जगन्नाथ 3
“कावेरीचे आजोबा होते. तिच्यावर त्यांचे फार प्रेम. माझी ही पहिल्या बायकोची मुलगी. मी पुढे दुसरे लग्न केले. माझे वडील कावेरीला जीव की प्राण करायचे. त्यांना तिचे वेड. त्यांच्याच आग्रहाने तिचे बालपणी लग्न लागले. परंतु तिचा पति कावेरी नदीत बुडून मेला. नाव उलटली, त्यामुळे मेला. कावेरी म्हणते माझ्या नावाने मी बुडाले. तिला मी पुष्कळ वेळा म्हटले की तू पुन्हा लग्न कर. परंतु ती नको म्हणते. ती दिवसभर कामांत असते. हरिजनांची शाळआ चालविते, हिंदी वर्ग चालविते. काही हिंदी पुस्तकांची तिने तामीळमध्ये भाषांतरे केली आहेत. तुमच्याजवळ मी तिचीच कथा सांगू लागलो. परंतु कोणीहि आले की प्रथम याच गोष्टी ओठांवर येतात. आणि ती सहज येथे येऊन बसली म्हणून बोललो. तुम्हा आणा सामान. रहा येथे. शिका दक्षिणी संगीत. तुम्हांला फार दिवस नकोत. नुसती थोडी पद्धत एकदां लक्षांत आली म्हणजे झालें.”
जगन्नाथ पशुपतींच्या घरी रहावयास आला. त्याला एक खोली देण्यांत आली. फार सुंदर खोली. त्या घरची ती सर्वांत वरची खोली होती. एकच खोली व समोर मोठी गच्ची. या गच्चीत कधी कधी गाणे होत असे. त्या गच्चीत उभे राहिले म्हणजे कांचीवरम् शहराचा नयनमनोहर भाग दिसत असे.
जगन्नाथने त्या खोलीत आपले सामान लावले. गुणाचा फोटो भिंतीवर लावला. सारंगी वाजवणा-या गुणाचा तो फोटो होता. आणि इंदिरेचा फोटो त्याच्याजवळ होता का? नव्हता. तिचा फोटो अद्याप त्याने काढून घेतला नव्हता. त्या खोलीत तो बसला होता. तो कावेरी आली. ती हिंदींत बोलत होती, उभ्या उभ्या बोलत होती. जगन्नाथहि उभा राहिला.
“हा कोणाचा फोटो?”
“माझ्या मित्राचा. तो सारंगी वाजवतो.’
‘आणि तुम्ही सुंदर गाता. बाबांकडे किती तरी विद्यार्थी येऊन गेले. त्यांच्या वर्गात हल्लीहि आहेत. परंतु असा गोड आवाज मी नाही ऐकला कधी.”
“परकें असते ते कधी कधी गोड वाटते. परदेशी माल लोकांना एकदम आवडला, परंतु आज स्वदेशी आवडत आहे. परदेशी वस्तु क्षणभर आवडते.”
“सौंदर्य हे देशी नाही, विदेशी नाही. ज्ञान देशी नाही, विदेशी नाही. कोठेहि जा. सायंकाळचे सूर्यास्त तुम्हांला आपडतील. थोरांचे विचार कुठल्याहि भाषेत असोत, ते आपणाला आवडतील. आवाजाची माधुरी कोठलीहि असो, ती गोडच लागेल.”
“तुम्हांला हिंदी असे छान बोलता येते!”
“तुम्ही का नाही दिलीत परीक्षा?”