श्लोक १२ वा
विश्वामित्रोऽसितः कण्वो दुर्वासा भृगुरंगिराः ।
कश्यपो वामदेवोऽत्रिर्वसिष्ठो नारदादयः ॥१२॥
जे तपस्तेजें देदीप्यमान । जे पूर्णज्ञानें ज्ञानघन ।
ज्यातें सदा वंदी श्रीकृष्ण । ते ऋषीश्वर जाण निघाले ॥२१॥
जे गायत्रीमंत्रासाठीं । करुं शके प्रतिसृष्टी ।
जो विश्वामित्र महाहटी । तोही उठाउठीं निघाला ॥२२॥
जेथ न बाधी उष्णशीत । ते आश्रमीं वसे असित ।
ज्याचेनि नामें द्वंद्वें पळत । तोही त्वरित निघाला ॥२३॥
जो सूर्यासि रिघोनि शरण । अश्वाचे कर्णी बैसोन आपण ।
पूर्ण केलें वेदपठण । तो कण्वही जाण निघाला ॥२४॥
जो दुर्वास अत्याहारी । आहार सेवूनि निराहारी ।
तोही द्वारकेबाहेरी । त्वरेंकरुनि निघाला ॥२५॥
भृगूचा श्रीचरण । हृदयीं वाहे नारायण ।
मिरवी श्रीवत्स भूषण । तो भृगुही जाण निघाला ॥२६॥
अंगिरा स्वयें सद्बुद्धि सृष्टीं । बृहस्पति जन्मला ज्याचे पोटीं ।
जो परमगुरु देवांच्या मुकुटीं । तोही उठी गमनार्थ ॥२७॥
कश्यपाची नवलगोठी । सुर नर किन्नर जन्मले पोटीं ।
यालागीं हे काश्यपी सृष्टी । तोही कश्यपु उठी निजगमनीं ॥२८॥
मुक्तांमाजीं श्रेष्ठ भावो । वेदीं वाखाणिला वामदेवो ।
तोही द्वारकेहूनि पहा हो । स्वयमेवो निघाला ॥२९॥
अत्रीची नवल परी । तीनी देव जन्मले उदरीं ।
श्रीदत्त वंदिजे योगेश्वरीं । हे अगाध थोरी अनसूयेची ॥३३०॥
तो स्वयें अत्रि ऋषीश्वर । श्रीकृष्णआज्ञातत्पर ।
पिंडारका अतिसत्वर । प्रयाण शीघ्र तेणें केलें ॥३१॥
जो श्रीरामाचा सद्गुरु । ब्रह्मज्ञानें अतिउदारु ।
ज्याचे शाटीचा प्रताप थोरु । जिंकिला दिनकरु तपस्तेजें ॥३२॥
ऐसा जो वसिष्ठ महामुनी । तोही कृष्णसंज्ञा मानुनी ।
निघाला द्वारकेहुनी । शीघ्र गमनीं पिंडारका ॥३३॥
आणि देवर्षि नारदु । त्याचाही अगाध बोधु ।
ज्यासि सर्वदा परमानंदु । अति आल्हादु हरिकीर्तनीं ॥३४॥
ब्रह्मवीणा स्वयें वातु । ब्रह्मपदें गीत गातु ।
ब्रह्मानंदें नाचतु । निघे डुल्लतु पिंडारका ॥३५॥
इत्यादि हे मुनिवरु । श्रेष्ठ श्रेष्ठ ऋषीश्वरु ।
शिष्यसमुदायें सहपरिवारु । मीनले अपारु पिंडारकीं ॥३६॥
एवं पिंडारकीं ऋषि सर्व । शापानुग्रही महानुभाव ।
मीनले कृष्णवैभव । अतिअपूर्व वर्णिती ॥३७॥;
बाप लाघवी वनमाळी । कुलक्षयो घडावया तत्काळीं ।
कुमरीं ऋषीश्वरांसि रांडोळी । कपटमेळीं मांडिली ॥३८॥
निंदा अवज्ञा हेळण । करितां ब्राह्मणांसि छळण ।
जेथ ब्रह्मद्वेष वाढे पूर्ण । कुळक्षयो जाण ते ठायीं ॥३९॥
ब्राह्मणांच्या कोपापुढें । कुळ कायसें बापुडें ।
महादेवाचें लिंग झडे । इंद्रपदवी पडे समुद्रीं ॥३४०॥
तो समुद्रही केला क्षार । ऐसा द्विजकोप अतिदुर्धर ।
हें एकएकाचें चरित्र । ते ऋषि समग्र मीनले तेथें ॥४१॥
धरातळीं ब्रह्म ब्राह्मण । त्यांचें वचन परम प्रमाण ।
हें सत्य करावया श्रीकृष्ण । कुळनिर्दळण स्वयें दावी ॥४२॥;