अद्वैत - अभंग २४०१ ते २४२०
२४०१
घर सोडोनि जावें परदेशा । मजसवें देव सरिसा ॥१॥
कडे कपाटे सीवरी । जिकडे पाहे तिकडे हरी ॥२॥
आतां कोणीकडे जावें । जिकडे पाहे तिकडे देव ॥३॥
एका बैसला निरंजनीं । न जाइजे जनीं वनीं ॥४॥
२४०२
आतां काय पुजुं देवा । माझी मज घडे सेवा ॥१॥
तोडुं गेलों तुळशीपान । तेथें पाहतां मधुसूदन ॥२॥
अत्रगंध धूप दीप । तेंही माझेंचिक स्वरुप ॥३॥
एका जनार्दनीं पूजा । पुज्य पूजक नाहीं दुजा ॥४॥
२४०३
कृष्णचंदन आणिलें । सकळ वेधिलेंक परिमळें ॥१॥
तेणेंक फुटती अंकुर । अंगीं भावाचे तरुवर ॥२॥
खैर धामोडे चंदन । कृष्णवेधें वेधिलें मन ॥३॥
एका एक हरिख मनीं । वसंत दाटे जनार्दन ॥४॥
२४०४
बोलिजे तें नव्हें । बोलणें तेंही ती आहे । बोला आंतु बाहेर पाहे । पाहतां कवण आहे ॥१॥
हरि हरि हरि हरि । अहं सोहं नुरेचि उरी । आत्मा एक चराचरी । एकपण नाही निर्धारीं ॥२॥
दृश्य तो जाला नाहीं । दृश्यमात्रें त्यातेंच पाही । आहे नाहीं ऐसें जें कांहीं । प्रकाशे त्याच्याच ठायीं ॥३॥
एकपणें पाहे अनेक । अनेकीं आहे एक । एक ना नव्हे आणीक । एक जनार्दनींक तोचि देख ॥४॥
२४०५
राहातें एक जातें दोनपणें । तेथेंचि नाहीं पां देखणें ॥१॥
एकचि एक बोलता रे साचे । एक नाहीं तेथें अनेक कैंचे ॥२॥
अनेकी एक निर्धारितां पाहीं । मुळीं मन ठेवुनियां ठायीं ॥३॥
राहातें जातें दोन्हींही वाव । एका जनार्दनीं एकचि भाव ॥४॥
२४०६
भाव भावित भाव भावित भावित निजभाव भावना । निजबोध जालिया कैंची भाव भाविक भावना ॥१॥
भक्ति भावित शक्ति बोधीत शोधीत निजसत्त्व । भक्तिमुक्ति विरहित बोधिते निजसत्व ॥२॥
मायामोहित काय कामीते क्षोभती निजक्रोध । एक जनार्दनीं एकपणें आणिती निजबोधा ॥३॥
२४०७
रसने रसभोग्य रसाचा भोक्ता रस ग्रासी होय भेटी ।
रसस्वादाचा सौरसु तोची ब्रह्मारसो कृष्णीं पडतसे गांठीं ॥१॥
आत्मा कान्हा भोग निधी । आम्हीं सकळां भोग अवघी ॥धृ०॥
श्राव्य श्रावक श्रवणा समाधान सहजीं सिद्धचि पाहे ।
गगन गर्भें सरे गगना अलिप्त शब्दें कोंदाटलें ठायीं राहें ॥२॥
दृष्टी दृश्य नसे दृश्य सबाह्म दिसे दृष्टीविण डॊळा पाहे ।
अरुपाचें रुप अगुनी होउनी देख देखणें कवण आहे ॥३॥
घ्राणाचे जें घ्राण वासाचा अवकाशु ज्ञप्ती मात्र आहे शुद्ध ।
गंधाचा गंधु सुवास जीवन दृष्टी भोग सुगंध ॥४॥
देहाचे आंतील कठीण कीं कोंवळें न कळे तेथीचा भावो ।
आत्मारामीं वृत्ति जडोनी गेली मा सबाह्म रिता नुरेची ठावो ॥५॥
मनाचाही वेगु दिसताहे सवें नुप्तमाजीं उभा देवो ।
म्हणवोनी मन होतें तें उन्मन जालें पडिला कृष्ण स्वभावो ॥६॥
काष्ठ भक्षितां दाहकु काष्ठामाजीं असें मथिलिया काष्ठाचि अग्नि ।
एका जनार्दनीं कृपा देहींचाचि देहीं मी भोग भोगितां राहे कृष्ण होऊनि ॥७॥
२४०८
प्रतिमाचि देवो ऐसा ज्याचा भावो । तो न करी निर्वाहो आम्हांलागीं ॥१॥
असतां सबराभरित बाहेर जो अंतरीं । तो संपुष्टामाझारी म्हणती देवो ॥२॥
द्वारका पंढरी देवयात्रा करी । सर्वत्र न धरी तोचि भावो ॥३॥
सुक्षेत्रीं पुण्य मा अन्यत्र तें पाप । नवल हा संकल्प कल्पनेचा मतवाद्या ॥४॥
द्वारका पंढरी देवयात्रा करी । येर काय भारी वोस पडे ॥५॥
एक जनार्दनीं स्वतः सिद्ध असे । विस्मरण स्मरण होत असे नाथिलें तें पिसें ॥६॥
२४०९
स्मरण स्वयाती नलगे ती जपमाळ हातीं । नाठवितां चित्तीं स्मरण होय ॥१॥
तैसा देहीं देवो परिसुनीं भावो । नाठव तोचि आठवो होत असे ॥२॥
वस्तु वस्तुपणें जडोनि गेली अंगीं । आठवू तो विसरु वेगीं जाला वावो ॥३॥
अगाध डोहीं गगन बुडालें दिसे । परि न बुडतांचि असे गगनी गगन ॥४॥
तैसा देहीं देह असतांचि संचला । म्हणती हारपला लाज नाहीं ॥५॥
मृगजळाचि व्यक्ति जळपणाची प्रतीति । भासत असतां स्थिति मिथ्या जैसी ॥६॥
एका जनार्दनीं एकपणें निर्वाही । असतांचि देह वावो देहपणें ॥७॥
२४१०
सर्वाभुतीं दिसे देव । जया ऐसा अनुभव ॥१॥
तया चित्तीं देव असे । जिकडे पाहे तिकडे दिसे ॥२॥
देव जन देव विजन । देवीं जडलें तन मन ॥३॥
देव घरीं देव दारीं । देव दिसे व्यवहारीं ॥४॥
देव काम देव धंदा । देवीं पावला स्वानंदा ॥५॥
देव मार्गें देव पुढें । दृष्टी चैतन्य उघडें ॥६॥
माता देव पिता देव । देवरुप स्वयमेव ॥७॥
देव बंधु देव जाया । देवरुप अवघी माया ॥८॥
देव गुण देव निर्गुण । गुणातीत देव जाण ॥९॥
देवाविण कांहीं नाहीं । ऐशी ज्याची दृष्टी पाहीं ॥१०॥
एका जनार्दनीं देव । सहज चैतन्य स्वयमेव ॥११॥
२४११
पाहों गेलों देवालागीं । देवरुप झालों अंगीं ॥१॥
मीतुंपणा ठाव । उरला नाहीं अवघा देव ॥२॥
सुवर्णाचीं झाली लेणीं । देव झाला जगपणीं ॥३॥
घटीं मृत्तिका वर्तत । जगीं देव तैसा व्याप्त ॥४॥
एकानेक जनार्दन । एका जडला एकपणें ॥५॥
२४१२
ब्रह्मीं नाहीं कर्म नाहीं उपासना । नाहीं ध्येय ध्याना ठाव जेथें ॥१॥
जाणीव नेणीव भगवंतीं नाहीं । विज्ञान जें तेंहीं लया जाय ॥२॥
नामरुपा ठाव नाहीं जया ठायीं । ज्ञेय ज्ञाता तेंही नाहीं जेथें ॥३॥
एका जनार्दनीं आहें एकरुप । सहज स्वरुप नित्य शुद्ध ॥४॥
२४१३
आजीचा सुदीनु आम्हां झाला आनंदु । सकळां स्वरुपीं स्वयें देखें गोविंदु ॥१॥
पाहिला गे माय आतां सांगुं मी कैसें । जेथें पाहे तेथेंक गोविंदु दिसे ॥२॥
पाहतां पाहणें तटस्थ ठेलें । सबाह्म अभ्यंतरीं पुरुषोत्तम कोंदलें ॥३॥
यापरी पाहतां हरुष होतसें मना । एका जनार्दनीं धणी न पुरे मना ॥४॥
२४१४
साधन कांहीं नेणें मी अबळा । शाम हें रूप बैसलेंसे डोळां ।
लोपली चंद्रसुर्याची कळा । तो माझा राम जीवांचा जिव्हाळा ॥१॥
राम हें माझें जीवींचे जीवन । पाहतां मन हें माझें उन्मन ॥२॥
प्रकाश दाटला दाही दिशा । पुढेंही मार्ग न दिसे आकाशा ।
खुंटली गति श्वासोच्छ्वासा । तो राम माझा भेटेल हो कैसा ॥३॥
यासी साच हो परिसा कारण । एका जनार्दनीं शरण ।
त्याची कृपा होय परिपूर्ण । तरीच साधें हें साधन ॥४॥
२४१५
पातला रे भवगजपंचानन । निरसूनियां जन झाला जनार्दन ॥१॥
नाभी नाभी नाभीसी काह्मा । नाथिला संसार लटकी ही माया ॥२॥
वचनाचेनि घायें संशय तोडिले । अनेकत्व मोडुनि एकत्व जोडिलें ॥३॥
वांझेचा पुत्र कळिकाळाचा वैरी । एक जनार्दनीं संसार तोडरीं ॥४॥
२४१६
पहाला तो दीन हरिखाचा आम्हां । सर्वाभुतीं अभिन्न सदा देखों श्रीरामा ॥१॥
काय सांगु गोविंदा तुझीं आवडी । जनीं वनीं नयनीं नीत नवी गोडी ॥२॥
निमिष्य जैसें वर्ष तैसें आम्हां गोडी । हरिरुप पाहता हरिखे मनबुद्धि वेडी ॥३॥
जनवनमन अवघें जालें जनार्दन । एकाएकी पाहतां तेथें हारपले मन ॥४॥
२४१७
हरिखाची गुढी बोधावा आला । अहंकार गर्जतु अविवेकु मारिला ॥१॥
संतोषें विवेक आपाआपणिया विसरला । लाजुनी महाहारुष आनंदासी गेला ॥२॥
मारविला क्रोध ममता सती निघाली । तुटला मत्सर शांति सुखें सुखावली ॥३॥
एका जनार्दनीं पाहतां सहजीं पैं सहजे । स्वराज्य सांग तेथें नाहीं पैं दुजें ॥४॥
२४१८
वेणुनादाचिया किळा । पान्हा फुटला निराळा ॥१॥
आर्तभूत जीव तिन्हीं । चातक निवाले जीवानीं ॥२॥
स्वानुभवाचे सरितें । जेवीं जीवना दाटे भरतें ॥३॥
एका एक गजें घनीं । पूर आला जनार्दनीं ॥४॥
२४१९
उपवास पडिले भारी । ती वेदना जाणे हरी ॥१॥
मज जाली नाहीं बाधा । देहीं देखतां गोविंदा ॥२॥
देहींचें दुःख अथवा सुख । भेटों नयेचि सन्मुख ॥३॥
एका जनार्दनीं सुख । विसरला तहान भुक ॥४॥
२४२०
पाहतां पाहतां वेधलें मन । झालें उन्मन समाधिस्था ॥१॥
ऐसा परब्रह्मा पुतळा देखिलासे डोळा । पाहिला सावळा डोळेभरी ॥२॥
तनु मन वेधलें तयाचे चरणीं । शरण एका एकपणें जनार्दनीं ॥३॥