कौरवें पांचाळी सभेमाजी ने...
कौरवें पांचाळी सभेमाजी नेली । दुर्जनीं हरिलीं वस्त्रें तिचीं ॥१॥
तये वेळीं तुझा तिनें केला धांवा । धांव देवरावा द्वारकेच्या ॥२॥
ऐकुनी करुणा-उत्तर श्रवणीं । धांवसी चरणीं न सांवरे ॥३॥
पीतांबर छाया केश करीं वारी । घाम मुखावरी पुसी हातें ॥४॥
वस्त्र नेसविलें तेव्हां सोनसळा । संत हा सोहळा पाहताती ॥५॥
तुका म्हणे तेव्हां सोडवी संकटीं । भक्तां जगजेठी साहकारी ॥६॥