राष्ट्रीय मेळा 3
बाजार भरला आहे. बाजारांत माळी भाजी घेऊन विकायला बसले आहेत. एक शिपाई येतो व त्यांच्या भाजींतून खुशाल वांगीं वगैरे उचलतो. ते बिचारे बोलत नाहींत. परंतु एक माळीदादा हात लावूं देत नाहीं. तो पोलीस चिडतो व जास्तच वांगीं उचलूं लागतो. तेव्हां तो माळीदादा खिशांतून वही काढतो व त्या पोलीसास नांव विचारतो. पोलीस घाबरतो. तो म्हणतो, “नांव नको टिपूं. हीं तुझीं वांगीं ठेवून देतों.” माळीदादा म्हणतो, “सर्वांचीं वांगीं ठेव. आणि पुन्हां तुम्ही किंवा इतर कोणी असा त्रास द्यायला याल तर खबरदार.” तो पोलीस घेतलेली भाजी परत देतो व निमूटपणें निघून जाते. मग ते इतर माळी त्या माळ्याभोवती जमा होतात व व्चारतात, “काय रे सांगितलेस तूं त्याला?” माळी म्हणाला, “नांव टिपतों म्हटलें तसा पळाला. तुम्ही सारे लिहावाचायला शिका. रामाचें नांव घेतांच भुतें पळतात, त्याप्रमाणें नांव टिपतों म्हणतांच पोलीस पळतात. आपण अडाणी राहतां कामा नये.”
अशा प्रकारचे ते परिणामकारक आणि भ्रामक कल्पना नष्ट करणारे संवाद होते. एक शेतकरी असतो. त्याचे घरीं मुलें आजारी. त्याला खूप कर्ज. तो त्रस्त होतो. त्याला वाटतें शनीची पीडा असेल. तो कोणा भटजीला विचारतो. ग्रहासाठीं दानें कर म्हणून तो त्याला सांगतो. परंतु सेवयंसेवक येतात. ते त्याला निराळाच प्रकाश देतात. त्यांच्यांत पुढीलप्रमाणें संवाद होतो.
शेतकरी : काय करूं दादा, अगदीं वेडा होऊन गेलों बघा. सारी ओढाताण.
स्वयंसेवक : शेतक-याची सर्वत्र ही दशा आहे.
शेतकरी : मुलें आजारी.
स्वयंसेवक : त्यांना पोटभर खायला आहे का? थंडींत पांघरूण होतें का? कधीं दूध भेटतें का त्यांना?
शेतकरी : ही काय थट्टा करतां गरिबाची! शेतक-यांचीं मुलें का दूध पितात?
स्वयंसेवक : अरे मुलाबाळाना नीट देतां येत नाहीं म्हणून ती आजारी आहेत. शेतसारा कमी असता, सावकारांचा ससेमिरा नसता, तर तूं पिकवलेलें तुला राहिलें असतें. तुझी मुले आनंदी व गुबगुबीत दिसती. तूहि आनंदात असतास. खरे की नाही?
शेतकरी : हो, खरें आहे. परंतु नशिबी नाही.
स्वयंसेवक : नशीब तुमच्या हातीं आहे. आकाशांतील शनिदेवाच्या हातीं नाहीं. तो शनि एक निर्जीव वस्तु आहे. जळता गोल. तो काय करणार आहे? सावकाराने त्रास नाही दिला, सरकारने त्रास नाही दिला, तर तो शनि का येणार आहे? खरी अडचण सरकार-सावकारांची आहे. ही साडेसाती दूर करायची असेल तर संघटित व्हा. सरकार-सावकाराला सांगा, आधी मला पोटभर खाऊ दे. मी पिकविले. माझा हक्क आधी. मग तुम्ही.
शेतकरी : खरे आहे दादा तुमचे म्हणणे. हेच शनि आहेत. आणि आम्हाला त्या शनीसाठी दाने करायला लावतात. सारे थोतांड; फसवणूक.