जगन्नाथचे लग्न 5
“गुणा, हा मला होईल. तो तू घे.”
“अरे तूं नवरदेव. तो तुला व आता तुझा हट्टच आहे म्हणून हा मला.”
“नाही तर आपण एकेक पान वाटून घेऊ. यातील एक पान तुला, एक मला. तसेच त्यातील एक पान तुला व एक मला. म्हणजे झाले की नाही?”
त्यांनी ते तलम धोतरजोडे घेतले. हातरुमाल, टॉवेलहि घेतले.
“अरे जगन्नाथ, सुंदरशी शाल घे अंगावर घ्यायला.”
“खरेच.”
आणि एक गुलाबी रंगाची नयनमनोहर शाल त्यांनी घेतली. भरपूर मनाजोगी खादी खरीदून ते घरी आले.
एके दिवशी रामराव गुणाच्या आईजवळ घरी बोलत होते.
“याने कशाला घेतली ती खादी?” ते म्हणाले.
“लग्नाला जाणार आहे. जगन्नाथने घेऊन दिली. तो ऐकेना, मग गुणा काय करणार?” ती म्हणाली.
“परंतु मला नाही हे आवडत. स्वाभिमान आहे की नाही. सारे लोक हसतील. आणि जगन्नाथचे भाऊ वाटेल तेथे अपमान करतील. यांना कपडेहि घेण्याचे अवसान नाही असे म्हणतील. चिंध्या वापराव्या परंतु मिंधेपणा नको.”
“माझेहि तेच मत आहे. परंतु गुणाला वाईट वाटेल. त्याच्या मित्राला वाईट वाटेल. जगन्नाथचे गुणावर जीव की प्राण असे प्रेम आहे. जेथे प्रेम आहे तेथे थोडाच मिंधेपणा आहे?”
“परंतु जगन्नाथच्या घरी इतर माणसे आहेत. त्यांची तोंडे थोडीच थांबणार आहेत? आणि प्रेम प्रेम म्हणजे दोन दिवस. या जगन्नाथचे उद्या लग्न होऊ दे. म्हणजे मग बघ शाळा बंद होईल. संसार करू लागेल. सावकारी करूं लागेल. आणि मग प्रेम ओसरेल. पैशाचे प्रेम सुरू होईल. आहेत अजून लहान तो प्रेम. तुला एक सांगू का गोष्ट?”