धडपडणारी मुले 89
अति आनंद हृदयि भरला.
प्रियकर प्रभु मम हृदयि आला
शोक पळाला, खेद गळाला.
पाप ताप दुरि झाला || अति.||
मन तनमनधन
मम इंद्रियगण
अर्पित पदकमला || अति.||
चिंता सरली
भीती नुरली
त्रास सकळ सरला ||अति.||
प्रेम रज्जुनें
प्रभुला धरणे.
जाइल मग कुठला ||अति.||
पद ऐकताना सारे समरस झाले होते. वेणूचा आवाज इतका गोड व हृदयंगम असेल असें कोणाला वाटलें नव्हतें. शिवाय त्या आवाजात हृदयाची एकताना होती. भावना मिसळलेली होती.
प्रार्थना संपली. रघुनाथ उभा राहिला. तो हलक्या आवाजात म्हणाला.
“माझ्या गांवांतील सर्व लहानथोर बंधूनो! आजचा दिवस भाग्याचा आहे. आज स्वामी येथे आले आहेत. तुम्हाला ते दोन शब्द सांगणार आहेत ते ऐका.”
स्वामी म्हणाले, “मित्रांनो ! तुम्हांला मी एकदोनच गोष्टी सांगणार आहे. तुमचा गांव मला आवडला. भिका व जानकू यांच्यासारखें जीवन सेवामय करुं पाहाणारे स्वयंसेवक येथे आहेत हें पाहून तर मला अत्यंत आनंद झाला. त्यांना नांवे ठेवू नका. घाण दूर करतो ती देव आहे. सूर्य घाण नेतो, वारा घाण नाहीशीं करतो, पाणी घाण वाहून नेतें, अग्नि घाण जाळतो, पंचमहाभूतें घाण नाहीशी करतात. आपला गांव स्वच्छ राखा. स्वच्छ घऱांत परमेश्वर येतो. स्वच्छ हृदयांत परमेश्वर येतो. गांवांत पंच असतात ना? आरोग्य, उद्योग, ऐक्य, ज्ञान व प्रेम हे पाच पंच आहेत. हे पांच पंच जेथे असतील तेथें परमेश्वर असतो. पांचामुखी परमेश्वर. ही ती पांच मुखें. तुमच्या गांवांत उद्योगमंदिर सुरू व्हावें जानकू व भिका यांची फार इच्छा आहे. मी त्यांची विणकाम शिकून येण्याची व्यवस्था करणार आहे. ते शिकून आले म्हणजे त्यांना ह्या मंदिरात जागा द्या. येथें माग लावतील. गावांत सूत कांता, उद्योग सुरु होऊ दें. तसेंच भांडण नको. प्रेम निर्माण करा. आपण भांडतो व सरकारचे मिधे होतो. एकमेकांवर फौजदा-या करतों व मग फौजदार, पोलिसांचे चांगलेच फावते असल्यामुळे भित्रेपणा येतो. मोटारवाला मोटारीत पंचवीस, पंचवीस लोक बसवतो व त्यामुळे पोलिसांचा गुलाम होतो. पोलिसांचे वाटेल ते त्याला ऐकावें लागतें. आपणांस निर्भय व्हावयाचे आहे. निर्भयता नाम मोक्ष निर्भयता है देवाचें स्वरूप आहे. राम असत्यासमोर, अन्यायासमोर ठाणमाण मांडून उभा आहे. तुम्ही सत्याचे प्रेमाचे उपासक बना. म्हणजे असत्यासमोर छातीठोकपणे उभें राहाता येईल जे असेल ते दुस-यास द्या. कोणास हिडिसफिडिस करु नये. तुच्छ लेखू नका. सारें ईश्वराचें या भावनेने वागा. तुमचा गांव खरोखरच देवपूर होवो. देवाचें घर होवो अशी मी आशा करतो,”
स्वामीने भाषण संपले, “जागा द्यायला काय हरकत?” आधी शिकून तर या म्हणावे,” जानकू आहे चंचल; त्याला एक नको’असे बोलणें चाललें होतें. शेवटीं स्वामी, नामदेव वगैरे निघाले. रघुनाथच्या घरी सर्व आले. झोंपायची वेळ झाली. तेथे अंगणात घोंगड्या टाकून सर्व मंडळी झोंपली.
पहाट झाली. रघुनाथची आई व वेणू दळीत होत्या. रघुनाथची आई गोड ओव्यां म्हणत होती. किती मंगल व गंभीर वाटत होत्या त्या ओंव्या कर्ममय प्रार्थना चालली होती. हातांत काम, ओंठांत नाम! स्वामी अंथरुणांत बसून त्या ओंव्या ऐकत होते.