आत्मस्थिति - अभंग २०४१ ते २०६०
२०४१
पाहतां पाहतांभुललें मन । धरिलें चरण हृदयीं ॥१॥
वेधें वेधिला जीव प्राण । ब्रह्माज्ञान नावडे ॥२॥
तीर्थाचे जें अधिष्ठान । पुण्यपावन चंद्रभागा ॥३॥
सकळ देवांचा देव उभा । एका जनार्दनीं गाभा लावण्याचा ॥४॥
२०४२
वाचे विठ्ठल बोलावें । मग पाऊल ठाकावें ॥१॥
ऐसा ज्याचा नेमधर्म । मुखीं विठ्ठलाचें नाम ॥२॥
सर्वकाळ वाचें । विठ्ठलनाम वदती साचें ॥३॥
कुळधर्म आमुचा । म्हणे एका जनार्दनाचा ॥४॥
२०४३
माझ्या मना लागो छंद । नित्य गोविंद गोविंद ॥१॥
तेणें देह ब्रह्मारुप । निरसेल नामरुप ॥२॥
तुटेल सकळ उपाधी । निरसेल आधिव्याधी ॥३॥
गोविंद हा जनीं वनीं । म्हणें एका जनार्दनीं ॥४॥
२०४४
शब्द आदि मध्य अंती । उच्चारिता व्यक्ताव्यक्ति ॥१॥
विठ्ठल विठ्ठल जिव्हारी । मुक्ति होईल कामारी ॥२॥
विश्वीं विठ्ठल उघडा पाहे । मुक्त होतां वेळुं काये ॥३॥
एका जनार्दनीं ठसा । विठ्ठल उभा नामासरिसा ॥४॥
२०४५
तंतुपट जेवीं एकत्व दिसती । तैसीं भगवद्भक्ति सर्वांभुतीं ॥१॥
सर्वत्रीं व्यापक विठ्ठल विसांवा । म्हणोनी त्याच्य गांवा मन धांवे ॥२॥
एका जनार्दनीं व्यापक विठ्ठल । तेथें नाहीं बोल आन दुजा ॥३॥
२०४६
लाडिके विठोबाचे आम्हीं । गाऊं नित्यनेमीं नाम तुझें ॥१॥
उत्तम उत्तम साधन हें नाम । गांता प्रेम वाटे जीवीं ॥२॥
न कळेचि वेदां उपनिषद्बोधा । त्या हरि गोविंदा लगे आम्हीं ॥३॥
एका जनार्दनीं मंगळा मंगळ । न लगे आम्हां मोल उच्चारितां ॥४॥
२०४७
बहुत प्रकारें भक्तहि असती । देवहि भेटती तयां तैसे ॥१॥
तैसा नोहे माझा पंढरीचा राव । देवाधिदेव मुकुटमणी ॥२॥
एकविध तया शरण पैं जातां । मोक्ष सायुज्यता पाठीं लागे ॥३॥
ऐसा लावण्य पुतळा देखिला दृष्टी । जनार्दनीं सुख न समाये सृष्टीं ॥४॥
२०४८
गाऊं तरी एक विठ्ठलाचि गाऊं । ध्याऊं तरी एक विठ्ठलचि ध्याऊं ॥१॥
पाहूं तरी एक विठ्ठलचि पाहूं । आणिकां न गोवुं वासनाही ॥२॥
आठवुं तो एक विठ्ठल आठवुं । आणिक न सांठवुं हृदयामाजीं ॥३॥
विठ्ठलावांचुनीं मनीं नाहीं आन । सर्वभावें प्रमाण विठ्ठल मज ॥४॥
एका जनार्दनीं जडला जिव्हारीं । विठ्ठल चराचरीं व्यापुनि ठेला ॥५॥
२०४९
सुखें मुख सोज्वळ पहातां दृष्टी । आनंदी आनंदमय तेणे सृष्टी ॥१॥
देखिला देखिला वैष्णवांचा रावो । देवाधिदेवी श्रीविठ्ठल ॥२॥
गोपाळ गजरीं नाचतीं आनंदें । लीला विनोदें प्रेमरसें ॥३॥
भावाचा अंकित उगा रहए उभा । धन्य त्याची शोभा काय वानूं ॥४॥
पाहतां पाहतां मन धालें सृष्टी । जनार्दनाचा एका परमानंदें पोटीं ॥५॥
२०५०
परिपूर्णपणें उभा । दिसें कर्दळांची गाभा । अंगीचिया प्रभा । धवळलें विश्व ॥१॥
धन्य धन्य पांडुरंग । आम्हां जोडला वोसंग । कीर्ति गातां निसंग । अनुवाद तयाचा ॥२॥
तें सुख सांगतां कोडीं । पापें पळती बापुडीं । यमधर्म हात जोडी । न येचि तया गांवा ॥३॥
ऐसें एकविधभावाचे । संतचरण वंदिती साचे । एका जनार्दनीं त्यांचें । दर्शन दुर्लभ ॥४॥
२०५१
आजी दिवाळी दसरा । श्रीसाधुसंत आले घरा ॥१॥
पायीं घालूं मिठी । आनंदें नाचुं वाळुवंटीं ॥२॥
पाहूं हरींचें ध्यान । तेणें मना समाधान ॥३॥
एका जनार्दनीं भाव । विटे उभा विठ्ठलराव ॥४॥
२०५२
जगाचें जीवन मनाचें मोहन । योगियांचें ध्यान विठ्ठल माझा ॥१॥
द्वैताद्वैताहुनि वेगळा । श्रीविठ्ठल कळा पौर्णिमेचा ॥२॥
न कळे आगमां नेणवेचि दुर्गमा । एका जनार्दनीं आम्हां सांपडला ॥३॥
२०५३
सद्गदित कंठ बाष्प पैं दाटत । जया भेटिलागीं हृदयें फुटत ॥१॥
तो देखिलावो तो देखिला । सबाह्म अभ्यंतरीं व्यापुनियां राहिला ॥२॥
सबराभरीत भरुनी पंढरीये उभा । सभोंवतीं दाटी संतांची शोभा ॥३॥
ऐसा लावण्य - पुतळा देखिला दृष्टी । एका जनार्दनीं सुख न समय सृष्टी ॥४॥
२०५४
मन माझें वेधलें मन माझें वेधलें । पहातां भलें सच्चिदानंद ॥१॥
आनंदीआनंद मनासी पैं झाला । देखिला सांवळा पाडुरंग ॥२॥
एका जनार्दनीं उघडाचि देखिला । आनंद तो झाला मनीं माझ्या ॥३॥
२०५५
कमलदलाक्ष गोपी जीवनलक्ष । तो अलक्षा न बैसे लक्ष तो देखिला वो ॥१॥
मनमृग आमुचा वेधोनि गेला । पाहातांचि डोळा श्रीकृष्ण ॥२॥
सहजची आवडी पाहतां समदृष्टी । वेधोनि गेली सृष्टी पाहतां गे माय ॥३॥
एका जनार्दनीं परात्पर शोभला । तेणें मज वेधेंक वेध लाविला गे माय ॥४॥
२०५६
सलीलकमलदलाक्ष राजीवलोचनु । परे परता पाहतां निवे आमुचें मनु ॥१॥
कान्हया परम गोजरीया । कान्हया परम गोजरीया ॥ध्रु०॥
तनु मन बोधलें चित्त विगुंतले । पाहतां पाहतां मना समाधान जालें ॥२॥
ऐसा कमलगर्भींचा कंदु उभा परमानंदु । एका जनार्दना वेधु मजलागे माय ॥३॥
२०५७
आजी दिवाळी दसरा । आलों विठ्ठलाचे द्वारा ॥१॥
पाहूनिया देव तीर्थ । आनंदें आनंद लोटत ॥२॥
नाठवें कांहीं आन दुजें । विठ्ठलावांचुनी मनीं माझें ॥३॥
आशा केलीं तें पावलों । एका जनार्दनीं धन्य जालों ॥४॥
२०५८
निळा पंढरपूरचा लावण्यपुतळा । देखिलासे डोळां विठ्ठल देव ॥१॥
जीव वेधला वो वेधला वो । पाहतां पाहतां जीव वेधला वो ॥२॥
एका जनार्दनीं पाहातांचि देव । वेधिला जीव परतेना भाव ॥३॥
२०५९
इंद्रिये कुंठित जालीं । विठु माउली पाहतां ॥१॥
वेधलें मन दुजें नेणें । विसरलें पेणें ताहानभूक ॥२॥
मदमत्सर समूळ गेला । ऐसा लागला वेध त्याचा ॥३॥
काम क्रोध पळाले दुरी । आशा तृष्णा झडकरी लपाल्या ॥४॥
मन मनाधीन जालें । एका जनार्दनीं रूप देखिलें ॥५॥
२०६०
दृष्टी पाहतां बिठोबासी । आनंद होय सुखराशी ॥१॥
ऐसा अनुभव मना । पाहें पाहें पंढरीराणा ॥२॥
एका दरुशनें मुक्ती । देतो रखुमाईचा पती ॥३॥
एका जनार्दनीं गमन । गोजिरें विटें समचरण ॥४॥