धडपडणारी मुले 144
वेणूला घेऊन स्वामी समुद्रतीरावर गेले. समुद्राची घो घो गर्जना कानावर येत होती. लाटांचा आवाज कानावर येत होता. समोर अपार समुद्र उचंबळत होता. वेणूला पाहता येईना. वेणू पाण्यात उभी होती. लाटा तिच्या चरणांना स्पर्श करत होत्या. समुद्र वेणूचे पाय धूत होता. समुद्रकाठची हजारो माणसे, वाळूतील मुलांनी बांधलेले किल्ले, उडणारे पतंग-वेणूला काही दिसेना. स्वामींना फार वाईट वाटले. दोघेजण वाळूत बसली. अंधार पडू लागला.
“वेणू ! तुझे बाहेरचे डोळे गेले. आता आतील डोळे उघड बुद्धीचे डोळे. ज्ञानचश्रू म्हणतात त्यांना. हा बाहेरचा समुद्र तुला दिसत नाही. परंतू या बाहेरच्या समुद्रापेक्षा हृद्यात एक महान समुद्र आहे. त्याच्यांत डुंबायला शीक. बाहेरच्या सृष्टीपेक्षा अनंतपटीने मोठी सृष्टी हृद्यात आहे. तेथेंहि फुले, फुलपाखरे आहेत. वृक्षवेली आहेत. नद्या, पर्वत आहेत. तारे, वारे, चंद्र, सूर्य-सारे आहे. ते पहा. बाहेरच्या डोळ्यांनी आपण नेहमी बाहेरच पाहतो. आत आपण कधी डोकावत नाही. आतील गंभीर सृष्टी पहावयास भितो, गांगरतो. आपले खरे स्वरुप आपण कधी पाहात नाही. आपण जगाला पाहतो; परंतु स्वता:ला पाहत नाही. आपले स्वता:चे आत्मरुप रडत असते. त्याची हाक आपण ऐकत नाही. त्याची उपेक्षा करतो. बघ. आतां त्याला पोटभर बघ, त्याला नटव त्याला हसव. त्याला स्वच्छ कर. शुद्ध कर. पवित्र कर. त्या मीराबाईने म्हटले आहे ना, ‘उलट भयी मोरे नयनन की’ – माझे डोळे आता उलटे झाले आहेत. तुझे डोळे गेले नाहीत. ते उलटे झाले आहेत. बाहेरची दृष्टी देवाने आत बनवली आहे. दुसरे कोणते समाधान मी तुला देऊं ? आता हेच विवेकाचे समाधान! वेणू ! तू लहान आहेस. मी बोलत आहे हे करणे कठीण आहे. परंतू कठीण आहे म्हणूनच करण्यासारखे आहे कठीण संपादण्यात मनुष्याचा मोठेपणा आहे,” स्वामी म्हणाले.
स्वामी वेणूला घेऊन पुण्याला आले. नामदेव, रघुनाथ यांना भेटून जावे असें त्यांच्या मनात आले प्रचारकही पाहावयाचे होते. पावसाळ्याचे दिवस होते. पहाडांतील रमणीय व गंभीर शोभा वेणूला पाहता येत नव्हती. वेणू नाचली असती ! घाटांतील शोभा पाहून वेणूने
खाली उडीही मारली असती! वेणूला भोगदे, शोभा, प्रकाश सारे एकच होते. बोगदयात जरा गुदमरल्यासारखे होई. उबट हवा अंगाला लागे. बोगदा संपला की थंडगार स्वच्छ हवा अंगाला येऊन लागे. वेणू विचारी, “असा का हवेत फरक होतो. ? क्षणात गार वारा क्षणात उबट, असे का होते?” स्वामी म्हणाले, “गाडी बोगद्यातून जात आहे. बोगदा आला की हवा उबट येते. बोगदा संपला की प्रसन्न, मोकळी हवा येते” वेणूने विचारले, “डोंगर फोडून केलेला रस्ता म्हणजेच बोगदा ना ? डोंगरातील नळकांडे ? होय ना ?” स्वामी म्हणाले “होय.”
टांगा करून स्वामी वेणूसह मुलांच्या बि-हाडी आले. नामदेव व रघुनाथ रविवार असल्यामुळे घरीच होते. आगाऊ सूचना होती. स्वयंपाक तयार होता. वेणूचा हात धरून स्वामींनी तिला खोलीत आणले. बसली. एका जागेवर वेणू बसली.
“वेणू !” रघुनाथने हाक मारली.
“भाऊ ! माझे डोळे गेले. मला आता तुझे तोंड दिसत नाही कोणाचेही दिसत नाही. वेणू आंधळी झाली तुझी. कायमचे डोळे गेले, भाऊ, मला तू टाकू नको. आता तू मला. एक तू मला,” वेणू म्हणाली
“येतील तुझे डोळे येतील रघुनाथ म्हणाला.
“कोण असे म्हणते भाऊ? आई असेंच म्हणाली,” वेणूने विचारले.
“माझा नामदेव असेच म्हणाला. ‘असे अकस्मात गेलेले डोळे अकस्मात परत येतात,’ असे नामदेव म्हणाला. नामदेवाचे म्हणणे खरे होईल आईची आशा खरी ठरेल!” रघुनाथ म्हणाला.
“ते असे म्हणत असतील तर येतील. त्यांचे डोळे माठे आहेत. त्यांना दूरचे दिसत असेल. आता वेणूला तुम्हीच भाकर करून वाढा. वेणूला हात धरून चालवा. वेणूला हात धरून नाचवा. वेणू आता तुमच्या हातातील !” वेणू म्हणाली.