ही चंद्रभागा नको,त्या चंद्रभागेंत पवित्र हो 6
“मी तिच्यासमोर कसा उभा राहूं ?”
“खाली मान घालून उभा रहा. पवित्र होण्यासाठी उभा रहा. तिच्या नेत्रांतील प्रेमचंद्रभागा तुझ्यावर येईल. तूं पवित्र होशील. चल हो जगन्नाथ, चल.”
जगन्नाथचा हात धरून गुणा निघाला.
“थांब गुणा. बाळाची तेथे आंगडी आहेत. कावेरीची एक चोळी आहे. तेथें असेल. चल की घेऊं. ती स्वच्छ होती. तेथें असतील, चल. इतरहि कपडे तेथे आहेत. ते चंद्रभागेंत सोडून देऊं.”
“चंद्रभागेत नको.”
“मग का तेथेंच ठेवायचे ?”
”ते जाळूं.”
“तूं डॉक्टर झालास वाटतें ?”
“हो. डॉक्टर झालो आणि तुझा रोग बरा करायला आलों.”
ते गलिच्छ कपडे त्यांनी गोळा करून घेतले आणि चोळी व आंगडें गुणांच्या खिशांत जगन्नाथनें ठेवले. काही कपडे त्यांनी जाळले. यात्रा कमी होऊं लागली. सर्वत्रच कॉलरा पसरला. शेकडों लोक मरूं लागले.
जगन्नाथ व गुणा आगगाडींत होते.
“कुठें आहे ती चोळी ? ते आंगडें ?” जगन्नाथनें विचारलें.
“ही घे.” गुणानें काढून दिली.
जगन्नाथनें ती रूमालांत गुंडाळून हृदयापाशी धरिली व पांघरूण घेऊन तो झोपी गेला. प्रेमळ मित्र जागला होऊन तेथें बसला होता.