धडपडणारी मुले 47
गोपाळराव म्हणाले, “या जगांत मनात खेळविलेल्या आशा कधी पु-या होत नाहीत.”
स्वामी म्हणाले, “एका अर्थी ते बरें. प्रत्येकाच्या आशा व मनोरथ जर ईश्वरानें पु-या करावयाच्या ठरविलें तर ते अशक्य होईल. कुत्र्यांची आशा व इच्छा पुरी करावयाचें देवानें ठरविलें तर त्याला हाडकांचा पाऊस पाडावा लागेल. दुजनांची आशा पूर्ण करावयाचें त्यानें ठरविले तर त्याला रक्ताचा पाऊस पाडावा लागेल. परमेश्वराला जे टिकवावयाचे असेल तें शेवटी तो टिकवील.”
गोपाळराव म्हणाले, “मनातील सत्कल्पना तरी यशस्वी कां न व्हाव्यात? ईश्वरानें ध्येयें तरी आमच्या मनांत कां उत्पन्न करावीत? जीं ध्येयें मूर्तिमंत करता येत नाहीत, अशी ध्येयं मनांत खेळवीत बसण्यापेक्षा ध्येयहीन पशु होणें बरें. ही मनाची ओढाताण तरी नको.”
स्वामी म्हणाले, “गोपाळराव ! अहो ओढाताण हेंच तर मानवाचें भाग्य. धडपड हेंच भाग्य. आपण धडपडणारी मुलें धडपड नको, ओढाताण नको, म्हणजे यत्न नको. मनांत येतांच सारें व्हावें असें का तुम्हांला वाटते? त्याला अर्थ नाही व किंमत नाही. मनांत येतांच जें होतें, त्याचें सारें असें का तुम्हांला वाटते? त्याला अर्थ नाहीं व किंमत नाही. मनांत येतांच जें होतें, त्याचें महत्त्व आपणास वाटत नाही. ज्याच्यासाठी जीवनें द्यावीं लागतात, त्याचें आपणास मोल वाटतें. आपले मनोरथ ताबडतोब सिद्धीस गेले पाहिजेत असे म्हणणें म्हणजे अहंकार आहे. विचार व आधार यांची पाऊलें सारखी पडत नसतात. डोळे एक मैलावरचें पाहातात, परंतु पाऊल एका हातावर पडतें. अशी पावलें टाकीतच ध्येयाची पर्वती गाठावयाची आहे. भगवान् बुद्धांस पूर्ण व्हावयास पाचशे जन्म घ्यावे लागले. आपणांस पांच हजार लागले तरी थोडेच आहेत. पुन्हा पुन्हा जन्म घेऊन मी माझे ध्येय गांठीन असा अमर आशावाद मनांत खेळविण्याचें सोडून हीं रडगाणी निराशेंची भेसून गाणीं काय गात बसलेत?”
गोपाळराव म्हणाले, “पुनर्जन्मावर ज्याची श्रद्धा नाही त्यानें काय करावे?” स्वामी म्हणाले, “आपणास पुनर्जन्म नसला तरी सृष्टी अनंत आहे व काळ अनंत आहे. आपली ध्येयें वाढविणारा कोणीतरी येईल. आपण लावलेल्या झाडांना तो पाणी घालील. दादाभाईच्या कार्याला लोकमान्यांनी पाणी घातलें. लोकमान्यांच्या कार्याला महात्माजी पाणी घालीत आहेत. आपण मर्त्य असलों तरी समाज अमर आहे. ध्येयें अमर आहेत. शेवटीं जगांत ध्येयेंच राहावयाची. त्या ध्येयांना आपल्या जीवनांतील घड्यानें पाणी घालावयाचें व घडा फोडून टाकावयाचा, मडके फोडावयाचें! गोपाळरावं! जोपर्यंत आपल्या जगण्याने कोणालातरी सुख समाधान होत आहे, तोंपर्यंत मरणाची गोष्ट कां काढावी? आपल्या बोलण्याने, आपल्या हसण्यानें, आपल्या केवळ असण्यानें जर कोणाला सुख वाटत असेल तर आपल्या जीवनाचें साफल्य झालें. या बुडबुड्यापासून अधिक अपेक्षा अहंकाराने कां धऱावी? हाच युक्तिवाद करून तुम्ही मला येथें छात्रालयांत आणिलेंत ना? आणि आता तुम्ही निराश होता?”
“गोपाळराव! तुमच्या जगण्यामुळे कोणालाच आनंद होत नसेल का?” असा हृदयभेदक प्रश्न स्वामींनीं शेवटी विचारला.
गोपाळराव म्हणाले, “नाही!”
स्वामी म्हणाले, “कोणाला नाही? तुम्ही खोटें बोलत आहात. ते पाहा तुमचे डोळे, तें तुमचें तोंडच सांगत आहे की, खोटे आहे. तुम्ही हृदयाची फसवणूक करीत आहात. अहो, तुम्ही मला आवडता. तुम्हाला पाहून मला आनंद होतो. तुम्हाला पाहून मुलांना आनंद होतो, तुमच्या पत्नी गोदूताई, त्यांना आनंद होतो. आपल्या छात्रालयांतील तो हेला, त्यालाहि तुम्हाला पाहून आनंद होतो. तो दुस-यावर शिंगे उगारतो. परंतु तु्म्हाला पाहून तो प्रेमळ होतो. तुम्हाला पाहून त्या शिरीषाच्या झाडालाहि आनंद होत असेल. कारण तेथें तुम्ही पाणी घालता गोपाळराव? जग कांही कृतघ्न नाही. एखादे वेळेस आपणास माहीतहि नसतें. परंतु कितीतरी जीवनांत आपल्यामुळें आनंद, स्फूर्ति, शांति, क्रांति ही आलेलीं असतात. आपल्याला न कळत आपणांस आशीर्वाद मिळत असतात.”