धडपडणारी मुले 104
“अरे, जात म्हणजे तरी काय? विणकराने विणकराच्या मुलीशीच लग्न करावे असे होते. कारण काय ? त्या दोघांचा आचार, विचार, उच्चार, आहार – सारे समान असणार म्हणून. ज्यांच्या आहार, ज्यांचा आचार, विचार, उच्चार समान त्यांचा एक जात होय. विणकराला विणकराचीच मुलगी जीवनयात्रेत उपयोगी पडेल. ताणा कसा करावा, फणी कशी भरावी, पांजण कशी करावी हे माहित असलेली, त्या धंद्यातील शब्द, पारिभाषिक ज्ञान माहित असलेली मुलगी विणकराला उपयोगी पडणार ! परंतु बाप शिंपी असतो व नवरा मिळतो वकील ! मुलीने घरी शिवणकाम पाहिलेले, शिवण्याचे यंत्र तिला चालविता येते, तिचा वकिलाला काय उपयोग होणार? परंतु आडनावे व गोत्रे पाहातात ! आडनावावरूंन जात ओळखतात ! रोजचे जे कर्म, त्यावरून ओळखत नाही. एका दृष्टीने वकील म्हणजे वैश्यच तो. पैशात रात्रंदिवस रमलेला. एखाद्या ज्ञानात रमलेल्या ख-या ब्राम्हणाने तेथे मुलगी का द्यावी ? मी वैश्य कमी मानतो असे नाही. मला समाजसेवेचे सारे धंदे पवित्र वाटतात. खादी वापरणारा, शाकाहार घेणारा, देशासाठी तळमळणारा एखादा हरिजन – तो माझ्या जातीचा आहे. आणि माझा सख्खा भाऊहि जर खादीची टर उडवत असेल, परदेशी परब्रम्ह मानीत असेल, तर ता माझ्या जातीच नव्हे. एका आईच्या पोटचें असून भागत नाही. एका ध्येयाच्या पोटचे असावे लागते. म्हणून तर तुकारांम महाराज म्हणत.
‘माझीये जातीचे मज भेटो कोणी’
आणि बर्नार्ड या एकदा महात्माजींना म्हणाले, ‘तुम्ही आम्ही एका जातीचे आहोत.’ म्हणूनच महात्माजी व राजगोपालाचारि यांच्या मुलामुलीत झालेला विवाह हा खरा जातीय विवाह. कारण महात्माजींशी जास्तीत जास्त जवळ असे राजाजीच आहेत. त्यांची जात आहे. विलायती वस्त्रांचा व्यापार करणारा गुजराथी व्यापारी महत्माजींच्या जातीचा कसा होईल ?
“विवाहाचा पश्न खरोखरोच गंभीर झाला आहे. काहींकाहीं जाति , काहींकाहीं शाखा इतक्या लहान आहेत की त्या जर जवळच्या सदृश अशा दुस-या जातींशी मिसळणार नाहीत तर त्या जाती व शाखा नष्च होतील . त्या त्या शाखांतील सा-यांचे जणू एक रक्त होऊन गेले आहे. सारे एकमेकांचे आप्त, सगेसोयरे. हे डबक्यातील विवाह बंद झाले पाहिजे. नाहीतर प्रजा खुरटी होत जाईल असे वाटते. त्या अगदी लहान डबक्यातच, रक्त एक झालेल्या जातीतच विवाह करणा-या लोकांकडे पाहा. दिवसेंदिवस त्यांची उंची कमी होत आहे. खुरटी प्रजा निर्माण होत आहे. ह्या गोष्टीला जर आळा न घातला तर अंगुष्ठाएवढे बालखिल्य भारतवर्षांत निर्माण होऊ लागतील !
“त्या त्या जातीतच विवाह करणे काही काल ठिक असतात. परंतु काही शतके गेली की, मिश्रविवाह करणेच योग्य असते असे मला वाटते. जमीनीतून एकच पीक आपण नेहमी घेत नाही. सारखी कापशीच घेत नाही. मध्येच एखादे वर्षी बाजरी , भुइमूग असे त्या जमीनीत पिक घेतो. आणि मग पुन्हा कापशी घेतो. आज शेकडो वर्षे त्या त्या जाति एकच पीक घेत आहेत. त्यामुळे टपोरे दाणे निपजत नाहीसे झाले आहेत अपवाद असतील ते सोडून दिले पाहजेत सर्वसामान्य जनता पाहिली पाहिजे. शरिराची मनाची, बुद्धीची निस्तेजता स्वच्छ दिसत आहे. याला इतर दारिद्रय, दास्य ही कारणे आहेतच,. परंतु हे डबक्यातील विवाह हेहि एक कारण असावे.
“सापापेक्षाही अकरमाशा अधिक क्रूर असतो अकरमाशा हा मिश्र विवाहाचे अपत्य असतो. मिश्र विवाहाने गुणधर्म वाढतात हाच त्याचा अर्थ. आपले सारे ऋषि मिश्रविवाहाची फळे आहेत. अर्जुनापेशक्षा बभ्रुवाहन अधिकच पराक्रमी ! कारण नागकन्ये पासून झाला होता ! म्हणून आपली म्हण केली ‘ऋषी पाहू नये कूळ, नदीचे पाहू नये मूळ.’ परंतु यात कमीपणा थोडाच आहे ? त्यांत नीतीचे उल्लंघन थोडेच आहे ? आपण जेथे विवाह केला, तेथे जर प्रेमाने निष्ठेने राहिलो नाही तर ती अनीति होईल. परंतु भिन्न जातीत विवाह केल्याने नीति कशी काय बिघडते ? आणि जात तरी कोठे आहे?