गुणा कोठें गेला गुणा? 5
हे चरण एकदा दयाराम भारतींनी व्याख्यानांत म्हटलेले त्याला आठवले. संपत्तीमुळे देशसेवा येत नसेल, सरकारची हांजी हांजी करावी लागत असेल, मामलेदार, फोजदार यांना खुष ठेवावे लागत असेल, घरावर स्वातंत्र्याचा झेंडा लावता येत नसेल तर ती संपत्ति काय चाटायची? जी संपत्ति भूमातेची पूजा करू देत नाही, भूमातेपासून दूर नेते, भूमातेची आठवण होऊ देत नाही, ती संपत्ति की विपत्ति? ते भाग्य की दुर्भाग्य? ते वैभव की विष? अशा संपत्तीपेक्षा दारिद्र्य बरे, ज्या दारिद्र्यात भूमातेची पूजा करता येईल. दयारामांचे ते शब्द, ते भाषण आज त्याला आठवले. स्वत:च्या संपत्तीची त्याला खंत वाटली. या श्रीमंतीमुळेच दादा मागे मला म्हणे की तू मिरवणुकी काढू नकोस, मामलेदार रागावतील. या संपत्तीमुळेच तो मला मेळ्याबरोबर जायला व त्यांत काम करायला विरोध करीत असे. आग लागो या संपत्तीला! हिने देश दुरावतो, आणि मित्र दुरावतो. गेला, गुणा गेला, कोठे गेला असेल! काल कसे म्हणे, ‘तुला पहात रहावेसे वाटते.’ काल त्याचे पाय येथून निघत ना. परंतु मजजवळ बोलला नाही. का नाही बोलला? मीहि त्याच्याबरोबर गेलो असतो. आम्ही दोघे भिकारी झालो असतो, प्रेमाचे यात्रेकरू. कोठे गेला गुणा.”
“बाळ चल. दोन घांस खा. येईल हो गुणा.”
“आई, गुणा जिवंत असेल का?”
“असेल हो. असे वेडेविंद्रे नको मनांत आणू. शेवटी सारे गोड होईल. कडू आंबे पिकतील, मुक्या कळ्या फुलतील. जातील हे दिवस. तुझा मित्र येईल. अमावस्या जाईल, पुन्हा चांदणे येईल. चल, ऊठ. माझ्यासाठी चल. मी नाही का रे तुझी कोणी? चल, सारे खोळंबले आहेत.”
जगन्नाथ उठला. तो पाटावर जाऊन बसला. सारे जेवू लागले. जगन्नाथच्या ताटांत टपटप पाणी गळत होते.
“काय रे झाले?” दादाने विचारले.
“तुला जणु माहीत नाही.” जगन्नाथ तिरस्काराने म्हणाला.
“त्याला भाजी तिखट लागत असेल. ते दयाराम भारती फिके खात. म्हणत तिखट ल मसाले कशाला? त्यांचा शिष्य झाला असेल जगन्नाथ. अळमिळीत, मिळमिळीत खाणे.”
“परंतु ते दयाराम भारती तिखट खात नसले तरी मिळमिळीत नव्हते. त्याचे बोलणे तिखट. मिरची त्यांच्या बोलण्यापुढे फारच फिकी.”
“अहो मिरची न खाणारे शांत होण्याऐवजी आणखीच रागीट होतात. सरकार-सावकारांना ते शिव्या देतात. पदोपदी त्यांना राग येतो, पदोपदी चीड.”