शेवटी सारे गोड होतें 6
“शांत हो. जगन्नाथ, नको रे रडूं. मी तुझ्याबरोबर असते तर असे काही झाले नसते. माझीच चूक. आतां नाही हो कधीहि माझे हे धन मी डोळ्यांआड होऊ देणार. छायेप्रमाणे मी तुझ्या पाठीशी राहीन. झोप हो जगन्नाथ.”
“तू झोपव. मला थोपट. गाणे म्हण.”
“म्हणू गाणे? म्हणते हं.” असे म्हणून इंदिरा गाणे म्हणू लागली. हाताने थोपटीत होती. पतीचे तप्त मस्तक अमृतहाताने थोपटीत होती. गाणे म्हणत होती—
“नाहीं पडला नाहीं रडला असा नाहिं कोणी
पडुनी रडुनी सकळहि जाती जीव वरतिं चढुनी।।
पडले सुरवर पडले मुनिवर गिळि सकलां मोह
अनुतापें परि पावन होती भरुन नयन-डोह।।
वाइट भारी वाटून घ्या ना पडणेहि पूत।
पडल्याविण ना चढला कोणी हे प्रभूचे सूत्र।।
देवाघरची शेती पिकवी नयनांतील पाणी
हृदयामधली शेती पिकवी नयनांतील पाणी।।
सौंदर्याते मांगल्याचे विपुल पिके पीक
जरि नयनांतिल अश्रुजलाचा होइल अभिषेक।।
मांडीवरती झोप सख्या तू मागिल ते जावो
भूत मरोनि भविष्य आतां उज्ज्वल नव येवो।।
जीवन सुंदर करुं दे अपुले होई न निराश
आहे हृदयी प्रभुचा अपुल्या सकलांच्या वास।।
होऊ अंती पावन सारी काय असे घाई
खाली खाली नदी जाइ परि सिंधु जवळ येई।।
अंवस जरी ये जवळ जवळ जरि अंधकार घोर
तरि ना भय ती जवळ येतसे बीजचंद्रकोर।।