इंदूर 3
“उद्या दहाच्या सुमारास गाडी येईल. तयार रहा हो. नाही तर बसशील प्लेटी लावीत.”
“उद्या जिवंत प्लेट येणार. ही कशाला लावू?”
“आपल्याबरोबर म्हणशील हो त्यांना वाजवा म्हणून. ते दमलेले असतील. उगाच काही वेड्यासारखे करू नकोस.”
“नाही हो बाबा. मला समजते थोडे.”
“केव्हापासून समजू लागले?”
“आजपासून.”
“पाहुण्यांच्या येण्याच्या बातमीनेच तुला समजू लागले हा शुभ शकुनच म्हणावयाचा. ते आल्यावर मोठी पंडिताच होशील?”
“नको का होऊ? अडाणीच का राहू?”
“पुष्कळ वेळा अडाणी असणेच बरे.”
“मग मला शाळेतून काढा.”
“शाळेत शिकूनच अडाणी हो. शाळेत जाऊन का मनुष्य शहाणा होतो असे तुला वाटते? वेडी.”
‘मी आपली जाते. तुम्ही उलटे सुलटे बोलता.”
इंदु उठून गेली. ती आपल्या खेलीत गेली. आपली खेली ती नीटनेटकी करू लागली. सामानसुमान तिने नीट लावून ठेवले. ते आरसपानी संजि-याचे लहान लहान ताजमहाल तिने टेबलावर नीट ठेवले. काही भरतकामे भिंतीवर लावून ठेवली. एक भरलेले हरण फारच सुंदर दिसत होते. आणि दुस-या एका चित्रांत दमयंती हंसाजवळ उभी आहे असे चित्र होते. किती नाजूक रंगांनी तिने ते भरलेले होते. एका भरतकामांत हिंदुस्थान होता व मध्ये महात्मा गांधी होते. टेबलाच्या वर ते तिने लावून ठेवले.
“इंदु, काय ग करतेस?” वदिलांनी येऊन विचारले.
“सामान लावून ठेवीत आहे. पाहुणे उद्या येणार. इंदु बावळट दिसता कामा नये. टापटिपीची दिसली पाहिजे.”
“तुला काही ते पाह्यला नाही येताहेत.”