लेख: चर्चा नको? वाद हवा??
ज्यांना समस्येवर तोडगा नको असतो आणि समस्या तशीच कायम ठेवायची असते ते चर्चेला किंवा संवादाला नेहेमी नाही म्हणतात. त्यांना वाद किंवा विवाद हवा असतो पण संवाद नको असतो आणि टोकाची भूमिका घेऊन आपणच बरोबर आहे हेच सिद्ध करायचे असते. कारण संवादाने किंवा चर्चेने समस्येचे निराकरण झाले तर मग सतत समस्येचे रडगाणे गाऊन इतरांना दोष द्यायला काही कारण उरत नाही. काहीजण चर्चेला किंवा संवादाला यासाठी नाही म्हणतात की त्यांना स्वतःच्या विचारसरणी पेक्षा वेगळी विचारसरणी ऎकायची किंवा स्वीकारायची नसते. मग असे लोक फक्त आपल्या विचारसरणी सारखे असणारे इतर लोक शोधून त्यांचेशी मैत्री करतात आणि त्यांना वाटते की हे सगळे जग फक्त आपल्याच विचारधारेनुसार चालले आहे. खरे तर कुणाचीच विचारधारा परिपूर्ण आणि पूर्ण सत्य नसते. वेगळ्या विचारधारा वेळोवेळी स्वीकारल्या तर जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळत राहते. कदाचित आपल्यापेक्षा वेगळ्या विचारधारेत आपल्या समस्यांचे उत्तर सुद्धा दडलेले असू शकते. पण वेगळी विचारधारा स्वीकारण्यात आडवा येतो तो अहंकार. कारण आपली विचारधारा चुकते आहे असे अहंकार आपल्याला स्वीकारू देत नाही. अहंकार कशाचाही असू शकतो: वयाचा, अनुभवाचा, ज्ञानाचा, शिक्षणाचा, राजघराण्याचा, यशाचा, पैशांचा, चांगुलपणाचा, सौंदर्याचा!