धडपडणारी मुले 52
“खेड्यांची शहरांना ओळख नाहीं व शहरांची खेड्यांना ओळख नाही. खेडी म्हणजे धडें व शहरें म्हणजे मुंडकी. धडाची मुडक्याला भेट नाही व मुंडक्यांची धडाला भेट नाही,” स्वामी म्हणाले.
“मुंडकें म्हणजे बुद्धिमान लोक-होय ना?” नामदेवानें विचारलें.
“होय या बुद्धिमान् लोकांना खेड्यांतील कष्टाळू जनतेबद्दल कोठें आहे.
प्रेम? खेड्यांतील लोक आपणास धान्य देतात, आपण त्यांना विचार नेऊन देऊ असें या बुद्धिमान् लोकांच्या मनांत कधीं येतें का?” स्वामीनीं विचारलें.
“ आपण आज जात आहोत,” मुकुंदा म्हणाला.
“परंतु पुढें मोठे झाल्यावर जाल का? या खेड्यांतून नवीन, निर्भय विचार पसरविण्यासाठी याल का? आपल्या देशांत सात लाख खेडी आहेत. सात लाख विचार पसरविणारे व विचार पसरविता पसरविता सेवा करणारे तरुन देशाला पाहिजे आहेत. आपल्या या तुमच्या खानदेशांतच जवळजवळ पंधऱाशें खेडीं आहेत. पंधऱाशे तरुण या कामाला वाहून घेणारे लागतील. प्रत्येक खेड्यांत आपला एक बिभीषण पाहिजे. ज्याप्रमाणें सरकारचा पोलीस पाटील प्रत्येक खेड्यांत आहे, त्याप्रमाणे देशाची सेवा करणारा स्वयंसेवकहि प्रत्येक खेड्याला पाहिजे,” स्वामी म्हणाले.
“पंधराशें तर दूरच राहिले, परंतु पंधऱा तरी मिळतील कीं नाही याची शंका वाटते,” रघुनाथ म्हणाला.
“तुम्हाला शंका वाटते, परंतु मला वाटत नाही. हिंदुस्थानांत का त्याग नाही? समर्थांच्या वेळेस जर शेंकडो मठ स्थापन करण्यासाठी तरुण मिळाले, तर आज का मिळू नयेत? मला अशा आहे. भारत हें काहीं मुमुर्षू राष्ट्र नाहीं. तें वर येणारें राष्ट्र आहे,” स्वामी म्हणाले.
“ती पाहा टेकडीवरची मशीद किती सुंदर आहे,” हरि म्हणाला.
“मागें तेथें आपण वनभोजनांसाठी एकदां गेलो होतों,” वामन म्हणाला.
“आपण रंगारंगाचे दगड गोळा केले होते, आणि बोरें किती आपण खाल्ली,” रघुनाथ म्हणाला.
“त्या वेळेस पुन्या आजारी पडला,” रघुनाथ म्हणाला.
“आणि स्वामींनी शौच्यानें भरलेलें त्याचें धोतर धुतले,” नामदेव म्हणाला.
“कशी एकाकी मशीद दिसते आहे? त्या टेकडीवरचें तें प्रार्थनास्थान आजूबाजूच्या जगाला देवाचें स्मरण करून देत आहे,” स्वामी म्हणाले.
“परंतु प्रार्थनास्थानें पाहून लोकांची हृदयें क्रोधानेंच भरून येतात. मंदिर पाहून मुसलमान लोक दातओठ खातात. मशीद पाहून हिंदुमनांतल्या मनांत जळफळत असतील,” रघुनाथ म्हणाला.
बोलत बोलत मंडळी मारवड गांवाला आली. गांव लागतांच सकाळचें मलमूत्रविसर्जन रस्त्याच्या दोन्हीकडेला होतें. मुलें नाक धरूं लागली.
“आता नाक धरून कसें होणार? आतां हातानें नाक न धरतां, ही घाण उचलली पाहिजे,” स्वामी म्हणाले.
“परंतु ही विष्ठा आपण कशी उचलणार?” मुकुंदाने विचारलें.