इंदिरा 5
“आणि गेलो म्हणून काय झाले? आईबाबांना एकदांच दु:ख होऊं दे. पुन: पुन्हां नको. मी तुला आश्रमांत ठेवून घरी येईन व मीहि कोठे निघून जाईन. कदाचित् आई व बाबा आपण होऊनच म्हणतील की तुलाहि जायचे असेल तर आत्ताच जा. ती आल्यावर पुन: तू जायचें, असला प्रकार नको. बघावे काय काय होते ते.”
“मी तेथे काय शिकू?”
“जे शिकता येईल ते शीक. मुख्य वातावरणाचा जो परिणाम होईल, जे संस्कार होतील, ते महत्त्वाचे. काय शिकावे याला महत्त्व नाही. शिकून मनावर, बुद्धीवर, हृदयावर संस्कार काय झाले हा प्रश्न आहे.”
“तेथे फार कडक नियम असतील नाही?”
“तू त्याचप्रमाणे वाग. शाबासकी मिळव. कोणतेहि काम करावयास लाजूं नकोस. झाडणे असो, दळणे असो; भांडी घासणे असो वा स्वयंपाक करणे असो; पाणी भरणे वा धुणे; सारे आनंदाने कर.”
जगन्नाथ व इंदिरा वर्ध्याला आली. महिलाश्रम वर्धा शहरापासून थोड्या अंतरावर होता. मारवाडी विद्यालयाच्या जवळ होता. शेतामध्येच होता. जगन्नाथ तेथील चालकांस भेटला. व्यवस्थआ झाली. त्या महिलाश्रमांत ठिकठिकाणच्या अनेक कार्यकर्त्यांच्या मुली शिकत होत्या. काहींच्या पत्न्या शिकत होत्या.
येथे पूर्वी सत्याग्रहाश्रम होता. महात्माजी कधी आले तर तेथील इमारतींतील वरच्या मजल्यावरील खोलींत रहात. त्या खोलींत जगन्नाथ गेला. तेथे महात्माजींनी प्रवचने केली होती. तथे ते राहिलेले होते. जगन्नाथने त्या खोलीला प्रणाम केला. सत्याग्रहाश्रम आतां नालवाडीस गेला होता. पूज्य विनोबाजी आतां नालवाडीस रहात. परंतु महिलाश्रमांतील भगिनींसाठी ते रोज येत असत. कांही तरी सांगत असत. प्रेमाने सर्वांची चौकशी करीत असत व पुन्हां नालवाडीस हरिजनवस्तींत रहात असत.
आज नालवाडी सर्व विधायक कामांचे केंन्द्र झाले आहे. त्या वेळेस पसारा नव्हता. आज वर्ध्याच्याभोवती सर्व विधायक कामे शास्त्रीय रीतीने सुरू झाली आहेत. खादीच्या सूर्याभोवती सर्व उद्योग तेथे फुरत आहेत. सर्व हिंदुस्थानांतून विद्यार्थी शिकायला येत आहेत. अखिल भारतीय ग्रामोद्योग विद्यालय तेथेच आहे. सर्व हिंदुस्थानचे तेथे आज दर्शन होते. विधायक कामाला वाहून घेऊन दरिद्रीनारायणाची सेवा करूं पाहणा-या भारतीय तरुणांचा ध्येयनिष्ठ व उत्साही, श्रमजीवी मेळावा तेथे दिसून येतो. खादीचे प्रयोग तेथे होत आहेत. टकळीवरच तासांत चरख्याइतके सूत कांतणारे टकळीवीर तेथे आहेत. डाव्या उजव्या हाताने चरखा चालवणारे आहेत. पायांनी चालवावयाचा चरखा आहे. अद्याप प्रयोग चालले आहेत. हा मगनरहाट दीडपट काम देतो. यावर दोन्ही हातांनी सूंत काततांत. पिंजणाचे प्रयोग चालले आहेत. कपाशीचे प्रकार, कोणता चांगला, ते सारे तेथे शिकविले जाते. संशोधकबुद्धि राष्ट्राच्या या बुडालेल्या धंद्याकडे लावण्यांत आली आहे. मगनवाडी व नालवाडी येथे सर्व प्रकारचे ग्रामोद्योगी शिक्षण आज मिळत आहे. कागद तयार करणे, चर्मालय, सुधारलेली तेलघाणी, सारे तुम्हांला दिसून येईल. शास्त्रीय गोपालनहि दिसून येईल आणि जवळच राष्ट्रीय शिक्षणाचे प्रयोग—वर्धाशिक्षणपद्धतीचे प्रयोग—दिसतील. आज हे सारे प्रयोग, हे सारे प्रकार तेथे आहेत. परंतु त्या वेळेस नव्हते. त्या वेळेस पूर्वीचा पाया भरला जात होता. श्रद्धा व निष्ठा यांचा पाया भरला जात होता. अध्यात्मिक भांडवलाचा पाया भरला जात होता. प्रेम व पावित्र्य यांचा पाया भरला जात होता.
जगन्नाथ तेथे दोन दिवस होता. आश्रमांत साप, विंचू वगैरेंना कोणी मारीत नाही. सापाला पोत्यांत वगैरे पकडून बाहेर नेऊन सोडून देतात. विंचवाला धरून शेतांत सोडून देतात. जगन्नाथ तेथे असतांना एके दिवशी एक विंचू आला. एक लहानशी मुलगी आली. तिने पकडली नांगी व तो शेतांत सेडून दिला. निर्भयतेचे वातावरण तेथे आहे. “सर्वत्र भयवर्जनम्” या व्रताचे प्रायोगिक शिक्षण तेथे देण्यांत येते.