साल १९७०. पाक्षिक कार्यालय.
“तुझी कथा एकदम भंगार आहे. तू दहा वेळा बदल केलास तरी त्यात जीव येत नाही!” संतापलेले संपादक माधव अनुबंधला म्हणाले.
त्याच्या डोळ्यातून मागच्या वेळेपेक्षाही जास्त दु:खाने जडावलेला अश्रू तरळला.
“पुन्हा येऊ नकोस. तू लेखन बंदच केलेले बरे!”
त्यांनी कथा न फाडता कचरापेटीत भिरकावली.
“माझे ऐका. ही कथा वाचकांना नक्की आवडेल!” अनुबंध रडत म्हणाला.
“मी दहा वेळा तुला येऊ दिले. दुसऱ्या कुणी तुला तिसऱ्या वेळाच हाकलून लावले असते. निघा आता!”
भोळ्या अनुबंधने लेखनविचार सोडला. कायमचा!
एका वर्षानंतर चणे खातांना कागदावर त्याने प्रथम पुरस्कार विजेती कथा वाचली -
त्याचीच कथा, संकल्पना! पात्र, स्थळ बदल! लेखक माधव. चणे घशाखाली जाईनात!