धडपडणारी मुले 125
रात्र झाली. खूपच गर्दी लोटली. शेवटी तिकिट बंद करणे भाग पडले. नाटकगृह चिक्कार भरून गेले होते. गावातील सारी प्रतिष्ठित व रसिक मंडळी दिसत होती. खेळास आरंभ झाला. सर्वत्र शांतता पसरली.
संवादांत अनेक भावनोत्कट प्रसंग होते. पाण्यावाचून हरिजन मुलगा तडफडत आहे व त्याच्या बापाला विहिरीवर पाणी मिळत नाही. तो गटारांतील गंगा ओंजळीने भरून घेऊन येतो व मुलाला पाजतो!
“पाण्यावाचून माझे पोर मरावे ना रे देवा? माझ्या डोळ्यांतसुद्धा पुरेसे पाणी नाही रे बाळ, नाहीतर ते तुला पाजले असते! माझ्या जीवाचे पाणी पाणी होते, परंतु ते बाळाला कोठे पाजता येते? बाळ!’
हे शब्द प्रेक्षकांच्या डोळ्यांतून पाणी आणतात! हरिजनसंवाद रडविणारा होता. ‘शाळेतील शिक्षण’ हा संवाद हंसविणारा होता. प्रेक्षक शाळेतील शिक्षकांकडे बघत व टाळ्या वाजवीत! अर्थात् शिक्षकांना लागेल असे त्यांत काही नव्हते. तो सारा निरागस विनोद होता. ‘सावकारी पाश’ संवाद सुरू झाल्यावर शिक्षक सावकार व वकील यांच्याकडे पाहून टाळ्या वाजवीत!
आपण सारेच समाजाला कसे खाली नेत आहोत हे दिसून येत होते.
स्वामींनी शेवटच्या प्रवेशाच्या आधी सर्वांचे आभार मानले व तीनशे रुपयांहून जास्त उत्पन्न झाल्याचे सांगितले. त्या वेळेस प्रचंड जयघोष झाला. दुस-या दिवशी पुन्हा एक जादा कार्यक्रम करण्याचे जाहीर करण्यांत आले.
एका अमळनेरातच पाचशे रुपये जमा झाले. कोणी मुलांना बक्षिसे दिली. स्वामींना व मुलांना खूप उत्साह आला. खानदेशभर ते गेले व त्यांच्या मेळ्याची कीर्ति सर्वत्र पसरली. ब-हाणपुराहून बोलावणे आले. पुण्यासहि जावे अशी काहींनी सूचना केली. परंतु ‘पुण्यांत खानदेशचे विद्यार्थी असतील तेव्हा जावे, म्हणजे ते तिकिचे खपवितील,’ असे स्वामींचे म्हणणे पडले. गोपाळराव म्हणाले, “तेव्हा मेळ्यांतील मुलांची शाळा बुडेल. आताच जा. वर्तमानपत्रांतून प्रसिद्धी करावी म्हणजे झाले.”
खानदेशचा मेळा पुण्यांतहि आला. पुणेकर प्रसिद्ध म्हणून नावाजलेले. परंतु खानदेशच्या मुलांनी पुण्याचे हृदय जिंकले. तो सहजसुंदर अभिनय पाहून त्यांना कौतुक वाटले. अभिनयांत आदळआपट, ओढाताण काही नव्हते. मोळ्याला पुण्यांतील रसिकांनी पदके दिली. मेळ्याचा जाहीर सन्मान करण्यांत आला.
स्वामींनी जवळजवळ खर्चवेच वजा जाता दोनअडीच हजार रुपये जमविले. दरवर्षी हा कार्यक्रम करावा असे त्यांनी मनात योजिले. मुलांची त्यांनी अत्यंत काळजी घेतली. ते दिवसा त्यांना वाचून दाखवीत, त्यांचे ज्ञान वाढवीत. निरनिराळ्या ठिकाणी ऐतिहासिक स्थाने वगैरेहि त्यांनी मुलांना दाखविली. मुले आनंदली. अपेक्षेबाहेर प्रयत्नाला यश आलेले पाहून सर्वांना धन्यता वाटली.