इंदु 26
“माझ्याजवळ तूं होतीस. सारी होती. मनुष्य कुठेहि गेला तरी तो एकटा नसतो.”
“दुसरे कोण होते तेथे?”
“तूं होतीस मनांत.”
“म्हटले आणखी कोण होते!”
“जातो आता. घरा जातो. आईला भेटतो. तिला वाईट वाटेल. हे सामान घेऊनच तिकडे जातो. म्हणजे आतांच आलो असे त्यांना वाटेल. तूं रागावशील म्हणून आधी तुझ्याकडे आलो.”
आणि खरोखरच सारे सामान घेऊन गुणा आपल्या आईबापांच्या खोलीत गेला. त्यांना आनंद झाला. तो आईजवळ बसला होता. तो इंदु आली.
“कशाला ग आलीस?”
“तूं आलास असे कळले म्हणून.”
“जरा आईजवळ बसलो तो आली.”
“येण्याच्या आधी गुणा कळवलेस का नाही?”
“तूं स्टेशनवर माळ घालायला येशील म्हणून.”
“माझ्या माळेची इतकी का भीति वाटते?”
“भीति नाही वाटत.”
“लाज वाटते?”
“लाजहि नाही वाटत.”
“मग.”
“तिचे प्रदर्शन नसावे एवढेच वाटते.”
“लोक तर मुद्दाम समारंभ करून माळ घालायला लावतात.”
“ती माळ समाजासाठी असते. खरी माळ आधीच पडलेली असते. तिला संमति समाजाची घ्यावयाची, तिला जणुं पुरावा समाजाचा घ्यायचा. समजलीस? बरे बस आतां उभ्याने बोलून दमशील.”
“मी कलकत्त्याला लांब प्रवास करून थोडीच आल्ये आहे. गुणा, आज जेवायला आमच्याकडे ये. सारीच या नाही तर.”