दयाराम भारतींस हद्दपारीची शिक्षा 3
तो शेतकरी, त्याची बायको, तीं मुलें आडवीं झालीं. तीं विरोध करूं लागलीं.
“रावसाहेब, नका नेऊं हे चरखे. दुसरें कांहीं न्या.”
“दुसरें काय आहे घरांत?”
“मडकीं आहेत; गाडगीं आहेत. सूप केरसुणी आहे; जाते आहे. पाटा वरवंटा आहे. काय असायचें घरांत?”
“इकडे गाय आहे रावसाहेब. हीच न्यावी धरून.” तलाठी म्हणाला.
“छान आहे गाय. करा ही जप्त.” पाटील म्हणाले.
“रावसाहेब, गाय गाभण आहे. नका नेऊं. तिचे हाल होतील. गायत्रीचे शाप नका घेऊं.”
“सरकारला कोणाचेहि शिव्याशाप बाधत नाहींत. सोडा ती गाय.”
तो शेतकरी धांवला. तो गाय सोडूं देईना. पोलिसांनीं त्याला ओढलें. अधिका-यानें छडी मारली. गाय सोडण्यांत आली. ती शिंगे उगारून त्या दुष्टांना फाडायला धांवली. परंतु तिच्या तोंडावर पोलिसांचे दांडे बसले! अरेरे! गाईला हाणीत मारीत ते निघाले. त्या शेतक-याला कैद करून चावडीवर बसवण्यांत आलें.
आणि ती गाय? ती मारानें विव्हळ झाली. ती वाटेंतच जखमी होऊन मरून पडली! ती गाय म्हणजे भारताची दीन मूर्ति होती. गाईसारखा हा भारत आज दीनवाणा झाला आहे. मरत आहे. त्या गाईची कथा सर्वत्र गेली. लोक हळहळले. परंतु उठले का? प्रतिकार करावयास उभे होते का? त्या गाईला मारीत मारीत नेत असतां, लोक काय करीत होते? ते कां नाहीं धावून गेले? ते कां हंसत होते? परंतु सुपांतील हंसणारेहि भरडलेच जायचे असतात हें का त्यांना माहीत नव्हतें?
हिंदु धर्माच्या गप्पा मारणारे का मेले होते? मुसलमान गाय विकत घेऊन धर्मासाठीं म्हणून मारतात. परंतु येथें तर सरकार गाय मारीत आहे. कशासाठीं? तर दुष्काळांत शेतसारा देतां येत नाहीं म्हणून. या गाईला मारणारे कोण होते? तो पाटील कोण होता, तलाठी कोण होता, मामलेदार कोण होता? परंतु सरकारविरुद्ध कोणीं बोलावें?
दयाराम भारतींनी सारा तालुका उठविला. शेतक-यांच्या गटपरिषदा घेऊन त्यांना हे अन्याय जळजळीत वाणीनें त्यांनीं सांगितले. माणसें बना व अन्यायाविरुद्ध उठा असें सांगितले. आधीं प्रचार करून नंतर सर्व तालुक्यांतील शेतक-यांची एक विराट् सभा त्यांनीं घेतली. आणि सभेनंतर तो प्रचंड लोंढा मामलेदार कचेरीसमोर ते घेऊन गेले. मामलेदार घाबरला. तो खुर्ची सोडून बाहेर आला.