इंदु 12
रामराव व गुणाची आई उठली. गुणा जेवतच होता. इंदुहि जेवत होती.
“गुणा किती जेवतोस?”
“हा भात नकोसा झाला इंदु.”
“मला दे एकेक घास.”
“ये. तुझें ताट घेऊन ये.”
इंदु आपले ताट घेऊन आली. गुणा एकेक घास तिच्या हातांत देऊं लागला, संपला भात.
“दे ना रे.”
“आतां हा हात फक्त राहिला. भात संपला.”
‘मग हात दे.”
“त्याची वेळ येईल तेव्हां देईन.”
“केव्हा येईल वेळ?”
“येईल. प्रत्येक गोष्टीची वेळ येत असते इंदु.”
इंदु व गुणा उठली. इंदु पाटपाणी उचलूं लागली. गुणा तिला मदत करूं लागला.
“अग तूं जणु सासुरवाशीणच झालीस!”
“नको का होऊ?” इंदु हसून म्हणाली.
“अग चांगल्या श्रीमंताच्या घरी पडशील. स्वयंपाक करावा लागणार नाही, वाढावे लागणार नाही.”
“मग या हातांचा काय उपयोग?”
“रुमाल भरावे, सारंगी वाजवावी.”
“काही तरी आई तुम्ही बोलतां. मला असे वाढायला आवडेल. स्वत:च्या हातांनी स्वयंपाक करायला आवडेल.”
“आणि आई, मला इंदूच्या हातचे खायला आवडेल, तिच्या हातचे वाढलेले आवडेल.”