धडपडणारी मुले 105
“आज मिश्रविवाहाची वेळ आहे. सर्वसामान्य जनता अधिक उत्साही व तेजस्वी व्हावयास हवी असेस तर आज मिश्रविवाहाशिवाय गत्यंतर नाही मिश्रविवाहाने ऐक्य वाढेल वैगरे कल्पना फोल आहेत. युरोपियन वाटेल तेथे लग्न लावतात. म्हणून का त्यांची भांडणे कमी होत आहेत? उत्साह, तेज बुद्धि ही वाढतील. काही शतके अशी गेली की पुन्हा जातीय विवाह सुरू करावेत. एकच पीक एका जमीनीत वर्षानुवर्षे घेऊ नये हा त्यांचा नियम होय.
“थोडक्यात सांगावयाचे झाले तर विवाह डबक्यांतील नसावेत व समुद्रातील नसावेत. प्रवाहांतील, विशाल नदीतील असावेत, एकदम एखादे अमेरिकेतील पीक भारतभूमींत येणार नाही; भारतीय बी अमेरिकेत फोफावणार नाही. परंतु गुजराथमधले महाराष्ट्रात, ओरिसाचे आंध्रांत पेरण्यास हरकत नाही. समुद्र नको, डबके नको, नदी घ्या.”
“तुमचे जेवण तसेंच राहिले,” गोविंदा म्हणाला.
“त्यांना नाहीतर भूक नव्हतीच,” रघुनाथ म्हणाला.
“आम्हीच बळे बसविले,” नामदेव म्हणाला.
“पण आता लागली आहे भूक. वाढ थोडी खिचडी,” स्वामी म्हणाले.
“या मुलांना पाहून तर तुमचे पोट भरले असेल ना?” नमदेवाने विचारले.
“आम्हाला पाहून उलट त्रास मात्र होत असेल,” नारायण म्हणाला.
“मुले पाहून खरोखरच मला आनंद होतो,” स्वामी म्हणाले.
“आता आधी जेवण होऊ दे. मग बोलू,” नारायण म्हणाला.
जेवणे झाली. स्वामी हात धुऊन येऊन बसले.
“तुम्हाला कालचे जागरण आहे,” एक मुलगा म्हणाला.
“थोडा वेळ बोलू,” स्वामी म्हणाले.
“तुमचे यंत्रांबद्दल कय मत आहे ? महात्माजी तर यंत्र नको म्हणातात,” गोविंदाने विचारले.
“महात्माजी सर्वच यंत्रांना नावे ठेवतात असे नाही. त्यांना शोध पाहिजे आहेत यंत्रे पाहिजे आहेत. महात्माजींची दृष्टी सदैव शास्त्रीय असते. ते सारे प्रयोग करीत असतात. खाण्यापिण्याच्या पदार्थाचेहि त्यांना शास्त्रज्ञांकडून पृथ्थकरण करुन घेतले. ते बुद्धिवादि आहेत. बुद्धिला पटेल तेच ते घेतात. क्लोरोफॉर्म, विजेचे दिवे, शिवण्याचे यंत्र यांना त्यांचा विरोध नाही. सुधारलेला चरखा शोधून काढण्यासाठी त्यांनी तर बक्षीस लावले होते. आपल्याकडील मोठमोठे कारखानदार कोट्यधीश आहेत परंतु शोध लावणा-यांना त्यांनी बक्षिसे ठेवली नाहीत महात्माजी त्या यंत्रांच्या विरुद्ध आहेत, ज्याचा समाजावर अनिष्ठ परिणाम होतो,” स्वामी म्हणाले.