इंदूर 7
“तुम्ही या खाली, तो काढील सारे सामान.”
गुणाहि खाली उतरला.
“बाबा, हा हार?”
“घाल ना तूच.”
इंदूने गुणाच्या गळ्यांत हार घातला, गुणा हंसला.
“मी का मोठा आहे कोणी? मी अजून लहान आहे.”
“इंदूचा हट्ट. म्हणे गायनांतल्या वस्तादांना हार घालतात. मग वादनांतील वस्तादांना का नको?”
“मी काही वस्ताद नाही.”
“दिसेल आतां.”
सारी मंडळी बाहेर आली. मनोहरपंत व इंदु पुढे बसली. पाहुणेमंडळी मागे बसली. मोटार सुरू झाली.
“मोटार कशाला आणलीत?” रामराव म्हणाले.
“मित्राची होती, घेऊन आलो.” मनोहरपंत म्हणाले.
मोटार दाराशीं थांबली. वरून गडी आला. त्याने सारे सामान वर नेले. गुणाची आई आत गेली. रामराव व गुणा दिवाणखान्यांत बसले. सामान एका खोलींत ठेवण्यांत आले. रामराव व गुणा हातपाय धुऊन आले.
“चहा घेता ना?” मनोहरपंतांनी विचारले.
“गुणा नाही घेत. आम्ही घेतो.” रामरावांनी सांगितले.
“खरेच, मनमाडला यांना मी दूधच दिले होते.”
इंदूने चहा आणला, दूधहि आणले. त्याच्याबरोबर थोडे शंकरपाळे व लाडूहि होते. दोघांनी ते सारे घेतले. पुढे स्नाने वगैरे झाली.
“कपडे असू द्या. रामा धुवील.” इंदु म्हणाली.
“मी धुवून टाकतो.” गुणा म्हणाला.
“आजचा दिवस तरी नका धुऊं. आज तुम्ही पाहुणे आहांत.”