एरंडोलला घरीं 3
“झाले तर. सुख दागिन्यांत नाही. सुख मनाच्या समाधानांत आहे. आपणांस ते समाधान अशी सेवा करून मिळेल. आणि या घरांत राहणेहि माझ्या जिवावर येते. येथे आईची व बाबांची आठवण येते. तेथे नको वाटते. दुसरीकडे जाऊं एरंडोलला जाऊं. वीस वर्षे आईबापांच्या घरीं नांदले, आतां तुमच्या घरी. एरंडोलच्या घरी. तुमची खेली पाहीन. तेथे तुम्ही दोघे मित्र गात असां, बसत असां. तुमची अंजनी नदी पाहीन. चला. खरेच चला.”
गुणाने इंदूचे घर विकले. त्या घराला घेण्यासाठी टपलेलेच होते. त्रास पडला नाही. घरांतील सामानसुमानहि पुष्कळसे विकून टाकण्यांत आले. इतर सामान रेल्वेने गुड्स करून पाठवण्यांत आले. एके दिवशी इंदु व गुणा, रामराव व त्यांची पत्नी सारी इंदूर सोडून निघाली.
जळगांवला उतरून स्पेशल मोटार करून रात्री ती सारी एरंडोलला आली. बरीच रात्र झालेली होती. त्या जुन्या वाड्याजवळ मोटार थांबली. पुन्हा ती किल्ली लावून कुलूप उघडण्यांत आले. सहा वर्षांनी रामराव घरांत परत शिरत होते. कंदील लावण्यांत आला. मोटारींतील सामान काढण्यांत आले. मोटार गेली.
शेजारची मंडळी जागी झाली. कोण आले म्हणून पहावयास ती आली. तो वृद्ध रामराव तेथे होते.
“रामराव?”
“आलो परत.”
“आणि हा गुणा वाटते.”
“किती उंच झालास! बरे झाले. आलेत पुन्हां. तुझा मित्र आतां येऊं दे. तुमच्या आठवणी सर्व गावांला येतात. तालुक्यांतील, खेड्यापाड्यांतील शेतकरी तुमची आठवण करतात.”
लोक गेले. दार लावून मंडळी आंत आली. घर स्वच्छ होते. सामान ठेवण्यांत आले. आधी देवांना देवघरांत नेऊन ठेवण्यांत आले.
गुणा आपल्या खोलीत गेला. पाठोपाठ इंदुहि होती. गुणाचे एक भव्य तैलचित्र तेथे होते. फारच सुंदर दिसत होता गुणा. बालपणाची कोवळीक त्या फोटोत होती.
“किती छान चित्र!” इंदु म्हणाली.
“परंतु हा चित्र टांगणारा कोठे गेला? त्याच्या घरी उद्यां हे तोंड कसे दाखवूं? कोठे गेला जगन्नाथ?”
“येईल हो जगन्नाथ परत. नका वाईट वाटून घेऊं.”
सकाळी सर्व शहरभर वार्ता गेली. अनेक लोक भेटायला आले.
गुणा जगन्नाथच्या आईकडे गेला. तो पंढरीशेटच्या व जगन्नाथच्या आईच्या पाया पडला.
“गुणा, बरा आहेस ना? कोठे रे इतकी वर्षे होतास? तू तेथे असतास तर जगन्नाथ जातां ना! केव्हा येईल तो? एकदां त्याला पाहीन व डोळे मिटीन. त्याला भेटण्यासाठी फक्त हे प्राण उरले आहेत. आणि इंदिरा! काय तिची दशा! तिचीहि करुणा देवाला येऊ नये का?”
“आई, येईल हो जगन्नाथ. मी आलो, आता तो येईल. त्याला मी शोधून आणीन.”