एरंडोलला घरीं 4
“येऊ दे, माझा जगन्नाथ येऊ दे. तुझ्या तोंडात साखर पडो! किती तुझ्यावर त्याचे प्रेम! त्या घरासाठी किती भांडला. आणि ते रोज झाडून ठेवायचा. तुझी आठवण करून रडायचा. तुम्ही पुन्हा दोघे एकत्र कधी व्हाल? कधी तुम्हां दोघांना बरोबर पाहून, बरोबर पुन्हा दूध प्यायला देईन, लाडू खायला देईन. किती तुमचे लहानपणी प्रेम! गुणा, भेटव रे जगन्नाथला! तुमचे प्रेम खरे असेल तर तो भेटेल. बघूं या तुझ्या प्रेमाची शक्ति. आणू दे जगन्नाथला ओढून.”
“आई, इंदिरेची तपश्चर्या त्याला ओढून आणील. तिच्या ध्यासाहून, तिच्या जपाहून, तिच्या तपाहून कोण अधिक बलवंत?”
गुणा इंदिराताईच्या भेटीस गेला. जगन्नाथच्या खोलीत ती राम राम म्हणत सूत कातीत होती.
“इंदिराताई.”
“कोण?”
“मी गुणा.”
“बसा. आणि तुमचे मित्र कोठे आहेत? एकटे हो कसे आलेत?”
“मी आणीन हो त्याला. आणल्याशिवाय राहणार नाही. जगन्नाथ येईल, येईल.”
“मीहि आशेने आहे की ते येतील. ही आशा नसती तर माझे प्राण अद्याप टिकले नसते.”
गुणा घरी गेला. त्याला काय करावे ते सुचेना. जगन्नाथच्या घरी जायला त्याला धीर होत नसे. इंदु इंदिरेकडे जाई. परंतु काय बोलणार? कर्तव्य म्हणून ती जाई व परत येई.
“इंदु.” गुणाने हाक मारली.
“काय?”
“मी जाऊं का जगन्नाथला शोधायला?”
“परंतु कोठे शोधाल? एकटे नका जाऊं. मीहि येते बरोबर. आतां मला सोडून नका जाऊं.”
“माझ्यावाचून रहा काही दिवस. इंदिरेबरोबर समदु:खी हो. म्हणजे तिच्याजवळ तुला बोलता येईल. तिचे समाधान करण्याचे धैर्य तुला येईल. मी नेहमी पत्र पाठवीन. येईन एकदां हिंडून. तो गाणे शिकायला जाणार होता. दक्षिणेकडील प्रमुख शहरे पाहून येतो.”
“गुणा, किती दिवसांत परत येशील? काही मर्यादा ठरव.”