धडपडणारी मुले 55
स्वामींच्या त्या सहानुभूतिपूर्ण शब्दांना मगन नकार कसा देणार?
“देईन हो स्वामी,” मगन म्हणाला.
“आजी! आंता आम्ही जातों. बरा होईल बरें बाळ,” स्वामी म्हणाले. त्या झोंपडीभोंवती फिनेल वगैरे टाकण्यांत आलें. सूर्याचे किरण गरिबांच्या घरांकडे येतच असतात! देवाचे उबेचे किरण येतच असतात. परंतु मानवी प्रेमाचे किरण आज तेथे आले होते.
सारा गांव स्वच्छ झाला. दुपारचे बारा वाजले. सूर्य डोक्यावर आला होता. श्रम करणा-या मुलांकडे पाहात होता.
“चला आतां आंघोळी करावयास जाऊ,” रघुनाथ म्हणाला.
“नदीमध्येंच जाऊ. नदीला पाणी आहे. पाण्यांत डुंबू पाण्यांत खेळ खेळू,” वामन म्हणाला.
“परंतु रघुनाथ, जेवावयाची व्यवस्था काय? सर्वांना भुका लागल्या असतील,” स्वामी म्हणाले.
“त्यानी चिंता नको करायला,” नामदेव म्हणाला.
“कशास चिंता करिशी उगीच
जिथे तिथें माय असे उभीच,”
स्वामीनीं गोड चरण म्हटलें.
“येथे मगनची माय उभी आहे, डाळरोटी वाट पाहात आहे,” रघुनाथ म्हणाला.
सारे मुलें नदीवर गेली. जेथें पाण्याची धार पडत होती, तेथे फारच मजा येत होती. पाण्याच्या प्रवाहाबरोबर आपोआप पुढे जात येत असे जणु देवाची शक्ति मागून लोटीत पुढें घेऊन जात आहे!
ज्यांना पोहता येत नव्हतें. त्यांना रघुनाथ मुकुंदा धरीत होते. नामदेवाला पोहता येत नव्हतें. पाण्यांत डुबुक, डुबुक करीत होता. स्वामी म्हणाले, “नामदेव, अरे अजून पाण्यांतहि तरता येत नाही, मग जगांत कसा तरशील? येथें तर एकच धार आहे, एकच प्रवाह आहे. परंतु जगांत शेंकडों विचारप्रवाह शेंकडों ठिकाणांहून खळखळ करीत येणार. त्यांत तुझी नांव कशी चालणार, कशी राहाणार?”
ज्यांना पोहता येत होतें. ते नाना खेळ करीत होते. कोणी पाण्यांत बुडून हळूच खालून येऊन कोणाला पकडी, तर कोणी पाण्यांतच एकमेकांना शोधीत. कोणी गोलांटी मारीत, कोणी एकमेकांच्या अंगावर पाणी उडवून गुदमरवून टाकीत. ती मुलें जणुं पाण्यांतील मासे बनली. सरिन्मातेच्या अंगावर ती मुलें धुडगूस घालीत होती.
“चला रे आतां. उशीर होईल. आकाशांत ढग जमा होत आहेत. आपणास पावसापूर्वी परतलें पाहिजे,” स्वामी म्हणाले.
सारीं मुलें बाहेर आलीं. कपडे वगैरे धुऊन सर्व मंडळी मगनच्या घरी आली. तेथें तयारी होतीच तुकाराम मास्तर व मगन वाढीत होते.
“पोटभर जेवा. कोणी संकोच करुं नका,” मगनची आई म्हणाली.
“आम्हांला जेवण देणारी माता जेथें तेथें भेटतेच,” स्वामी म्हणाले.
“कांदा हवा का कोणाला,” मगननें विचारलें.
“द्या या मुलांना कांदा. कांदा म्हणजे राष्ट्रीय अन्न कांदाभाकर खाऊन मराठ्यांनी स्वराज्य व स्वातंत्र्य मिळविलें. बासुंदीपुरी खाणा-यांनी शेवटी गमाविले,” तुकाराम मास्तर म्हणाले.
मुलांनी भराभर बुक्यांनी कांदे फोडले. सपाटून भुका लागल्या होत्या. मगनची आई कढत कढत रोटी पाटवीत होती.
“स्वामीजी! आमच्या गांवाला एकदां महात्माजींना आणा ना,” मगनची आई बाहेर येऊन म्हणाली.