कोजागरी 12
“तूं गरीब व मी का श्रीमंत आहें? मीहि गरीबच आहें. बाबांची श्रीमंती मला नको. पापी श्रीमंती. लोकांना रडवणारी संपत्ति. आम्ही लुटारू व डाकू आहोंत. आम्हांला सातदां फांशीं द्यावें. रोज माझ्या घरीं मी गोष्टी पहात असतों. शेतकरी येतात. गरीब येतात. रडतात, हात जोडतात. गुमास्ते त्यांच्या अंगावर ओरडतात. त्यांना वाटेल तें बोलतात. नको गुणा हें पाप. मला गरीब होऊं दे. मी मोठा झालों तर माझ्या वांट्यास येईल तें सारें देईन. गरिबांचे संसार सुखी करण्यासाठीं देईन.”
“जगन्नाथ, तुला गरीब होऊन कसें चालेल? तुझें आतां लग्न होईल. होय ना?”
“तुला कोणी सांगितलें?”
“तुझ्याच आईनें. म्हणाली जगन्नाथच्या लग्नांत ये हो. एव्हांपासून आमंत्रण देऊन ठेवतें.”
“गुणा, मी काय करूं? एवढ्यांत लग्न. परंतु आई रडते. म्हणते ‘माझ्या देखत होऊं दे. मी का आतां फार वांचणार आहें?’ काय करावें समजत नाहीं.”
दोघे मित्र घरीं आले. जगन्नाथच्या खेलींतच गुणा झोंपला. आपल्या गादीवर त्यानें गुणाला झोपविलें व स्वत: दुसरें एक आंथरूण घालून त्यावर तो निजला. दोघे मित्र कितीतरी वेळ बोलत होते. पहांट व्हायची वेळ होत आली. जगाला जागृति होण्याची वेळ! परंतु गुणा व जगन्नाथ खरोखरचे जागे झाले होते. आणि आतां जागे होऊन पहांटे झोंपलें होते. ते झोंपले तरी जागे होते. जग जागें होणार होतें परंतु खरोखर जगाच्या डोळ्यांवर झांपडच रहाणार होती! खरी जाग केव्हां येईल?