गरुड आणि मनुष्य
एकदा एका पारध्याने जाळ्यात एक गरुडपक्षी पकडला व त्याचे पंख कापून त्याला एका खांबास बांधून ठेवले. शेजारीच दुसरा एक शिकारी मनुष्य रहात असे, त्यास ते पक्ष्याचे हाल पाहावेनात. त्याने तो पक्षी विकत घेतला व त्याचे चांगले पालनपोषण करून त्याला पंख फुटल्यावर सोडून दिले. गरुडाला फार आनंद झाला. त्याने एक उंच भरारी मारून रानातून एक ससा पकडून आणला व कृतज्ञता म्हणून त्या माणसास दिला.
हा सर्व प्रकार एक कोल्हा पहात होता. तो म्हणाला, 'मित्रा, मी जर तुझ्याजागी असतो तर हा ससा मी त्या पारध्याला दिला असता कारण त्यामुळे नंतर त्याच्यापासून काही उपद्रव झाला नसता. हा मनुष्य काही तुला त्रास देणार नाही. तेव्हा त्याला खूष ठेवण्याचं काही कारण नाही.
यावर गरुड म्हणाला, 'मित्रा, हे चूक आहे. ज्याने आपल्याला मदत केली त्याला कृतज्ञता दाखवावी व जे त्रास देतात त्यांच्यापासून सावधगिरीनं वागावं.'