येथें नको, दूर जाऊं 10
“होय हो, माझे प्रेम तुझ्यासाठी आहे. आणि तुझे, माझ्यासाठी. तू माझे ऐकतोस. स्वाभिमान दूर ठेवतोस. जणुं माझ्या प्रेमासमोर तू स्वत:ला रिकामे करतोस. सदरा घाल म्हटले, घालतोस. आंगठी घाल म्हणालो तर घालतोस. कोणी हंसो, बोलो, तू माझ्या समाधानासाठी सारे करतोस. तुला तुझे आई-बाप एकदा रागे भरले, माझ्या लग्नाच्या वेळेस. परंतु तू मनावर घेतले नाहीस. मी दिलेली खादी घेतलीस. गुणा, माझ्याहून तुझे प्रेम थोर आहे. तुझ्या प्रेमाने स्वाभिमानहि सोडला. जणुं माझी इच्छा तू स्वत:ची केलीस! तुझ्यासारखा कोण मला मिळणार आहे? तू माझे रत्न, माझी संपत्ति. माझ्या भावांनी इस्टेटी मिळविल्या. मी एक खरा मित्र जोडला.”
दोघांच्या भावना ओसरल्या. कितीतरी वेळ दोघे बोलत होते. तेथे भिंतीवर जगन्नाथचा एक फोटो होता. फार सुंदर होता तो फोटो.
“जगन्नाथ, हा फोटो मी नेऊं?”
“तुझ्याकडे तर माझे दुसरे कितीतरी आहेत फोटो.”
“परंतु हा मला आवडतो. तुझ्याजवळ मागेन मागेन म्हणत होतो. नेऊ का मी?”
“ने कीं.”
जातांना गुणाने तो फोटो घेतला.
“गुणा, उद्यां सकाळी लौकर ये. आपण मळ्यांत जाऊ.”
“बघेन.”
“येच. मी वाट बघेन.”
दारांत दोघे उभे होते. गुणाचा पाय खोलीच्या बाहेर पडेना. आपल्या मित्राचे हे शेवटचे दर्शन आहे ही गोष्ट जगन्नाथला माहीत नव्हती. परंतु गुणाला माहीत होती.