धडपडणारी मुले 155
कामाची विभागणी सुरू झाली. मोठ्या मुलांची टोळी गांवांतील इतर स्वयंसेवकाबरोबर दगड गोळा करावयास पहाटे जावयाची असे ठरले. गोळा केलेले दगड गाड्यात भरून आणण्यासाठी दुसरी टोळी. हे दगड फोडण्यासाठी व रस्त्यांत पसरण्यासाठी बाकींची सारी मुले. एक महत्त्वाचे काम होते. ते म्हणजे रसोड्याचे. ते काम स्वामींनी नामदेवावर सोपवले. अमळनेरचा माधव वाणी व शंकर हे दोन स्वयंसेवक नामदेवाच्या बरोबर होते. त्या तिघांचे रसोयी व्यवस्था मंडळ होते. गावांतील बाया स्वयंपाक करून देण्यास उभ्या राहिल्या. या तिघांनी त्यांना सारे सामान पुरवावयाचे, सारी जबाबदारी पार पाडावयाची!
गावांतील श्रीमंत गरीब सारे कामावर घसरले. पोराबाळांना तर खूप उत्साह आला. चैतन्याने चैतन्याची वाढ होते. दिव्याने दिवा पेटतो. मढी मढ्यांना जीवंत करू शकत नाहीत. घरोघरच्या गाड्या निघाल्या. अमळनेरहून शंभर आले; परंतु शंभराचे पाचशे झाले. एकाने पुढे होण्याचा अवकाश असतो! एक राम निघाला की अठरापद्ये वानर त्याच्याबरोबर मरावयास उभे राहतात! त्यागमय व प्रेममय सेवेत विलक्षण आकर्षण असते यात शंका नाही.
सकाळी प्रार्थना होई. प्रार्थनेनंतर गूळ घातलेली कांजी सर्वांस देण्यांत येई. कांजी घेतल्याबरोबर सारे कामास निघत. अकरा वाजतेपर्यत काम असे. मध्यंतरी विश्रांति. दोन वाजता कामास पुन्हां सुरवात होई ती सायंकाळी ५।। वाजेपर्यंत. ५।। वाजता सर्व सेवादल गाणी म्हणत परत येई. मग नदीमध्ये सारे डुंबत. श्रमपरिहार होई. आकांशात तारे लुकलुकू लागले की पतंग बसे. आकाशाच्या खाली जेवण होई. जेवण झाल्यावर प्रार्थना! प्रार्थनेनंतर कोणी नकला करीत. कोणी गोष्ट सांगे. प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील स्मरणीय गोष्टी सांगाव्या असे एकदा ठरले. त्या गोष्टी कधी खुप हंसवीत तर कधी रडवीत. पोवाडे होतेच. प्रचारकांना पोवाडे उत्कृष्ट म्हणता येत असत. एक दिवस स्वामींनी कीर्तन केले. आंधळी वेणू पाठीमागे उभी राहिली होती! अशा प्रकारे आनंदात दिवस जात होते.
उन्हांतून मुले काम करणार! कोणी आजारी पडावयाचा एखादा! अमळनेरचे एक तरुण उत्साही डॉक्टर सकाळी येत. सारे ठीक आहे असे पाहून जात. त्या मुलांपैकी कोणी आजारी पडले नाही. प्रेमळ परमेश्वर त्यांना का आजारी पाडील? देवाची सेवा करावयास आलेली ती लेकरे? ती सारी सुखी होती, मस्त होती!
वेणू रस्त्याच्या बाजूला उभी म्हणे. गोड गोड गाणी. काम करणा-यांना तिची गाणी स्फूर्ति देत. एखादे वेळेस वेणूला राहवत नसे. ती सुद्ध खडी फोडायला लागे!
“वेणू तुला दिसत नाही. हातावर घाव पडेल,” रघुनाथ म्हणाला.
“भाऊ! तुमचे सर्वांचे खडखड आवाज ऐकले, ठकठक आवाज ऐकले की आपणहि जावे असे मला वाटते. ते आवाज मला बोलावतात. ‘चल, वेणू चल,’ असे मला कोणी तरी म्हणते,” वेणू म्हणाली.
ऐके दिवशी एक विशेष गोष्ट घडली. वेणू रोज दुपारी रामंदिरांत जात असे. हातांत काठी घेऊन वेणू आतां नेमकी जात असे. दुपारच्या वेळी सारे श्रमजीवी लोक जेवावयास बसले होते. स्वामीजी, शंकर, माधव सारे वाढीत होते. स्वामी आधी बसत नसत. रघुनाथ, नामदेव, स्वामी, शंकर, माधव, भिका, जानकू, ते चार प्रचारक असे हे एंकदर अरपा रुद्र सर्वाचे आटोपल्यावर बसत असत.
त्या दिवशी नामदेवाचा हात जरा भाजला होता. चांगलाच फोड आला होता. त्याला भांडे धरता येत नव्हते. वाढता येत नव्हते.
“नामदेव! राममंदिरात जाऊन पड जा तू. दमतोस हो तू. माझ्यासाठी तुम्हांला त्रास,” स्वामी म्हणाले.
“त्रास कसला? तुमचा आनंद तो आमचा आनंद. आयुष्यातील हेच दिवस आम्ही खरोखर जगलो. बाकीचे दिवस फुकट गेले,” नामदेव म्हणाला.