आगगाडींत भेटलेला देव 5
गुणाने सारंगी हाती घेतली व तो ती वाजवू लागला. ती सारंगी त्याची मैत्रीण, त्याचा आधार. तारा छेडताच लोक चमकले! मधुर नाद कानात जाताच लोक पाहू लागले. संगीताने साप डोलतात, हरणे वेडी होतात, गाई ठायीच्या ठायी थबकतात, स्तब्ध राहतात! संगीताने शिळा पाझरतात, नद्यांचे पाणी वहावयाचे थांबते. मग माणसे नाही का पाझरणार?
गुणा रंगला. त्याला जगन्नाथची आठवण आली आणि त्याच्या डोळ्यांतून पाणी आले. डोळे मिटून तो वाजवू लागला. शांत, मधुर, गंभीर दृश्य! जणु भिकारी होऊन तो तेथे उभा होता. तो राग संपला. त्याने प्रेमळपणाने समोर सर्वत्र पाहिले. लोकांच्या चेह-यावर प्रेमळपणा आला होता. उदासीनपणा जाऊन सहानुभूति फुलली होती.
“ये बाळ, इकडे ये.” कोणी म्हणाले.
“माझ्या आईबापांना बसायला जागा द्या. मी उभा राहीन, मी तरुण आहे; त्यांना बसू दे.” तो म्हणाला.
“या, इकडे या सारी. माझ्या गादीवर बसा. या, ये बाळ. तिघे या.” एक सज्जन म्हणाला.
“चल आई, चला बाबा.” गुणा प्रेमळपणे म्हणाला. आणि तिघे तेथे जाऊन बसली. गुणाला कृतज्ञता वाटली. त्याने पुन्हा तारा छेडल्या आणि पुन्हा एक सुंदर राग त्याने आळविला. लोक वेडे झाले. गुणाकडे आदराने पाहू लागले.
“किती सुंदर वाजवतां तुम्ही? कोठे जाता?” त्या उदार गृहस्थाने विचारले.
“आता नाशिकला जात आहोत.”
“राहणारे कोठले?”
“खानदेशचे.”
“नाशिकला बदली वगैरे झाली वाटते?”
“नाही. आम्ही काही आपत्तीमुळे खानदेश सोडून, घरदार सोडून जात आहोत. कोठे जायचे ते ठरलेले नाही.”
“परंतु नाशिकला काय करणार?”
“कोणाला माहीत? एखादी खोली घेऊ व राहू. मी रोज भिक्षा मागेन. रस्त्यांतून सारंगी वाजवीत हिंडेन. आईबापांना पोशीन. ही सारंगी हीच आमची इस्टेट.”