डोंबिवली साहित्य संमेलनाच्या निमित्ताने
डोंबिवलीत नुकत्याच झालेल्या साहित्य संमेलनातील पुस्तक प्रदर्शनात अपेक्षेएवढी विक्री झाली नाही ही बातमी वाचून वाईट वाटले. पण माझ्या मते मराठी वाचनाची आवड कमी झाली नसावी कारण मी जेव्हाही पुण्याच्या अप्पा बळवंत चौकातील एखाद्या पुस्तकांच्या दुकानात जातो तेव्हा तेथे नेहमी साहित्य रसिक वाचकांची गर्दी दिसते. तेच चित्र क्रॉसवर्ड सारख्या दुकानातही मराठी दालनात दिसते. जेव्हा पैशांची तरतूद असेल किंवा जेव्हा एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल वाचनाची मनाला भूक लागली असेल तेव्हा खरा साहित्य रसिक तडक उठून दुकानात जातो आणि किमतीची पर्वा न करता पुस्तक खरेदी करतो आणि वाचतो. किमती परवडत नसतील तर लायब्ररीत जाऊन तो आपली भूक भागवतो. खरा मराठी साहित्य रसिक पूर्वी होता, आजही आहेच आणि उद्याही असणार! आणि मराठी साहित्य वाचकांची संख्याही कधी कमी होणार नाही. वाचनाची आवड कमी झाल्यासारखे वाटण्याची कदाचित इतर काही कारणे असू शकतात.
महाराष्ट्रातील काही टक्के नवीन पिढी कदाचित मराठी वाचनाकडे वळत नसावी. त्यासाठी जुन्या प्रतिष्ठित साहित्यिकांनी आणि प्रकाशकांनी आता मराठीत नवनवे विषय घेऊन लेखनाचे वेगवेगळे प्रयोग करून लिहू पाहणाऱ्या नव्या दमाच्या लेखकांना संधी देऊन त्यांना मनापासून मार्गदर्शन करायला हवे जेणेकरून नव्या पिढीच्या अपेक्षेनुसार साहित्य निर्मिती होईल आणि वाचकवर्ग नक्की वाढेल. साहित्य कशाला म्हणावे याची व्याख्या काळानुसार बदलावी आणि जास्तीत जास्त वेगेवेगळ्या प्रकारच्या लेखनाला साहित्य म्हणून दर्जा द्यावा. ती आज काळाची गरज आहे. पुस्तकांसोबतच नियमित प्रकाशित होणारी अनेक साप्ताहिके, मासिके मराठीत आहेत आणि जगावेगळी दिवाळी अंकांची परंपरासुद्धा मराठीत आहे हे विसरून चालणार नाही. तसेच इतर प्रादेशिक भाषांमधील साहित्य आणि पुस्तक प्रदर्शन विक्री यांची काय स्थिती आहे हेसुद्धा एकदा तपासून पहिले पाहिजे.
तसेच आजच्या धकाधकीच्या जीवनात पुस्तके वाचनाची पद्धत बदलली आहे. छापील पुस्तके प्रत्येक ठिकाणी सोबत घेऊन जाण्यापेक्षा मोबाईलवर ईबुक्स वाचणे कित्येकांना सोयीस्कर वाटते. म्हणजे घरचे पुस्तकांचे कपाटच आपल्यासोबत मोबाईलमध्ये घेऊन फिरू शकतो आणि एखाद्या वाचकासाठी यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट कोणती असेल? कदाचित याचमुळे छापील पुस्तकांकडे वाचकांची गर्दी कमी झाली. पण ती गर्दी ऑनलाइन बुकस्टोरकडे वळली आहे, हे नक्की. लोकांची वाचनाची आणि ज्ञानाची भूक कधीही कमी होणार नाही. आज अनेक मराठी संकेतस्थळे विविध विषयांवरील अतिशय दर्जेदार मराठी ईबुक्स ऑनलाइन फ्री डाऊनलोड करून देत आहेत, कारण कदाचित नव्या लेखकांना प्रतिष्ठीत साहित्यिक आणि प्रकाशकांवर विश्वास राहिला नाही, आणि म्हणून ते आपली पुस्तके लाखो वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी फुकट वाटतात असे समजायचे का? आणि ही पुस्तके फ्री असली तरी दर्जेदार आहेत, हे नमूद करायला हवे.
तेव्हा छापील आणि ईबुक्स साहित्यिक, प्रकाशक यांनी एकत्र येऊन मराठी वाचन संस्कृती वाढवून पुढे नेण्याची गरज आहे.