"कविता संग्रह" (प्रेम)
(1) प्रेमाचा निसर्ग
प्रेम असावे झाडासारख्रे
दिवसेंदिवस वाढत जाण्यासाठी
एकमेकांना सुखाची सावली देण्यासाठी
प्रेम असावे पहाडासारखे
अढळ अचल राहाण्यासाठी
एकमेकांना भक्कम आधार देण्यासाठी
प्रेम असावे फुलासारखे
नाजूक हळूवार फुलण्यासाठी
एकमेकांना जीवापाड जपण्यासाठी
प्रेम असावे नदीसारखे
बेधुंद प्रणयात वाहून जाण्यासाठी
एकमेकांना उत्कट प्रेमसागराकडे नेण्यासाठी
प्रेम असावे हवेसारखे
न सांगता अनुभवण्यासाठी
एकमेकांना प्रेमसुगंध देण्यासाठी
प्रेम असावे आकाशासारखे
जीवनातील पोकळी भरुन काढण्यासाठी
एकमेकांवर अनंत प्रेम करण्यासाठी
अन या आकाशाच्या आभासात...
हवेच्या हव्याश्या स्पर्शासोबत...
नदीच्या नवख्या प्रवाहासोबत...
फुलाच्या फुललेल्या आनंदासोबत...
पहाडाच्या पक्क्या आधारासोबत...
झाडाच्या झुलणार्या झोक्यात...
प्रणयाचे झोके घेत राहावे...
प्रेम गाणे गात राहावे...
प्रेम धुंद होतच राहावे...
निसर्गाच्या सानिध्यात, "प्रेम निसर्ग" अबाधीत राहावा
"नैसर्गिक प्रेम" बहरत जावून, "प्रेमाचा निसर्ग " अनुभवत राहावा
अनुभवत राहावा...
(२) प्रणयाचा प्याला
पावसाच्या पेटलेल्या पाण्यात...
वार्याच्या वेगवान वाटेवर...
बेटावरल्या बहरलेल्या बागेत...
आकाशाच्या अमर्याद आभासात...
सागराच्या संथ सुरावटीत...
सूर्यकिरणांतील सुप्त सप्तरंगांच्या साक्षीने...
इंद्रधनुष्याचा इरसाल इब्लीस इशारा...
"प्रियेसोबत प्यावा प्रणयाचा प्याला..!!"
"प्रियेसोबत प्यावा प्रणयाचा प्याला...!!!"
(३) पुन्हा पावसाची पाळी
असह्य झाल्या होत्या उन्हाच्या झळी
सरली रात्र काळी काळी
त्या रम्य सकाळी
दाटूनी आली मेघ काळी काळी
सुगंध पसरवी माती काळी काळी
जलधारा घेवूनी भाग्य बळीराजाच्या कपाळी
आली पावसाची पाळी, पुन्हा पावसाची पाळी
खुलली बगेतली एकेक कळी
मरगळलेल्या मनी आली प्रसन्नतेची झळाळी
आली पावसाची पाळी, पुन्हा पावसाची पाळी
(४) प्रेमधुंदी
नाही कुणी आस पास
लागला प्रेमाचा ध्यास
मिसळला श्वासात श्वास
लागली मिलनाची आस
हे खरं आहे की आभास
एकेक क्षण बनावा एकेक तास
असे वाटे दोघांच्या एकच मनास
वाटतोय वेगळाच उल्हास
रात्र आजची आहेच तशी खास
मधूर चंद्राच्या सोबतीलाआहे चांदण्यांची आरास...
मधूर चंद्राच्या सोबतीलाआहे चांदण्यांची आरास...
(५) प्रेमात तुझ्या संपलो मी
प्रेमात तुझ्या गुंतलो मी
माझाच नाही उरलो मी
प्रेमाच्या खेळात जिंकलो मी
हृदयात तुझ्या व्यापून उरलो मी.....
भेटलीस तेव्हा हरखलो मी
हसलीस तेव्हा हर्षलो मी
रुसलीस तेव्हा हुरहुरलो मी
निघालीस तेव्हा हिरमुसलो मी.....
तू दूर होतीस तेव्हा
तुझ्या हृदयात दिसलो मी
परत कधी आलीच नाहीस तेव्हा
माझ्याच अश्रूंमध्ये विरघळून संपलो मी
प्रेमात तुझ्या संपलो मी
प्रेमात तुझ्या संपलो मी