लेख: भाकरीचा चंद्र
भारतीय चांद्रयान चंद्रावर उतरले. आनंदाची गोष्ट आहे. तेथील माहिती वगैरे आपल्याला मिळेल. यापूर्वी इतरांनी आधीच मिळवलेली माहिती आपण पुन्हा नव्याने आपल्यासाठी मिळवणार. भारताची चांद्रमोहिम फत्ते झाली. याचा प्रत्येकाला अभिमान आहेच व असायलाच हवा. पण, आज सगळे जग आणि भारतसुद्धा ज्या अर्थिक मंदीच्या दुष्टचक्रातून जात आहे, ते पाहाता, चांद्रमोहिम आणि त्यासाठी होणारा खर्च हे इतके आवश्यक होते का, असे आमच्यासारख्या सामान्य माणसाला वाटल्यावाचून राहात नाही. येथे विज्ञानवादी असणं किंवा नसणं याचा संबंध नाही. सगळीकडे बेरोजगारी, दहशतवाद, पाणी टंचाई, लोड शेडिंग, उपासमारी, मंदिमुळे नोकरकपात, सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेलेली महागाई असे सगळे प्रश्न असतांना चंद्रावर यान पाठवणे, आणखी पुढे एक यान पाठवण्याची तयारी करणे आणि सुर्यावर जाण्याची तयारी करणे हा मला विरोधाभास वाटतो. अर्थमंत्री होवून गेलेले सध्याचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी भारताला अर्थिक मंदीतून बाहेर काढण्यासाठी काहितरी करायला हवे. आधीच बेरोजगारी त्यात भरीसभर नोकरकपात होत असल्याने पुढचा काळ भयंकर कठीण आहे, असे म्हणायला हरकत नाही. मग आपण सूर्यावर, मंगळावर, शुक्रावर यान पाठवले तरीही सामान्य माणसांच्या भाकरी मिळवण्याच्या आणि इतर समस्या त्याच राहातील. भुगोलाच्या पुस्तकात भारताच्या चांद्रमोहिमेचे नवीन प्रकरण टाकले जाईल आणि सामान्य माणूस भाकरीचा चंद्र जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत उपाशीच राहाणार.