धडपडणारी मुले 102
“असें कां बरें व्हावे?” नामदेवानें विचारलें.
“आपलें हृदय व बुद्धि यांना थोर विचार झेंपतच नाहींसा झाला आहे,” रघुनाथ म्हणाला.
“याचे एक कारण अहंकार आहे. स्वत:ला दिव्य ध्येय स्फुरत नाहींत आणि दुस-यानें दाखविलेली घेण्यांत कमीपणा वाटतो. मग असें स्वत:च्याच खुशामतींत व पोकळपणांत मोठेपणा मिरवितात झाले,” स्वामी म्हणाले.
“आपणांस अजून घरीं जाऊन स्वयंपाक करावयाचा आहे,” रघुनाथ म्हणाला.
“ आज नाहींतर लंघनच करूं,” स्वामी म्हणाले.
“ परंतु स्वयंपाक करावयास वेळ नाहीं लागणार,” नामदेव म्हणाला.
“आज रात्रींच्याच गाडीने मी जाईन. दौंडाकडून किंवा कल्याणकडून कोठूनहि जात येतें. अगदी शेवटच्या बाराच्या गाडीनें गेलें तरी चालेल,” स्वामी म्हणाले.
“ आलेच आहांत तर राहाना एक दोन दिवस,” नामदेवानें सांगितले.
“कोठें तरी मुलांत रहायचे तर येथेंच राहिलें,” रघुनाथ म्हणाला.
“येथे राहून काय करू?” स्वामीनीं विचारलें.
“कांही करूं नका. आमच्या खोलींत पडून राहा. विश्रांति घ्या. मी खरेंच सांगू का, तुम्ही थकल्यासारखे दिसता,” नामदेव म्हणाला.
“अतिसनेह: पापशंडकी,” स्वामी हंसून म्हणाले.
“येथें तुम्ही वाचा, लिहा. आमचे कांही मित्र येतील, त्यांच्याजवळ चर्चा करा. विचारांचा प्रसार हें कामच आहे,” नामदेव म्हणाला.
“आधीं खोलीवर चला. जेवण वगैरे झाल्यावर पाहू,” स्वामी म्हणाले.
बोलत, बघत ते घऱीं आहे. खोलीत आलें.
“आपण आधींच प्रार्थना करुन घेऊ या,” स्वामी म्हणाले.
“हो, म्हणजे बरें,” रघुनाथ म्हणाला.
प्रार्थना झाली व तेलचूल पेटविण्यांत आली. खिचडी करावयाची असें ठऱलें. स्वामी घोंगडीवर पडले होते. पडल्या पडल्या त्यांचा डोळा लागला. किती पटकन् त्यांना झोंप आली!
ते पाहा चार पांच मित्र येत आहेत. हळूहलू येत आहेत.
नामदेव खोलीच्या बाहेर व्हरांड्यांत फे-या घालीत होता.