लेख: कौटुंबिक राजकारणात बैलाचा बळी!
हे जग विरोधाभासाने, दांभिकतेने आणि दुटप्पीपणाने भरलेले आहे. हे जग फक्त बळीचा बकरा शोधत राहते. दोष देण्यासाठी! विशेषतः भारतीय सामाजिक आणि कौटुंबिक जीवन हे दुटप्पीपणाचे मोठे आगार आहे.
जो मुलगा लग्नाआधी आई वडिलांच्या शब्दाबाहेर नसतो आणि ज्याला स्वतंत्र विचार करण्याची सवय न लावता फक्त आई वडील सांगतील तेच ऐकायची सवय लावली जाते, त्याने लग्नानंतर बायकोच्या योग्य गोष्टी ऐकल्या तर त्याला बायकोचा बैल म्हटले जाते. मग तो आधी आई वडिलांचे ऐकत होता तेव्हा तो "बैल" का नसतो? लग्नानंतरच अचानक त्याचे बैलात रूपांतर कसे होते? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
मुळात एखाद्याने कुणाचेही वैचारिक परावलंबित्व किंवा गुलामगिरी पत्करली तर तो निर्णयासाठी कुणावर तरी अवलंबून राहणारच आहे! त्यापेक्षा स्वतंत्र विचारशक्ती असणे केव्हाही चांगले!
पण स्वतंत्र विचारसरणीवाला मुलगा सुद्धा दांभिक विचारांचा बळी होण्यापासून सुटू शकलेला नाही. जर एखाद्या मुलाने एखादी गोष्ट आई वडिलांना न पटणारी केली तर हे दांभिक जग त्यात त्याच्या बायकोला बळीचा बकरा बनवते. याने नक्की बायकोचे ऐकून असे केले असे म्हटले जाते, भले त्याने त्या वेळेस बायकोचे ऐकले नसेल तरीही!
पण मुलाने जर आई वडिलांना योग्य वाटेल असा निर्णय घेतला तर त्या बाबत मात्र बायकोला जबाबदार धरत नाहीत. तेव्हा त्याने हा निर्णय स्वतः घेतला असे मानले जाते, मग त्याने त्या वेळेस बायकोचा सल्ला ऐकला असला तरी.
सुनेच्या ज्या गोष्टी पटत नाहीत त्याच लेकीने तीच्या सासरी केल्या तर चालतात.
मुलगा सुनेची बाजू घेतो ते चालत नाही पण जावयाने लेकीची बाजू घेतली पाहिजे असे वाटते.
एकीकडे मुलगा मुलगी समान असे म्हटले जाते, तर दुसरीकडे कर्तव्य पार पाडण्याच्या वेळेस फक्त मुलगाच आठवतो. हक्क मागायला मात्र प्रथम मुलगी हजर असते कारण आज स्त्री पुरुष समानतेचा जमाना आहे!!
"मुलगा सुनेचे ऐकतो, आमचे ऐकत नाही" असे मान्य करून आई वडील एक प्रकारे आपल्या मुलाला स्वत:ची विचार शक्ती नाही असे अप्रत्यक्षरीत्या मान्य करून स्वत: मुलावर केलेल्या संस्कारांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत असतात, नाही का?? विचार करा!!
आहे ना विरोधाभास?
तुम्ही या लिस्ट मध्ये आणखी भर घालू शकता, तुम्हाला आलेल्या अनुभवानुसार!