतील काळे धुराचे लोट वर जात होते. देव मानवाला वरून प्रकाश देत आहे; मानव त्याला धुराचे लोट परतभेट म्हणून पाठवीत आहे. त्य मिलमधील हजारों मजुरांची निराशेने व उपासमारीनें काळवंडलेलीं जीवनें म्हणजेच तो धुराचा लोट होय. त्या हजारों स्त्रीपुरुषांची दु:खें, त्यांचे अपमान त्यांच्या यातना, त्यांचे अविश्रांत श्रम, त्यांचे अश्रू, त्यांचे कढत सुस्कारे या सर्वांचा तो लोट बनला होता. ईश्वराच्या कानावर सारी दु:खाची कहाणी घालण्यासाठी हा लोट सारखा जात असतो. परंतु देव ऐकेल तेव्हा ऐकेल!
तो मिलचा धूर पाहून स्वामीजी अशांत झाले. प्रभातकाळची प्रसन्न वेळ होती. नवीन आशा, नवीन उत्साह हृदयांत साठविण्याची ती वेळ होती. परंतु उजाडलें नाही तों हजारों गरिबांना पिळून काढणारी ती गिरणी पाहून स्वामींचा आनंद मावळला. ‘कोण मला विरोध करणार? ती हजारों जीवांचे बळी घेणार! हजारोंना बेकार करून, त्यांचे घऱचे धंदे मारून, येथे माझ्या पायांशी त्यांना लोटांगण घालावयास मी लावणार! हजारों जीवांची अब्रू मी धुळींत मिळवीन. मी लहान मुलें पाहाणार नाही, स्त्री-पुरुष पाहाणार नाही, अशक्यसशक्त पाहाणार नाही. थंडी असो, उन्हाळा असो. दहादहा तास मी सर्वांना येथे उभे करणार ! त्यांना घाणेरड्या चाळी राहावयास देणार, पत्रे तापून आंत मुलें उकडूनं निघतील अशा झोंपड्या मी त्यांना बांधून देणार! पत्रे तापून आंत मुलें उकडून निघतील अशा झोंपड्या मी त्यांना बांधून देणार! माझी सत्ता कोण दूर करील? माझ्या मालकांच्या मोटारी कोण अडवील? माझ्या धन्यांचे राजविलासी बंगले कोण धुळींत मिळवील? अशी घोषणा ती गिरणी पहांटेपासून करीत असते. सा-या जगाला उजाडलें नाहीं तों अशी धमकी गिरणी देत असते. सायंकाळी पुन्हा तशीच धमकी देते.
स्वामीजी त्या धुराकडे पाहाता राहिले. परंतु किती वेळ पाहाणार! ते आपल्या घोंगडीवर येऊन बसले. ते कांही पदें गुणगुणत होते, कांही अभंग म्हणत होते. एक पद दुस-या पदास जन्म देई, एक अभंगाचा चरण दुस-या चरणास जन्म देई. जो चरण आवडे, तो स्वामी स्वत:शीच पुन्हा पुन्हां घोळूनघोळून म्हणत. मध्येच डोळे मिटीत व मध्येच उघडीत मध्येच टिचक्या वाजवीत, हातानें ताल धरीत.